वारशाचे वाटोळे...

    24-Nov-2022
Total Views |

Afitya Thackeray




हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या चाराखाऊ लालूप्रसादांवर शाब्दिक बाण सोडले, आज त्याच बाळासाहेबांच्या नातवाने लालूपुत्राची चक्क गळाभेट घेतली. एवढेच नाही, तर तेजस्वी यादवांनी लालूंच्या राजकीय कारकिर्दीवरची दिलेली दोन पुस्तकेही आदित्य ठाकरेंनी भेट म्हणून स्वीकारली. यालाच म्हणतात, वारशाचे वाटोळे...


महाराष्ट्राच्या गवईंना चले जाव सांगता आणि दिल्लीत विदेशी सोनियांपुढे हुजरेगिरी करता? - चारा खा; महाराष्ट्राला अपशकुन करू नका!’ असा घणाघात करत शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ‘सामना’तून राजदच्या लालूप्रसादांवर कोणेएकेकाळी जोरदार घणाघात केला होता. एवढेच नाही, तर ‘चाराखाऊ’, ‘रेडा’, ‘लल्लू’, ‘राबडीचा लालू’ अशा शेलक्या शब्दांत बाळासाहेबांनी आपल्या अख्ख्या हयातीत लालूप्रसादांना ठाकरीशैलीतील शाब्दिक प्रसादच दिला. लालूप्रसादांच्या दाडीकुरवाळू धोरणाचा तिखट शब्दांत समाचार घेताना एका जाहीर सभेत बाळासाहेब म्हणाले होते की, “मिटिंग नसताना म्हशींपाशी लोळणार्‍या लालूने म्हणे हिंदू शब्दाची व्याख्या केली.


लालू म्हणतो, हमारी शादी हो गई हैं। हमारे शरीर को हलदी लगी हैं। ‘इसिलिए हम हिंदू हैं। मुलायमसिंह की भी यही बात हैं। म्हणजे, ज्याच्या अंगाला लग्न होऊन हळद लागेल तो हिंदू, अशी लालूंची हिंदूची व्याख्या. मग असं जर असेल, तर मुसलमानांचं नेतृत्व करण्याकरिता त्या माणसाची सुंता व्हायलाच पाहिजे. ज्याची सुंता झालेली नाही, मग तो मुसलमानांचे नेतृत्वच करू शकत नाही. जा त्या मुसलमानांना विचारा, चालेला का बिनसुंत्याचा? मग जसं सुंत्यावर नेतृत्व अवलंबून नाही, तसं ते हळदीवरही अवलंबून नाहीच की....” वाजपेयींचे लग्न झाले नाही म्हणून ते हिंदू नाही, अशा बुरसटलेल्या, मागास विचारांच्या लालूंना आणि मुलायमसिंहांना बाळासाहेबांनी त्यांच्याच या अजब तर्कानंतर असे यथोचित फटकारले होते. असे एक-दोन प्रसंग नाहीत, तर बाळासाहेबांनी शिवसेनेच्या स्थापनेपासूनच महाराष्ट्र, मराठी माणूस आणि हिंदुत्वाच्या मुद्द्याशी कधीही फारकत घेतली नाही. नव्वदच्या दशकांत ‘एक बिहारी, सौ बिमारी’ ही घोषणा बिनदिक्कत देणारेही बाळासाहेबच! कारण, मुंबईत परराज्यातील कामगारांचे वाढते लोंढे आणि शहराचे बकालीकरण याची बाळासाहेबांना पूर्ण कल्पना होती.


मराठी माणसाचा रोजगार या बिहारी-उत्तर प्रदेशच्या कामकारांनी हिरावून घेऊ नये, इथल्या भूमिपुत्रांना न्याय मिळावा, याच भूमिकेतून बाळासाहेब खंबीरपणे मराठी माणसाच्या न्याय्य-हक्कांसाठी खंबीरपणे उभे राहिले. एवढेच नाही, तर 2003 साली जेव्हा बिहारमध्ये रेल्वेतून नग्न करून ढकलून दिल्यामुळे चार मराठी नागरिकांची हत्या करण्यात आली होती, त्याविरोधातही बाळासाहेबांनी कठोर भूमिका घेत लालूंना महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळू नका, हे कडक शब्दांत बजावले होते. मुस्लीम मतपेढीपोटी लालूंच्या पाकिस्तानप्रेमालाही बाळासाहेबांनी असेच शिंगावर घेतले. “मुशर्रफच्या बिर्याणीचे कण लालूप्रसादांच्या दाढीत अडकले आहेत,” अशा बाणेदार शब्दांत मुस्लीम लांगूलचालन करणार्‍या लालूंना बाळासाहेबांनी धारेवर धरले. लालूंनीही बाळासाहेब ठाकरेंवर, त्यांचे मूळचे कुटुंब हे बिहारचे आहे, तेच महाराष्ट्रात ‘घुसपैठिए’ आहेत म्हणत या वादाला फोडणी दिली होती.

त्यानंतरही बाळासाहेबांनी लालूंवर तोंडसुख घेऊन लालूंना त्यांची जागा दाखवून दिली. आज हा सगळा राजकीय इतिहास प्रारंभी उगाळण्याचे कारण हेच की, बाळासाहेब आपल्या शब्दावर, भूमिकेवर अगदी अखेरच्या श्वासापर्यंत ठाम होते. पण, आज दुर्दैवाने त्यांचेच नातू आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बिहारमध्ये जाऊन त्याच यादवांशी हातमिळवणी करत, बाळासाहेबांच्या विचारांना आणि वारशालाच तिलांजली दिली.खरंतर महाविकास आघाडीमध्ये ठाकरे सामील झाल्याक्षणापासूनच बाळासाहेबांच्या विचारांचे, वारशाचे हे नैतिक अध:पतन सुरू झाले. अखेरीस एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या ‘बाळासाहेबांच्या शिवसेना’ या स्वतंत्र बंडखोरांच्या गटानंतर तरी उद्धव आणि आदित्य ठाकरेंचे डोळे खडबडून उघडतील, अशी अपेक्षा होती. परंतु, दिवसेंदिवस बाळासाहेबांचे विचार आणि वारसा दोन्ही धुळीस मिळवण्याची एकही संधी या पितापुत्रांनी सोडलेली दिसत नाही.


आदित्य ठाकरे यांचा बिहारदौरा हा त्याच घटनाक्रमातील एक भाग म्हणावा लागेल. त्यातही मोदीविरोधकांची एकजूट हाच या दौर्‍यामागचा अगदी स्वच्छ अजेंडा. आता या एकजुटीसाठी अशा मोदीद्वेष्ट्यांच्या म्हणा कित्येक भेटीगाठी यापूर्वीही झाल्या. तिसरी आघाडी स्थापन करण्याचे हात उंचावून दावेही झाले. पण, अद्याप या तिसर्‍या आघाडीला, महागठबंधनला ना मुंडके ना शेपूट. त्यात नितीशकुमार आणि उद्धव ठाकरेंमध्ये आणखीन एक साम्य म्हणजे, रालोआतून फारकत घेऊन दोघेही त्वेषाने बाहेर पडले. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी सलगी केली, तर नितीशकुमार कट्टर वैरी असलेल्या लालूपुत्रालाच उपमुख्यमंत्रिपदी बसवून सत्तेचा सोपान झुलवत राहिले. त्यातल्या त्याच नितीशकुमारांचा पक्ष आजही शाबूत असला तरी उद्धव ठाकरे मात्र शिवसेनाला फुटीच्या त्सुनामीपासून वाचवू शकले नाहीत.


तेव्हा, तेजस्वी यादव असो, नितीशकुमार, उद्धव किंवा आदित्य, यापैकी एकाच्याही मनगटात आपापल्या राज्यात एकहाती सत्ता खेचून आणण्याची मुळी ताकद नाही की तसा जनाधार नाही. पण, तरीही अधूनमधून अशा भेटीगाठी घेऊन एका मोदी विरोधकाने दुसर्‍या मोदी विरोधकाला गोंजारण्याचाच हा केविलवाणा प्रकार. त्यातूनच मग आपली राष्ट्रीय नेता, राष्ट्रीय पक्ष म्हणून प्रतिमानिर्मितीचाच हा सगळा अनाठायी खटाटोप! ठाकरेंच्या शिवसेनेची तर ही जुनीच खोड. महाराष्ट्राबाहेर कित्येकदा निवडणुका लढवून अनामत रक्कम जप्त झाल्यानंतरही राष्ट्रीय पक्ष म्हणून मिरवण्याची यांची हौस मात्र आजही ‘जैसे थे’. आता आदित्य ठाकरे ज्या बिहारमध्ये यादवांच्या गळाभेटी घेऊन आले, तिथली शिवसेनेचीच कामगिरी बघा.


शिवसेनेने 2020च्या बिहार विधानसभा निवडणुकीत एकूण 23 जागांवर निवडणूक लढवली. त्यातील 22 जागांवर तर त्यांना ‘नोटा’पेक्षाही कमी मतं मिळाली. पण, त्यावेळीही नितीश कुमारांपेक्षा तेजस्वी यादव मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी भविष्यवाणी खुद्द संजय राऊतांनीच केली होती. पण, आज तेच नितीश-तेजस्वी एकत्र आल्याने आदित्य ठाकरेंनी दोघांचीही भेट घेऊन मोदींविरोधात ‘हम साथ साथ हैं’चा फ्लोप शो केला.आज खरी शिवसेना कोणाची इथपर्यंत हा पक्ष रसातळाला गेल्यानंतरही घराणेशाहीच्या धुंदीत ठाकरे मात्र आकंठ बुडालेले दिसतात. पण, किमान घराणेशाहीचा वारसा चालवताना आपण शिवसेनाप्रमुखांच्या विचारांवर तरी श्रद्धा दाखवावी, याचाही आता ठाकरेंना पुरता विसर पडलेला दिसतो. म्हणूनच आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता, मुंबईतील बिहारी मतंही आपल्या पदरी पडावी, या फुटकळ अपेक्षेने आदित्य ठाकरेंनी बिहारला जाऊन जोडे झिजवले.


पण, हे करताना आपल्याच वडिलांनी, आजोबांनी वेळोवेळी घेतलेल्या रोखठोक भूमिका, मराठी अस्मितेचा मुद्दा मात्र ठाकरे पितापुत्राने बासनात गुंडाळला. इतकेच नव्हे, तर महाराष्ट्रात होणार्‍या बिहारी कामगारांच्या विरोधालाही आदित्य ठाकरेंनी भाजपच्या षड्यंत्राचे लेबल लावण्याचा मूर्खपणाच दाखवला.तर अशा या युवराज ठाकरेंच्या बिहार दौर्‍याचे फलित काय तर, तेजस्वी यादवांनी आदित्य ठाकरेंना लालूप्रसाद यादवांच्या राजकीय कारकिर्दीवर भाष्य करणारी दिलेली दोन पुस्तके! म्हणजेच, एकीकडे लालूपुत्र तेजस्वी यादव त्यांच्या वडिलांचा वारसा चालवतोय, तर दुसरीकडे ज्यांच्या आजोबांनी लालूंना आसमान दाखवले, ते आदित्य ठाकरे मात्र त्याच यादवांवर स्तुतिसुमने उधळताना दिसले. म्हणूनच वारसा हा कधीही केवळ रक्ताचा असू शकत नाही, तर तो विचारांचाच असतो, याचा ठाकरेंना पडलेला विसर या बिहार दौर्‍यानिमित्त पुनश्च अधोरेखित झाला!





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.