‘अग्नी’च्या पल्ल्यात संपूर्ण पाकिस्तान आणि निम्मा चीन

- ‘अग्नी – ३’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

    24-Nov-2022
Total Views |
 
अग्नी – ३
 
 
 
 
नवी दिल्ली : ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम तळावरून भारताने बुधवारी ‘अग्नी – ३’ या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी प्रशिक्षण चाचणी घेतली. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या देखरेखीखाली दैनंदिन प्रशिक्षणाचा भाग म्हणून ही चाचणी घेण्यात आली.
 
 
‘अग्नी – ३’ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे भारताची क्षेपणास्त्र शक्तीमध्ये महत्वाची भर पडली आहे. क्षेपणास्त्राची चाचणी पूर्णत: यशस्वी झाली असून त्यामध्ये विविध मापदंडांची पूर्तता झाली आहे. ‘अग्नी – ३’ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रात ३ हजार ५०० किमी अंतरापर्यंत शत्रूच्या लक्ष्यांना अचूकपणे नष्ट करण्याची ताकद आहे. त्यामुळे संपूर्ण पाकिस्तान आणि जवळपास निम्मा चीन क्षेपणास्त्राच्या पल्ल्यामध्ये आला आहे.
 
 
अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेल्या ‘अग्नी – ३’ क्षेपणास्त्राची लांबी १७ मीटर आणि व्यास २ मीटर आहे. हे क्षेपणास्त्र एका सेकंदात पाच किलोमीटरचे अंतर कापण्यास सक्षम आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ‘अग्नी – ३’ ला २०११ मध्ये ‘अग्नी – २’ ची पुढील आवृत्तीमध्ये लष्कराच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आले होते.
 
 
‘अग्नी – ३’ हे पाकिस्तान आणि चीनमध्ये लांब अंतरावर लक्ष्याचा वेध घेण्यास सज्ज आहे. हे दोन टप्प्यांचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असून संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डिआरडीओ) त्याची निर्मिती केली आहे. हे क्षेपणास्त्र अत्याधुनिक नेव्हिगेशन, ऑनबोर्ड संगणक प्रणाली, मार्गदर्शन आणि नियंत्रण प्रणालींनी सुसज्ज आहे.
 
 
दहा वर्षात ‘अग्नी – १’ ते ‘अग्नी – ५’
 
 
भारताने १० वर्षांच्या कालावधीत ‘अग्नी – १’ क्षेपणास्त्रावरून ‘अग्नी – ५’ क्षेपणास्त्रापर्यंत आपली ताकद वाढवली आहे. ‘अग्नी – १’ हे मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची २००२ मध्ये यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. त्याची त्याची मारक क्षमता ७०० किमी असून ते १ हजार किलोपर्यंत अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. त्यानंतर यानंतर ‘अग्नी – २’, ‘अग्नी – ३’ आणि ‘अग्नी – ४’ ही क्षेपणास्त्रे विकसित करण्यात आली. तिन्ही मध्यम श्रेणीची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे असून त्यांची मारक क्षमता २ हजार ते ३ हजार ५०० किलोमीटर आहे. आता ‘अग्नी – ५’ च्या चाचण्या घेतल्या जात आहेत.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.