२७ नोव्हेंबरला डोंबिवलीत युवा साहित्य नाट्य संमेलनाचे आयोजन

    23-Nov-2022
Total Views |


sana
मुंबई : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या युवा साहित्य नाट्य संमेलनाचे आयोजन यावर्षी डोंबिवलीत होत आहे. . महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या डोंबिवली शाखेने आयोजित केलेले हे संमेलन रविवार, २७ नोव्हेंबर रोजी डोंबिवली (पूर्व) येथील माउली सभागृहात होणार आहे. तसेच या संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखिका, दिग्दर्शक आणि अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. या संमेलनाला महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सहकार्य लाभले आहे.
 
प्रा. जोशी म्हणाले, "या संमेलनात युवकांसाठी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून व्यासपीठाला ज्येष्ठ रंगकर्मी कै. राम मुंगी रंगमंच असे नाव देण्यात आले आहे." सकाळी दहा वाजता संमेलनाचा प्रारंभ नांदीने होणार असून विवेक वडगबाळकर आणि सहकारी नांदी सादर करणार आहेत. ज्येष्ठ नाटककार आनंद म्हसवेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित 'रंगभूमीची बदलती रूपे' या विषयावरील विचारसत्रात ज्येष्ठ दिग्दर्शक कुमार सोहोनी, ज्येष्ठ नाटककार शेखर ढवळीकर, ज्येष्ठ अभिनेते अविनाश नारकर आणि ज्येष्ठ गायिका शुभदा दादरकर सहभागी होणार आहेत. या युवा साहित्य नाट्यसंमेलनात दंगल (मंच मंथन संस्था), सा विद्या या विमुक्तये (के. जे. सोमय्या, एस. सी. पी. ए.) जीर्णोद्धार (अभिनय संस्था, कल्याण) टिन्नीटस (कलरफुल मॉंक संस्था) या एकांकिका सादर होणार आहेत.
 
संमेलनात प्रसिद्ध लेखक वामनराव देशपांडे यांचे 'नाटकातील शोकांतिका' या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे. अध्यक्षीय समारोप संपदा जोगळेकर-कुलकर्णी करणार आहेत. या संमेलनाच्या आयोजनासाठी डोंबिवली शाखेचे कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे, उपाध्यक्ष दीपाली काळे, कार्यवाह उमा आवटे-पुजारी यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, निमंत्रक वि. दा. पिंगळे, सह-निमंत्रक माधव राजगुरू यांच्यासह कार्यकारी मंडळातील सदस्य उपस्थित राहणार आहेत.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.