झाकीरच्या मुसक्या आवळा...

24 Nov 2022 20:37:46
zakir naik

यंदा कतारमध्ये खेळला जाणारा ‘फिफा विश्वचषक’ वादात सापडला आहे. मनी लाँण्ड्रिंग, भडकाऊ भाषण आणि दहशतवादी कारवायांचा आरोप असलेला इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईक कतारमध्ये ‘फिफा विश्वचषका’च्या उद्घाटन सोहळ्याला पोहोचल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली. कतारच्या दोहा येथे होणार्‍या ‘फिफा विश्वचषका’साठी फरार झाकीर नाईकला निमंत्रण दिल्यामुळे कतारवर चहुबाजूंनी टीका झाली. भारतानेही आक्रमक भूमिका घेत आपली नाराजी व्यक्त केली. परंतु, विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात सहभागी होण्यासाठी झाकीरला कोणतेही अधिकृत निमंत्रण देण्यात आले नसल्याचे स्पष्टीकरण कतारने दिल्याचे कळते. परंतु, झाकीरला ‘फिफा’ विश्वचषकादरम्यान प्रवचन देण्यासाठी कतारने अधिकृतपणे आमंत्रित केल्याचे बोलले जात आहे. झाकीर दोहामध्येही दिसला असल्याच्या माहितीने भारत आणि कतारमध्ये राजकीय तणाव सुरू झाल्यानंतर कतारने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. अलीकडेच कतारच्या अधिकृत ‘स्पोर्ट्स चॅनल अलकास’चे टेलिव्हिजन प्रस्तुतकर्ता अल्हाजरी यांनी झाकीर नाईक विश्वचषकादरम्यान कतारमध्ये आहे आणि संपूर्ण विश्वचषकात अनेक धार्मिक व्याख्याने देणार आहे, असे ट्विट केले आणि वादाला तोंड फुटले. या सगळ्या सुंदोपसुंदीत झाकीर पुन्हा एकदा चर्चेत आला. तो सध्या मलेशियामध्ये राहत असून १९९०च्या दशकापासून तो आपल्या धार्मिक शिकवणींमुळे भारतात प्रसिद्धीच्या झोतात आला. २०००च्या दशकाच्या सुरुवातीला त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाले होते, ज्यामध्ये त्याने अनेक आक्षेपार्ह भाषणे दिली होती. त्याच्या अनुयायांना इतर धर्मांविरोधात भडकवल्याचा आरोपही त्याच्यावर झाला. यानंतर २०१६ मध्ये भारताने त्याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’वर (आयआरएफ) बंदी घातल्यानंतर तो २०१६ मध्ये भारत सोडून मलेशियामध्ये राहत आहे. २०२० पासून मलेशियात भाषण करण्यासही बंदी आहे. भारत सातत्याने त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करतोय. त्याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ला २०२१ साली गृहमंत्रालयाने बेकायदेशीर घोषित केले. धर्मांतरण आणि दहशतवादाला प्रोत्साहन तो त्याच्या भाषणातून देत असल्याने भारतासाठी तो ‘मोस्ट वाँटेड’ आरोपी आहे. त्यामुळे भारताने या फरार झाकीरला भारतात आणून त्याच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे.

गेहलोत-पायलटांची सुंदोपसुंदी


राजस्थानमधील राजकीय सुंदोपसुंदी काही केल्या थांबण्याचे नाव घेत नसून मुख्यमंत्री अशोक गेहलोत मात्र स्वतःला काँग्रेसचे सर्वेसवा समजू लागले आहे. पंजाबमधील पराभवानंतर खरेतर काँग्रेसच्या ताब्यात सध्या राजस्थान हेच मोठे राज्य आहे. परंतु, त्यांना तेही सांभाळणे मुश्किल झाले आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळीही गेहलोत यांच्या नाट्यानंतर पक्षश्रेष्ठींना हस्तक्षेप करावा लागला होता. राजस्थान काँग्रेसमध्ये गेहलोत आणि पायलट असे दोन गट असून त्यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावर टीका करण्याची एकही संधी गेहलोत सोडत नाही. आताही गेहलोत यांनी पायलट यांना देशद्रोही म्हटले असून देशद्रोही कधीही मुख्यमंत्री होऊ शकत नसल्याचे सांगितले. अतिशय तिखट शब्दांत गेहलोत यांनी पायलट यांचा समाचार घेतला आहे. गेहलोत म्हणतात, “हायकमांड सचिन पायलटला मुख्यमंत्री करू शकत नाही. कारण, तो असा माणूस आहे ज्याच्याकडे साधे दहा आमदारही नाहीत. त्याने बंड करून पक्षाशी गद्दारी केली. तो देशद्रोही असून कोणताही आमदार त्याला मान्य करणार नाही.” नुकतीच राहुल गांधींच्या ’भारत जोडो’ यात्रेच्या राजस्थानातील नियोजन आणि तयारीसाठी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीतही दोघांमधील बेबनाव दिसून आला. या बैठकीत गेहलोत आणि पायलट यांच्यात साधी चर्चाही झाली नाही. बैठक संपण्यापूर्वीच पायलट निघून गेले. मुख्यमंत्रिपद वाचवण्यासाठी गेहलोत यांनी पक्षाचे अध्यक्षपद नाकारले. त्यावेळी पायलट मुख्यमंत्री झाले असते खरे परंतु, ‘एक व्यक्ती एक पद’ यामुळे गेहलोतांनी आहे ती खुर्ची सांभाळण्यात धन्यता मानली. तेव्हापासून दोन्ही गटांतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. २०२० मध्ये पायलट यांनी गेहलोत यांच्याविरोधात बंड केल्यानंतर गेहलोत यांनी पायलट यांना ’नालायक’ आणि ’निकम्मा’ म्हटले होते. त्यावेळी पायलटसोबत अन्य १८ आमदारही होते. यानंतर गेहलोत यांनी पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदावरून हटवले होते. आताही गेहलोत यांनी भाजपमध्ये मोदी-शाह यांचे कोणी ऐकत नव्हते, मात्र आता सगळे खुलेपणाने बोलत असल्याचे म्हटले आहे. एकूणच काय तर यांचेच एकमेकांत पटत नसून गेहलोत भाजपची उणीदुणी काढण्यात व्यस्त आहे, असेच व्यस्त राहिलात तर आगामी राजस्थान विधानसभा निवडणुकीत जनता तुम्हाला ‘वेटिंग’वर ठेवेल हे मात्र नक्की!




Powered By Sangraha 9.0