मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे पक्षसावरण्यासाठी एक पाऊल पुढे येत असताना, पक्षातील महिला नेत्यांमधील गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे समजते. शिवसेनेतील महिला पदाधिकारी आशा मामेडी यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. मामेडी या शिंदे यांच्या पक्षात जाण्यामागे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील महिला आघाडीतील गटबाजी कारणीभूत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे पक्षाचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला दिसतो.
अशावेळी उद्धव ठाकरे यांनीच महिला आघाडीच्या नेत्यांची कानउघाडणी केल्याचे समजते. एकमेकांशीच असलेल्या स्पर्धेमुळे आपण चांगले नेते गमावत आहोत, अशा शब्दांत त्यांनी महिला पदाधिकाऱ्यांना सुनावल्याचे कळते. एकीकडे सुषमा अंधारे, संजना घाडी आणि ज्योती ठाकरे तर दुसरीकडे नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदे, विशाखा राऊत यांचे गट पडले आहेत. महिला आघाडीतील या गटबाजीची रश्मी ठाकरे यांनाही दखल घ्यावी लागली असून, त्यांनाही गटबाजी रोखण्यासाठी मध्यस्थी करावी लागत आहे.
मातोश्री येथे बुधवारी २३ नोव्हे. रोजी, दक्षिण मुंबईतील पदाधिकाऱ्यांची याच पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. या बैठकीला महिला नेत्या उपस्थित होत्या. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महिला नेत्यांमध्ये सुरू असलेल्या चढाओढीबाबत भाष्य केल्याचे समजते. 'तुमच्या आपआपसातील स्पर्धेमुळे आपण चांगली माणसे गमावत आहोत', असे म्हणत उद्धव यांनी महिला नेत्यांची कान टोचणी केली. यावेळी रश्मी ठाकरेही उपस्थित होत्या.