महिला लोकप्रतिनिधीला घेराव घालणाऱ्या विनायक राऊत आणि नितिन देशमुखांवर गुन्हा दाखल!

24 Nov 2022 17:35:25
 
भावना गवळी
 
 
 
 
मुंबई : अकोला रेल्वे स्थानकावर भावना गवळी आणि विनायक राऊत हे आमने सामने आले होते. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गद्दार अशी घोषणाबाजी केली होती. यावरून आता भावना गवळींनी ठाकरे गटाच्या पदाधिकांऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि आमदार नितिन देशमुखांसह इतर काही जणांवर अकोल्याच्या लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अशी माहिती भावना गवळी यांनी माध्यमांना दिली.
 
अकोला रेल्वे स्थानकावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या विरोधात 'गद्दार-गद्दार' अशी जोरदार घोषणाबाजी केली होती. याप्रकरणी खासदार विनायक राऊत आणि आमदार नितीन देशमुख यांच्यासह अन्य कार्यकर्त्यावर अकोला जीआरपी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, जमाव जमवणे, एकत्रित येऊन घोषणाबाजी करणे, अश्लील भाषेत बोलणे अशा कलमांतर्गत हे गुन्हे दाखल झाले आहेत.
 
यावर भावना गवळी संतप्त प्रतिक्रिया देत म्हणाल्या, "विनायक राऊत आणि नितीन देशमुख यांनी चिथावणी दिल्यामुळे माझ्याविरोधात घोषणाबाजी झाली. त्यामुळे मी अकोला पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल व्हावे आणि अटक व्हावी. संबंधित कार्यकर्ते माझ्या अंगावर आले. माझा जीव जाईल अशा पद्धतीचे त्यांचे कृत्य होते. अत्यंत नीच वर्तन त्यांचं होत. हे सगळं काम विनायक राऊत आणि नितीन देशमुख यांनी केले आहे. त्या मॉबमध्ये माझा जीव देखील केला असता,” असा गंभीर आरोप भावना गवळी यांनी केला. शिवाय, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून कारवाईची मागणी करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
 
 
 
Powered By Sangraha 9.0