महापुरुषांचा मानभंग की राष्ट्रद्रोह?

    23-Nov-2022
Total Views |
rahul


हिंदू समाजाने आपल्या श्रद्धा स्थानांवर अकारण आणि या पद्धतीने चिखलफेक किती काळ सहन करायची हाही एक प्रश्न आहे. विविध हिंदुत्व संस्था आपापल्या परिप्रेक्षात भरीव कामगिरी करीत असल्या तरी या विरोधात ठोस भूमिका घेणे अत्यंत आवश्यक आहे. सगळ्याच क्षेत्रात भरीव कामगिरी करताना, या मानभंगाचा नुसता निषेध करणे पुरेसे नाही, तर या वृत्तीचा कायम बंदोबस्त करण्यासाठी हिंदूंनी पावले उचललीच पाहिजेत.


सध्या देशात चालू असलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने आपला गमावला गेलेला जनाधार पुन्हा मिळवण्याचा काँग्रेस पक्ष प्रयत्न करीत आहे. यासाठी त्या पक्षाच्या हातात असलेलं एकमेव हुकूमाचं पानं, म्हणजे राहुल गांधी, यांना नेहमीप्रमाणे पुढे केलं गेलं आहे. खरंतर हे तथाकथित हुकूमाचं पानं भारतीय जनतेने पूर्णतः नाकारले आहे आणि आत्तापर्यंत अनेकदा, अनेक आघाड्यांवर नाकारले आहे. पण, याचा कोणताही बोध हा पक्ष आणि या पक्षाचे नेतृत्व घेताना दिसत नाही. कोणत्याही स्वयंसिद्ध क्षमता नसलेल्या राहुल गांधी यांनाच हा पक्ष महत्त्व देताना दिसतो. मध्यंतरी या पक्षाने आपला राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याचा एक फार्स केला.

राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा क्षमताहीन, पण गांधी कुटुंबाशी एकनिष्ठ असलेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांना निवडून दिले. पण, हे खर्गेदेखील राजकारणाला सोडा, उरल्यासुरल्या काँग्रेस पक्षाला कोणतीही दिशा देऊ शकतील, असे वाटत नाही. त्यांनी अशी कोणतीही पावले टाकल्याचे आढळून येत नाही. परिणामी कोणताही ठोस कार्यक्रम हातात नसल्याने, क्षमता नसल्याने, आधीच दिशाहीन असलेले राहुल गांधी या यात्रेच्या दरम्यान काहीही बरळू लागलेत. या देशाची बदललेली नाडी न ओळखता हिंदू धर्म, हिंदुत्व, हिंदू विचारवंत यावर वेडेवाकडे आरोप करण्याचा काळ मागे पडला याचेही भान आजच्या काँग्रेस पक्ष नेतृत्वाला राहिलेले नाही. त्यामुळे हिंदू विचारधारेला आपल्या अलौकिक प्रतिभेने, अनुभवाने, अभ्यासाने पायाभूत विचार देणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर मात्र आकसयुक्त, वेडेवाकडे भाष्य हे काँग्रेसी नेतृत्व करण्यास चुकत नाही.

सगळा हिंदू समाज हिंदुत्वाचा हुंकार भरत असताना, राष्ट्रहित न समजता वेगळा सूर लावणार्‍या काँग्रेसला हिंदू धर्म आणि हिंदुत्ववादी जनतेचा मानभंग करण्यात एक विकृत आनंद मिळत असावा. अथवा मुळातच बुद्धी नसलेल्या या नेतृत्वाच्या देशा बाहेरील, बोलवित्या धन्यांचीच तशी इच्छा असावी, अन्यथा आपल्या गुणांपेक्षा मैत्रिणींची संख्या जास्त असलेल्या माजी पंतप्रधानाचा पणतु, सगळ्या देशाला आणीबाणी जाहीर करीत कैदेत टाकणार्‍या सत्तापिपासू माजी पंतप्रधानाचा नातू आणि युद्धनौकेवर सहकुटुंब मित्र परिवारासहीत सुट्टी एन्जॉय करणार्‍या, युद्धसामग्री खरेदीत भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून सरकार कोसळलेल्या बेजबाबदार पंतप्रधानाचा, मुळातच बुद्ध्यांक कमी असलेला, सर्व व्यवस्थेने अकारण लाडावलेला 52 वर्षे वयाचा हा माणूस सतत वेडेवाकडे बकला नसता.

rahul 2


स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वैचारिक खंडण करण्याची कुवत नसल्याने या देशात काँग्रेसी विचारधारेचे लोकं काहीबाही बरळत राहतात किंवा जाज्वल्य देशाभिमान असलेल्या सावरकरांवर वेडेवाकडे बोलले की विकृत का होईना, पण प्रसिद्धीच्या झोतात राहाता येते म्हणून हे काही बाही बकत राहतात. सावरकर चरित्र यांनी कधी वाचलेले असणे, अभ्यासले असणे, शक्य नाही. आपण जन्मापासूनच या देशाच्या करदात्यांच्या पैशांवर आयुष्यभर मौज करतो आहोत, याची यत्किंचितही लाज नसल्याने, देशाप्रती कोणतेही योगदान देण्याची यांना आवश्यकतादेखील वाटत नाही. पण, 60 रुपये पेन्शन आणि कायद्याच्या चौकटीत आणि अधिकारात केलेला ‘पिटीशन’ जो ब्रिटिश सत्तेला स्वतःकरिता काहीच मागत नाही, तो मात्र विकृत स्वरूपात आठवतो. अशा प्रकारचा विरोधी पक्ष मिळणे हेच भारतीय स्वातंत्र्य संग्राम, भारतीय लोकशाही व्यवस्था आणि जनता यांचे दुर्दैव म्हणायला हवे.

यांच्या लेखी ’मरणांन्ति वैराणि’ हे सुभाषित फक्त मुस्लीम दहशतवाद्यांसाठी लागू होते. पटियाळा हाऊस न्यायालयात ठार झालेल्या दहशतवाद्यांसाठी यांच्या डोळ्यात पाणी येते. पण, आयुष्याचा प्रत्येक क्षण फक्त आणि फक्त मातृभूमीला स्वातंत्र्य मिळावे म्हणून खर्च करणारे सावरकर यांना मान्य नसतात. कोणतेही पद किंवा सवलत न घेता या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, या समाजाच्या विकासासाठी, हिंदू एकतेसाठी जातीविरहीत एकसंध हिंदू समाजासाठी जीवन भर कार्य करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दिसत नाहीत. अंदमानात त्यांनी भोगलेल्या यातना, उपभोगलेल्या सत्तेचा माज असणार्‍या या युवराजला जाणीवच नाहीत.

सहा महिने कठोर एकांतवास म्हणजे बंद लोखंडी दारा खालून जेवणाच ताट फक्त आत सरकवल जात असे. माणूस दिसतही नव्हता, तर बोलण्याला कोण असणार. सात वेळा खडी दंडाबेडी व काम करण्याचे नाकारल्याबद्दल दहा दिवस खोडाबेडी, एकूण 20-22 वेळा आडव्या बेड्या, उभ्या बेड्या, हातकड्या, कोठडीबंद्या, अन्नत्याग इत्यादी सर्व शिक्षा सावरकरांनी अंदमानात भोगल्या. तिथे आजारी कैदी रुग्णांना दूध देण्यात येई. पण, आजारी सावरकरांना फक्त कच्ची पोळी नाहीतर पाणीदार भात देण्यात येई. या शिक्षांची लहानशी एखादी चुणूक तरी युवराजांनी आज आणि त्यांच्या पूर्वजांनी भूतकाळात कधी अनुभवली होती का, हा प्रश्न विचारण्याची वेळ आज आली आहे.

सामान्य वाचन आणि ज्ञान असलेल्या माणसाला अंदमान म्हणजे काय हे नक्की कळत असतं, माहिती असतं. ’अ’ वर्गीय राजकीय कैदी म्हणून येरवडा कारागृह असो, आगाखान पॅलेस कारागृह असो, वा नगरचा किल्ला कारागृह असो, इथे नाश्ता, जेवणखाण देण्यासाठी खानसामा, वाचायला पुस्तके, ताजी वर्तमानपत्रे, लिहिण्यासाठी कागद पेन आणि फावल्या वेळात कंटाळा आलाच तर बागेत फुलझाडे लावण्याची सक्त मजुरी ही बडदास्त, म्हणजे कैद किंवा शिक्षा नाही, तर राजकीय ऐश असते एवढे नक्की कळते.या सर्व गोष्टींचा, हिंदू समाज आणि या समाजातील हिंदू हितकारी राजकीय पक्ष कसा प्रतिवाद करतात हे पाहणे आवश्यक आहे.

हिंदुत्ववादी राजकीय पक्षांनी यावर आता प्रखर भूमिका घेतली पाहिजे. हिंदू समाजाने आपल्या श्रद्धा स्थानांवर अकारण आणि या पद्धतीने चिखलफेक किती काळ सहन करायची हाही एक प्रश्न आहे. विविध हिंदुत्व संस्था आपापल्या परिप्रेक्षात भरीव कामगिरी करीत असल्या तरी या विरोधात ठोस भूमिका घेणे अत्यंत आवश्यक आहे. सगळ्याच क्षेत्रात भरीव कामगिरी करताना, या मानभंगाचा नुसता निषेध करणे पुरेसे नाही, तर या वृत्तीचा कायम बंदोबस्त करण्यासाठी हिंदूंनी पावले उचललीच पाहिजेत.

 
-डॉ. विवेक राजे

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.