अडचणीत नितीशच!

    24-Nov-2022   
Total Views |
नितीश कुमार


नितीश कुमार, लालूप्रसाद यादव आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीद्वारे विरोधी पक्षांच्या आघाडीस प्रारंभ होईल, असे वातावरण निर्माण करण्यात आले होते. मात्र, सोनिया गांधी यांनी या बैठकीस काडीचेही महत्त्व न देता अतिशय थंडपणे ही बैठक रद्द केली. त्यामुळे नितीश कुमार यांना धक्का बसला.


बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे एकेकाळी देशातील आघाडीच्या मुख्यमंत्र्यांपैकी एक होते. बिहारला नवा चेहरा देण्याचा आणि विकासाच्या मार्गावर आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे सर्वांनाच कौतुक होते. लालूप्रसाद यादव यांच्या जंगलराजमध्ये नितीश कुमार हेच एकमेव आशेचा किरण असल्याचे त्यांचे राजकारण होते. या मुद्द्यावर ते सातत्याने निवडणुकाही जिंकत राहिले, अर्थात त्यामध्ये नितीश यांच्यासोबत त्यांचे वेळोवेळीचे सहकारी म्हणजे भाजप आणि राष्ट्रीय जनता दलाचा मोठा वाटा होता. मात्र, सर्व काही व्यवस्थित सुरू असतानाच आततायी निर्णय घेण्याची सवय नितीश कुमार यांना असल्याने त्यांनी भाजपसोबत दोनवेळा आणि राजदसोबत एकदा आघाडी तोडली.


आतादेखील काही महिन्यांपूर्वी भाजपसोबतची युती तोडून ते लालूप्रसाद यांच्यासोबत गेले आहेत. मात्र, तेथे त्यांची अवस्था फार बरी असल्याचे सांगितले जात नाही. कारण, लालूप्रसाद यादव यांचे महत्त्वाकांक्षी आणि गत विधानसभा निवडणुकीत चमकदार यश मिळवून आपली योग्यता सिद्ध करणारे पुत्र तेजस्वी यादव हे नितीश यांना बाजूला करण्याची योग्य संधीच शोधत आहेत. एकदा ती संधी मिळाली की नितीश कुमार यांना बिहारच्या राजकारणातून निवृत्त करण्याचेच त्यांचे धोरण आहे, यात कोणतीही शंका नाही.


दुसरीकडे पंतप्रधानपदासाठी विरोधी पक्षांची आघाडी तयार करण्याची अनेकांना सुचलेली कल्पना नितीश कुमार यांना पुन्हा सुचली आहे. मात्र, यावेळी ते त्यासाठी पूर्णपणे लालूप्रसाद यादव आणि कुटुंबास शरण गेल्याचे चित्र दिसत आहे. विरोधी पक्षांची आघाडी तयार करण्यासाठी दिल्लीस जाणे आलेच. नितीशदेखील त्यासाठी दिल्लीत आले, मात्र त्यासाठी लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सल्ला त्यांनी घेतला होता. सोनिया गांधी यांच्या प्रस्तावित भेटीसाठी तर ते लालू प्रसाद यादव यांना सोबतही घेऊन गेले होते. मात्र, नितीश कुमार यांचे हे बदललेले स्वरूप आश्चर्य आहे. कारण, यापूर्वी नितीश कुमार हे कोणाच्याही सल्ल्यावर चालणारे राजकारणी नव्हते. स्वतंत्र निर्णय आणि स्वतंत्र राजकारण यासाठी ते ओळखले जात होते. मात्र, गत विधानसभा निवडणुकीपासून त्यांचा हा आत्मविश्वास लोप पावल्याचे स्पष्ट दिसून आले आहे.


दिल्लीमध्ये नितीश कुमार यांना सोनिया गांधी यांची भेट घ्यायची होती. त्या भेटीचा बराच गाजावाजाही करण्यात आला. नितीश कुमार, लालूप्रसाद यादव आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीद्वारे विरोधी पक्षांच्या आघाडीस प्रारंभ होईल, असे वातावरण निर्माण करण्यात आले होते. मात्र, सोनिया गांधी यांनी या बैठकीस काडीचेही महत्त्व न देता अतिशय थंडपणे ही बैठक रद्द केली. त्यामुळे नितीश कुमार यांना धक्का बसला.त्यानंतर चालू आठवड्याच्या सोमवारी नितीश कुमार यांनी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, खर्गे यांनीदेखील गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्याचे कारण नितीश कुमार यांना सांगितले आणि भेटण्यास नकार दिला. या दोन्ही घटनांमधून एकच संदेश देण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे. तो म्हणजे काँग्रेसला वगळून एकाही प्रादेशिक नेत्यास विरोधी पक्षांच्या आघाडीचे देशव्यापी नेतृत्व करता येणार नाही.


काँग्रेसच्या या धोरणास राहुल गांधी यांच्या यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आणखी धार चढणार आहे. कारण, यात्रेस विविध राज्यांमध्ये मिळालेल्या कथित बंपर प्रतिसादावरून संबंधित राज्यांतील प्रादेशिक पक्ष आणि प्रादेशिक नेतृत्वासोबत काँग्रेस त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे. त्यामुळे तुर्तास नितीश कुमारच नव्हे, तर अन्य कोणत्याही प्रादेशिक पक्षास अथवा नेत्यास महत्त्व न देण्याचे धोरण काँग्रेसने ठेवले आहे.दिल्लीमध्ये काँग्रेसकडून थंड प्रतिसाद मिळाल्यानंतर नितीश कुमार यांनी हरियाणामध्ये झालेल्या विरोधी पक्षांच्या एका कार्यक्रमास हजेरी लावली होती. मात्र, तेथे अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जींसारख्या नेत्यांनीही नितीश कुमार यांना फार महत्त्व दिले नाही. त्यामुळे नाईलाजाने नितीश कुमार बिहारमध्ये परतले आहेत. त्याचवेळी मुजफ्फरपूर जिल्ह्यातल्या कुधनी विधानसभा मतदारसंघाच्या होणार्‍या पोटनविडणुकीमध्ये नितीश कुमार आणि त्यांच्या महाआघाडीची प्रतिष्ठापणाला लागली आहे. ही निवडणूक बिहारच्या राजकारणासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. कारण, या निवडणुकीत भाजप, महाआघाडी, ‘व्हिआयपी’ आणि ‘एआयएमआयएम’ या पक्षांनी आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.


मुझफ्फरपूर जिल्ह्यातील कुधनी विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या 3 लाख, 11 हजार, 728 आहे. 1 लाख, 64 हजार, 474 पुरुष, 1 लाख, 46 हजार, 507 महिला, सहा तृतीयपंथी आणि 741 सेवा मतदार आहेत. कुधनी विधानसभा मतदारसंघाकडे पूर्णपणे ग्रामीण भाग म्हणून पाहिले जाते. राजदचे अनिल साहनी यांना गेल्या निवडणुकीत एकूण 78 हजार, 549 मते मिळाली होती. अनिल साहनी यांची मतांची टक्केवारी 40.23 इतकी होती. त्यांनी केवळ 712 मतांनी विजय मिळवला, तर भाजपचे उमेदवार केदार गुप्ता दुसर्‍या स्थानावर असून त्यांना एकूण 77 हजार, 837 मते मिळाली होती. केदार गुप्ता यांची मतांची टक्केवारी 39.86 टक्के होती, तर मतांच्या टक्केवारीत विजयाचे अंतर केवळ 0.37 टक्के होते.
एकूण 3 लाख, 11 हजार, 728 मतदार असलेल्या या भागातील जातीय समीकरणाबाबत बोलायचे झाले, तर कुशवाह समुदायाच्या मतदारांची संख्या 40 हजार आहे. त्यामुळे या मतांवर प्रत्येक राजकीय पक्षाचे लक्ष असून त्यासाठीच महाआघाडीने मनोज कुमार सिंह उर्फ मनोज कुशवाह यांना उमेदवारी दिली आहे.


कुशवाह समुदायाच्या खालोखाल वैश्य समुदायाच्या मतदारांची संख्या 33 हजार आहे, त्यामुळे भाजपने केदार गुप्ता यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर 25 हजार मतदारांसह सहनी समुदाय तिसर्‍या क्रमांकावर आहे, मुकेश सहनी यांच्या ‘व्हिआयपी’ पक्षाने नीलाभ कुमार यांना उमेदवारी दिली आहे. ही परिस्थिती पाहिल्यास तिन्ही पक्षांनी आपापल्या संभाव्य मतदारांचा विचार करून गणित मांडले आहे. त्यामुळे लढत अतिशय निकराची होणार, यात कोणतीही शंका नाही.मतदारसंघातील उर्वरित मतदारांवर सर्वच राजकीय पक्षांना मेहनत घ्यावी लागत आहे. सुमारे समुदायाचेही एकगठ्ठा मतदान होते. अनुसूचित जाती-जमातीच्या मतदारांची संख्या सुमारे 19 टक्के आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षाच्या विजयामध्ये त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.त्यासाठी भाजपने माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांना सक्रिय केले आहे.


मतदारसंघामध्ये 22 हजार मुस्लीम मतदार आहेत, त्यामुळे ‘एआयएमआयएम’च्या असदुद्दीन ओवेसी यांनी मुर्तझा अन्सारी यांना उमेदवारी देऊन मुस्लीम मते आपल्यालाच मिळतील, असा दावा केला आहे. ‘एआयएमआयएम’ची सक्रियता बहुतांशीवेळा भाजप वगळता अन्य पक्षांसाठी त्रासदायक ठरली आहे.एकूणच, या निवडणुकीमध्ये बिहारच्या राजकारणातील सर्वच प्रमुख पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यात यापुढे स्वबळावर निवडणुका लढण्याची घोषणा केलेला भाजप, सैरभैर झालेल्या नितीश कुमारांचा जनता दल युनायटेड, नितीश कुमारांसह राजदवरही पकड पक्की करत असलेले तेजस्वी यादव यांच्याही नेतृत्वाची कसोटी या निवडणुकीत लागणार आहे.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.