अखेर संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरु

24 Nov 2022 19:35:10

म्हाडा
 
 
 
मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाची शहर आणि उपनगरात ५६ संक्रमण शिबिरे आहेत. यामधील रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण अखेर आजपासून सुरु झाले आहे. मंडळाने प्रथम सहकार नगर, चेंबूर येथील संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे सर्वेक्षणाला सुरुवात झाली. सर्व संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण तीन महिन्यापूर्वी पूर्ण करण्याचे लक्ष्य मंडळाने ठेवले आहे.
 
 
उपकर प्राप्त इमारती धोकादायक झाल्यास अथवा त्याचा काही भाग कोसळल्यास यामधील रहिवाशांना संक्रमण शिबिरात पाठविण्यात येते. यासाठी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने शहर आणि उपनगरात संक्रमण शिबिरे उभारली आहेत. या या संक्रमण शिबिरात ८ हजार ४४८ अनधिकृत रहिवाशी वास्तव्य करत आहेत. गेल्या २० वर्षांपासून या रहिवाश्यांवर कारवाई होत नसल्याने त्यांना मालकी हक्काने घरे देण्याचे धोरण तयार करण्यात आले. या धोरणाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे. त्यानुसार संक्रमण शिबिरातील नागरिकांचे अ,ब ,क असे गट तयार करण्यात येणार आहेत. यासाठी शिबिरातील अधिकृत-अनधिकृत रहिवाशांचे पुन्हा सर्वेक्षण करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्याप्रमाणे २४ नोव्हेंबरपासून बायोमेट्रिक सर्वेक्षणास सुरूवात झाली.
 
 
सर्वेक्षणावेळी रहिवाशांना गाळ्याचे व उपकरप्राप्त इमारतीचे मूळ कागदपत्रे, गाळ्याचे वितरणाचे कागदपत्रे तसेच ओळखपत्र म्हणून आधार, पॅनकार्ड व इतर कागदपत्रे आणि त्यांच्या छंयांकित प्रतीसह गाळ्यामधे उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाने संक्रमण शिबिरात बॅनर लावून केले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0