‘निकाह हलाला’ आणि बहुपत्नीत्वास बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी!

25 Nov 2022 12:36:32
triple talaq


नवी दिल्ली
: मुस्लीम वैयक्तिक कायद्यातील ‘निकाह हलाला’ आणि बहुपत्नीत्वाच्या घटनात्मक वैधतेस देण्यात आलेल्या आव्हानावर सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ सुनावणी करणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्या. हिमा कोहली आणि न्या. जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत.

याचिकाकर्ते वकील अश्विनी उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर या याचिकांवर सुनावणी करण्यासाठी नवीन खंडपीठाची स्थापन करण्याची गरज व्यक्त केली. यापूर्वी स्थापन घटनापीठातील दोन सदस्य, न्या. हेमंत गुप्ता आणि न्या. इंदिरा बॅनर्जी हे सेवानिवृत्त झाल्याचे उपाध्याय यांनी सरन्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर सरन्यायाधीश न्या. चंद्रचूड यांनी या प्रकरणावर सुनावणी करण्यासाठी नवीन घटनापीठाची स्थापना करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दि. 26 मार्च 2018 रोजी ‘निकाह हलाला’ आणि बहुपत्नीत्वाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी याचिका घटनापीठाकडे पाठवली होती. घटनापीठामध्ये न्या. इंदिरा बॅनर्जी, न्या. हेमंत गुप्ता,न्या. सूर्यकांत, न्या. एम. एम. सुंदरेश आणि न्या सुधांशू धुलिया यांचा समावेश होता. घटनापीठासनोर दि. 30 ऑगस्ट रोजी प्रकरण सुनावणीसाठी आले होते.

 ’निकाह हलाला’, बहुपत्नीत्वाला घटनाबाह्य घोषित करण्याच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावून उत्तर दाखल करण्यास सांगितले होते. त्याचप्रमाणे न्यायालयाने राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, राष्ट्रीय महिला आयोग आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगासही नोटीस बजावली होती. त्यानंतर न्या. बॅनर्जी दि. 23 सप्टेंबर आणि न्या. गुप्ता दि. 16 ऑक्टोबर रोजी निवृत्त झाले होते.

दरम्यान, याप्रकरणी अश्विनी उपाध्याय सामाजिक कार्यकर्त्या नाईस हसन, किरण सिंह, समीन बेगम, पीडिता राणी शबनम, नफीसा खान, परजाना आणि हैदराबादचे वकील एम. मोहसीन यांनीदेखील निकाह हल्ला व बहुपत्नीत्वाविरोधात याचिका दाखल केली आह, तर ‘जमियत-उलेमा-ए-हिंद’ने या प्रथांच्या समर्थनार्थ याचिका दाखल केली आहे.



Powered By Sangraha 9.0