‘अ‍ॅपल’मधील कामगारांच्या संतापाचा उद्रेक

24 Nov 2022 15:52:25
apple work


बीजिंग:
कोरोना टाळेबंदीला विरोध आणि वेतन उशिरा देत असल्याने जगात चीनमधील सर्वात मोठी ‘अ‍ॅपल आयफोन’ उद्योगामधील कामगारांनी तीव्र आंदोलन सुरू केले आहे. यात सुरक्षा जवानांसोबत झालेल्या संघर्षात काहीजण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या संदर्भात अनेक व्हिडिओ समाज माध्यमांत वेगाने पसरले आहेत. स्थानिक वृत्तसंस्थांनुसार, चीनमधील झेंगझोऊ येथील ‘अ‍ॅपल आयफोन’ उद्योगात मागील ऑक्टोबरपासून कोरोना महामारी टाळेबंदीचे कडक पालन आणि वेतनासंबधी तणावाची स्थिती असल्याने कर्मचारी आणि कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यातच सुरक्षाजवानांसोबत संघर्ष उडाल्यामुळे अनेक कामगार जखमी झाले आहेत.




कामगारांना शांत करण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळांचा ताबा घेतला. परंतु, या सर्व प्रकारावर ‘फॉक्सकॉन’च्यावतीने कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. सदर घटनांचे छायाचित्रण समाज माध्यमात वेगाने पसरले असून, ‘फॉक्सकॉन’ची मालकी असलेल्या या उद्योगातून अनेक कामगार बाहेर येत सुरक्षारक्षकांसोबत संघर्ष होत असल्याचे चित्र दिसून येते. तसेच, जमिनीवर पडलेल्या कामगाराला काठीने मारहाण करत असल्याचे पाहावयास मिळते. शिवाय काहीजण घोषणा देत एक जमाव ‘बॅरिकेट्स’ पार करत पोलिसांना आव्हान देत असल्याचे स्थानिक वृत्तसंस्थांनी नमूद केले आहे.



Powered By Sangraha 9.0