सौदी आणि सुन्नी-शिया

    24-Nov-2022   
Total Views |
Saudi Arabia

गेल्या दहा दिवसांमध्ये सौदी अरेबियामध्ये 12 जणांचा शिरच्छेद करण्यात आला आहे आणि तोही कायदेशीररित्या. यामध्ये तीन पाकिस्तान, चार सीरिया, दोन जॉर्डन, तीन सौदीचे नागरिक आहेत. यावर्षी 132 व्यक्तींना अशा प्रकारे मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. हा शिरच्छेद तलवारीने केला जातो. अपराध्याला त्याच्या गुन्ह्याची किंमत चुकती करण्यासाठी सौदीने हे तंत्र अवलंबले आहे.


मात्र, याबाबत या देशातील शिया मुसलमान अत्यंत नाराज आहेत. त्यांचे मत आहे की, सौदी सरकारचा हा कायदा धर्माला अनुसरून असला तरीसुद्धा या कायद्याचे बळी शिया मुस्लीम ठरत आहेत. यावर्षी मार्च महिन्यात एकूण 81 लोकांना गुन्हेगार ठरवून त्यांचा शिरच्छेद केला गेला. त्यामध्ये 41 लोक शिया मुस्लीम होते. सौदी हा सुन्नी मुस्लीमबहुल देश आहे. मुस्लीम देशामध्ये सुन्नी आणि शिया मुसलमानांमध्ये विस्तवही जात नाही. या पाश्वर्र्भूमीवर सौदी अरेबियामध्ये शिया मुसलमानांसाठी या कायद्याचा वापर केला जातो, असे शिया मुसलमानांचे म्हणणे आहे. इतकेच नाही, तर सौदी अरेबियातील शिया मुसलमानांचे म्हणणे आहे की, सौदीच्या तुरुंगात आजीवन कारावास भोगणार्‍या कैद्यांमध्येही शिया मुसलमानच जास्त आहे. शिया मुसलमानांना बळीचा बकरा बनवले जात आहे.

शिया देशात अल्पसंख्याक असून त्यांच्याशी देशात भेदभाव होतो. सौदी अरेबियामध्ये मृत्युदंडाची सजा ज्या गुन्ह्यांसाठी होते ते गुन्हे पाहिले की, वाटते आपण भाग्यवान आपला जन्म भारतात झाला. सौदीमध्ये जादूटोणा, ईशनिंदेसाठी सरकारला वाटले की, एखादी व्यक्ती सरकारविरोधात कारवाई करत आहे. समलैंगिक संबंध असणार्‍यांना नशा करणार्‍यांना हत्या करणार्‍यांना सौदी अरेबियामध्ये मृत्युदंडाची सजा होते. आधुनिक जगात फाशीच्या शिक्षेवरही प्रश्नचिन्ह उठवले गेलेत. त्यामुळे सौदीचा तलवारीने शिरच्छेद करण्याची शिक्षा तर जगासाठी भयानक बाबच आहे. या कायद्याविरोधात जागतिक स्तरावर अनेकदा सौदी अरेबियाच्या राजाला, प्रशासनाला प्रश्न विचारले गेले. मात्र, त्यावर काही फारसे घडले नाही. मात्र, 2018 साली सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी दोन शिरच्छेद या शिक्षेविषयी म्हंटले होते की, या शिक्षेबद्दल पुनर्विचार केला जाईल. पुनर्विचार म्हणजे शिरच्छेदाची शिक्षा केवळ हत्या करणार्‍या गुन्हेगारांना दिली जाईल, असे ते म्हणाले.


सौदी अरेबिया म्हणा किंवा इतर मुस्लीम राष्ट्र म्हणा, या देशांमध्ये लैंगिक संबंध किंवा चोरी, सरकारविरोधी कारवायांसाठी क्रूर शिक्षेचेच प्रावधान आहे. मात्र, तरीही या देशातला दहशतवाद किंवा या देशातून दुसर्‍या देशात माजवला जाणारा दहशतवाद काही कमी होत नाही. अर्थात, याला सौदी अरेबियाचा थोडा अपवाद म्हणावा लागेल. तरीसुद्धा सौदी अरेबियातील काही शिक्षेची प्रावधान पाहू!जसे एखादी व्यक्ती दारू पिताना पकडली गेली, तर 500 कोडे मारण्यात येतील, एखाद्या महिलेने विवाहबाह्य संबंध ठेवले असतील, तर तिला दगडाने ठेचून मारण्यात येते, विवाहापूर्वी लैंगिक संबंध ठेवले, तर 100 कोडे मारण्याची शिक्षा, चोरी केली, तर हात कापणे तर अशा या शिक्षा. आता प्रश्न असा येतो की, ही शिक्षा ज्यांना देण्यात येते ते खरेच सगळे गुन्हेगार असतील का? गुन्हेगार आणि त्याने केलेल्या गुन्ह्याची प्रतवारी कशी केली जात असेल? कशावरून एखादा निरपराधाचा बळी जात नसेल? कशावरून कटकारस्थानांमध्ये एखादी निष्पाप व्यक्ती फसत नसेल? हे सगळे प्रश्न आहेत.


सौदी अरेबियाची शिक्षा देणारी व्यवस्था इतकी कठोर आहे, पण मग गुन्हेगारांना शोधणारीयंत्रणाही तितकीच प्रबळ आहे का? अर्थात, हासुद्धा एक प्रश्न आहे. तसे पाहायला गेले तर इतर मुस्लीम देशांप्रमाणेच सौदीमध्येही या सगळ्या कायद्यांचे आणि परंपरागत रूढी रितीरिवाजांचे सावज होत असेल ती सौदी अरेबियाची महिलाच! कारण, आधीच सांगितल्याप्रमाणे या देशात लैंगिक संबंधावरचे गुन्हे जास्तप्रमाणात लक्षात घेतले जातात. या अशा गुन्ह्यांमध्ये महिलेला सजा देणे हे इथे सोपेच जात असेल. या देशांमध्ये नशा, मद्यपान वगैरेसाठी कठोर नियम आहेत. सध्या कतारमध्ये ‘फिफा’ महोत्सव आहे. पण, पुन्हा प्रश्न उपस्थित होतो की, हा नियम सर्वांसाठीच की केवळ सामान्य लोकांसाठी आहे? असो. सौदी अरेबियामधील शिरच्छेदाची शिक्षा आणि त्यावर सौदी अरेबियातील शिया मुसलमानांनी मांडलेले मत पाहिले की वाटते, ‘मुस्लीम बद्ररहूड’ वगैरे वगैरे जे म्हंटले जाते ते सौदी अरेबियात नाही की काय?




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.