राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; ‘सावरकर दर्शन प्रतिष्ठान’ची मागणी

    24-Nov-2022
Total Views |
savarkar


मुंबई:
“स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी राज्यकर्त्या ब्रिटिशांकडे क्षमायाचना करून अंदमानच्या कारागृहातून स्वतःचीसुटका करून घेतली, ते घाबरट होते, इंग्रज सरकारकडून निवृत्ती वेतन घेत होते आणि काँग्रेस विरोधात त्यांनी ब्रिटिशांशी हातमिळवणी केली होती, असे असत्य, आधाररहित आणि दुष्टबुद्धीने प्रगट आरोप केल्याकरिता काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेचे विद्यमान सदस्य राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी,” अशी मागणी ‘सावरकर दर्शन प्रतिष्ठान’ने नुकत्याच एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून केली आहे.

“स्वातंत्र्याच्या सध्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत चळवळीतील लहानमोठ्या घडामोडींविषयी नवनवीन माहिती उजेडात येत आहे. भारताची अखंडता आणि एकात्मता राखण्यात काँग्रेस पक्षाला आलेले दारुण अपयश आणि जागतिक दहशतवादाचे एक महत्त्वाचे केंद्र बनलेल्या पाकिस्तानची निर्मिती करण्यात घडलेला काँग्रेसचा महत्त्वपूर्ण आणि निर्लज्ज सहभाग लोकांच्या यथातथ्य स्वरूपात लक्षात येण्याआधी अखंड भारतासाठी जीवाचे रान करणार्‍या आणि पाकिस्तान निर्मितीला कडाडून विरोध करणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘खलनायक’ म्हणून नव्याने आरोपित करण्याचे कारस्थान काँग्रेस संस्कृतीचे म्होरके रचित असावेत आणि राहुल गांधी यांचे वक्तव्य त्या कटकारस्थानाचा भाग असावे, असा संशय घ्यायला जागा आहे,” असे मत प्रतिष्ठानने व्यक्त केले आहे.

राहुल गांधींकडून स्वातंत्र्यचळवळीचा घोर अपमान


“रत्नागिरीतील स्थानबद्धता या संबंधात जी सरकारी आणि बिनसरकारी कागदपत्रे उपलब्ध आहेत, त्यावरून ब्रिटिश सावरकरांना आपल्या साम्राज्याला निर्माण झालेला सर्वांत मोठा धोकादायक शत्रू समजत होते. भारत स्वतंत्र झाल्यावर दिल्लीत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले सरकार हे स्वतंत्र भारताचे पहिले सरकार असल्याने त्याच्या चुकांकडे सद्बुद्धीने दुर्लक्ष करून त्याला संपूर्ण सहकार्य करणे, हे प्रत्येक भारतीयाने आपले कर्तव्य समजले पाहिजे,” असे आवाहन सावरकरांनी केले होते.

“स्वा. सावरकरांवर असे खोटे-नाटे आरोप करून राहुल गांधी यांनी भारताच्या स्वातंत्र्यचळवळीचा घोर अपमान केला आहे आणि स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाविषयी घोर अज्ञान प्रगट केले आहे. आपल्या अत्यंत कोत्या मनोवृत्तीचे लाजिरवाणे प्रदर्शन त्यांनी केले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या या कृतीचा ‘सावरकर दर्शन प्रतिष्ठान’ तीव्र निषेध करत आहे,” असे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.