अचाट माणूस हरिओम काका!

    24-Nov-2022
Total Views |
hariom kaka


रा. स्व. संघाच्या मुशीत तयार झालेल्या आणि भारतीय संस्कृतीच्या जतन-संरक्षणासाठी गेल्या 50 वर्षांपासून झटणार्‍या हरिओम काका अर्थात सदाशिव अच्युत मालशे यांच्याविषयी...


वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी पितृछत्र हरपल्यावर आपल्या मामासमवेत कोकणातून पुण्यात आलेल्या हरिओम काकांनी संपूर्ण आयुष्य गेल्या 50 वर्षांपासून समाजासाठी समर्पित केले आहे. त्यांचे काम अफाट तर आहेच, पण तितकेच अचाटदेखील. कारण, मुळी हा माणूसच अचाट आहे. त्याची काम करण्याची शैली ही काही आजच्यासारख्या कथित सामाजिक कार्यकर्त्यांप्रमाणे प्रसिद्धीलोलूप अशी अजिबात नाही. तथापि, जे काही थोडेबहुत का होईना, हरिओम काका समाजासाठी करतात. त्यामुळे या समाजातील शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातील अनागोंदी आणि दुर्लक्षितपणालादेखील चव्हाट्यावर आणणे शक्य होत असल्याचे त्यांच्याशी चर्चा करताना जाणवले.
एखाद्या घरातील मुलगा शाळेत शिकण्यासाठी जातो. मात्र, अभ्यासासाठी त्याच्याकडे ना वही आहे ना पुस्तक आहे, असे वास्तव जेव्हा त्यांच्या निदर्शनास आले, तेव्हा हरिओम काकांनी स्वकमाईतून एक हिस्सा बाजूला ठेवून अशा शिक्षणासाठी उत्सुक असलेल्यांना मदत तर केलीच. मात्र, शिक्षण पूर्ण होऊन ही व्यक्ती समाजात एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून कशी वावरेल, याचीदेखील काळजीपूर्वक तजवीज केली.
कोकणातील चिपळूण जवळच्या एका छोट्याशा गावातून इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या हरिओम काकांनी पुण्यात येऊन आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी महापालिकेत नोकरी केली आणि यातूनच त्यांनी समाजासाठी आपण देणे लागतो, ही उदात्त भावना जागृत करुन कार्य करायला सुरुवात केली. निवृत्तीनंतर आजही ते पुण्यातील निवारा आश्रमात नित्यनेमाने विनावेतन सेवा देत आहेत. समाजाप्रति कृतज्ञ असले पाहिजे आणि ही बांधिलकी जपली पाहिजे म्हणून ’जिथे गरज आहे तिथे उभे राहायचे’ ही संघाची शिकवण अंमलात आणत. ‘मी नास्तिक पण नाही आणि आस्तिक पण नाही,’ असे सांगून त्यांनी समर्थ रामदासांच्या ’आधी केले मग सांगितले’ या उक्तीनुसार विशेषतः ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी कार्य करीत असल्याचे स्पष्ट केले.
या भागात शिक्षणासाठी अनेक गैरसोयी असल्याचे लक्षात आले. तेव्हा पुणे जिल्ह्यातील अनेक भागातील शाळांमध्ये एखाद्या शाळेत स्वच्छतागृह किंवा वर्गखोली बांधून देण्यासाठी मदत करणे शिवाय तेथे जी मुले हुशार असून पैशांअभावी अडचणींना सामोरे जात असतात, अशा विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकांसोबत इतर शालेय साहित्याची किंवा शैक्षणिक शुल्क भरुन हातभार लावत असतात.राजापूरच्या अशाच एका विद्यार्थ्याला त्याचे ‘सीए’ व्हायचे स्वप्न त्यांनी देणगीतून मिळालेल्या पैशांतून पूर्ण केले. आज तो विद्यार्थी पुण्यात ‘आत्मनिर्भर’ झाला आहे. एका मुलीला वकील बनविले, तर काही मुलींचे पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी त्यांनी मदत केली. कोरोनाच्या काळात ज्यांना आत्यंतिक गरज आहे अशा गरजू व्यक्तींना 1200 रुपयांपर्यंतची अन्न पाकिटे वितरित करण्याचे काम हरिओम काकांनी केले.
भक्तियोग, ज्ञानयोग आणि कर्मयोगावर प्रचंड श्रद्धा असलेल्या हरिओम काकांनी गेल्या 14 वर्षांपासून आणखी एक स्तुत्य उपक्रम जोपासला आहे. ग्रामीण भागातील ज्या शाळांमध्ये शिक्षकांना अतिशय तुटपुंजे वेतन वर्षानुवर्षे मिळते, अशा शिक्षकांसाठी दरवर्षी कृतज्ञता सोहळा आयोजित करुन ते पाच हजार रुपये रोख आणि तीन किलो साखर व रवा त्यांना देत असतात. यावर्षी 90 शिक्षकांना त्यांनी ही मदत केली आहे. जे शिक्षक गलेगठ्ठ पगार घेऊन त्याच शाळेतील कमी पगारावर असलेल्या शिक्षकांप्रति काहीही करत नाहीत, अशा शिक्षकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे कार्यदेखील हरिओम काकांनी केले. अशा पूर्ण पगार घेतलेल्या शिक्षकांच्या बैठका घेऊन त्यांनी या शिक्षकांना मदतीचे आवाहन केले. भोर तालुक्यातील वासुदेव बळवंत फडके या शाळेचे पूर्ण रंगकाम त्यांनी देणगीच्या पैशातून करुन दिले. हरिओम काका करत असलेल्या या समाजकार्याबद्दल लोकांमध्ये इतका विश्वास दृढ झाला आहे की, गरजूंना मदत देण्यासाठी स्वतःहून देणगीदार हरिओम काकांकडे येत आहेत.
त्यांना ‘हरिओम काका’ का म्हटले जाते, याचीदेखील गमतीशीर गोष्ट त्यांनी सांगितली. कुणाशीही बोलण्यापूर्वी आणि बोलणे संपल्यावर ते ‘हरिओम’ या शब्दाने सुरुवात करतात. समोरचा प्रतिसाद देवो अथवा न देवो. तथापि, यामुळे त्यांच्या संपर्कात येणार्‍यांनादेखील ही सवय लागली. तेव्हापासून ते ‘हरिओम काका’ म्हणूनच सर्वत्र परिचित झाले आहेत.हरिओम काकांच्या या कार्याची अनेक संस्थांनी दखल घेऊन त्यांचा सन्मान केला आहे. यात ‘अथश्री फाऊंडेशन’, ‘नातू फाऊंडेशन’, ‘ओंकार न्यास पुणे’, ‘वसुंधरा कृतज्ञता पुरस्कार’, ‘सामाजिक समरसता मंच’, ‘स्नेहालय परिवार’, ‘स्वरकुल ट्रस्ट’, ‘अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला’, ‘पतितपावन संघटना’, आणि पुणे महानगरपालिकेने ही दखल घेतली आहे. दै. ’मुंबई तरुण भारत’कडून त्यांच्या या कार्यास शुभेच्छा...!
-अतुल तांदळीकर
(अधिक माहितीसाठी संपर्क -९६०४६४४२१२)
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.