उपनिषदांची अमृतवाणी,शाश्वत सुखाची पर्वणी!!

    23-Nov-2022
Total Views |
upanishad


ज्या विद्येद्वारे परब्रह्मविषयक ज्ञान होऊन निश्चितच ब्रह्मशक्तीशी जवळीकता साधता येते, ती विद्या म्हणजे उपनिषद होय. ही गूढविद्या असल्याने व्याकरणाचे महाभाष्यकार महर्षी पतंजली हिला ‘रहस्यविद्या’ म्हणूनदेखील संबोधतात. जगातील सर्वच तत्त्ववेत्त्यांनी उपनिषदविद्येचे मनसोक्त कौतुक केले आहे. पौर्वात्य असो की पाश्चिमात्य, अनेक दार्शनिक विद्वान व अभ्यासक आजपर्यंत उपनिषदांच्या ज्ञानाने प्रभावित झाले आहेत.


वेदांचा अंतिम भाग म्हणजेच उपनिषद. वेदज्ञानाचा आध्यात्मिक सारांश भाग म्हणून उपनिषदांना ओळखले जाते. समग्र जगाचे भौतिक सुख आणि ऐश्वर्य मिळूनदेखील दीनवाणे जिणे जगणार्‍या दिग्भ्रमित माणसाला शाश्वत सुखाचा सर्वोत्तम मार्ग दाखवणारी विद्या म्हणजेच उपनिषदविद्या! याच उपनिषदांच्या अध्ययनाने जगातील असंख्य ज्ञानपिपासूंना परमशांती लाभली. असे हे भारतीय संस्कृतीचे ज्ञानभांडाररूप ग्रंथ म्हणजे उपनिषद. गूढतम अशी अध्यात्मविद्या म्हणूनदेखील हिचा लौकिक आहे.


जटिल भासणारे वेदांचे तत्त्वज्ञान लाघवी, सुगम्य व सुबोधरूपाने प्रतिपादित करण्याचे कार्य उपनिषदांनी केले आहे. खरोखरच धन्य ते ऋषिमहर्षी व थोर महात्मे, ज्यांनी आपल्या अथक व अखंड ज्ञानसाधनेतून वेदादी शास्त्रात दडलेली ही गूढ विद्या जगासमोर आणली. सांसारिक मायामोहात गुरफटून भोगसागरात बुडत चाललेल्या मानव समाजाला तरुन जाण्याची नौका म्हणजे उपनिषद. हिलाच अनंत आत्मिक सुख व शाश्वत समाधान प्राप्त करून देणारी ’ब्रह्मविद्या’ असेही म्हणतात.
‘उपनिषद’ या शब्दाचा विग्रह केल्यास आपणास ’उप (जवळ) + नि (निश्चितच) + षद्लृ - सद् (ब्रह्मप्राप्ती)’ असा अर्थभाव उलगडतो. याचा यौगिक अर्थग्रहण केल्यास उपनिषद शब्दाची व्याख्या होते, ती अशी- 


उप सामीप्येन नितरां सीदन्ति प्राप्नुवन्ति परं ब्रह्म, या विद्यया सा उपनिषद!


म्हणजेच ज्या विद्येद्वारे परब्रह्मविषयक ज्ञान होऊन निश्चितच ब्रह्मशक्तीशी जवळीकता साधता येते, ती विद्या म्हणजे उपनिषद होय. ही गूढविद्या असल्याने व्याकरणाचे महाभाष्यकार महर्षी पतंजली हिला ’रहस्यविद्या’ म्हणूनदेखील संबोधतात. जगातील सर्वच तत्त्ववेत्त्यांनी उपनिषदविद्येचे मनसोक्त कौतुक केले आहे. पौर्वात्य असो की पाश्चिमात्य, अनेक दार्शनिक विद्वान व अभ्यासक आजपर्यंत उपनिषदांच्या ज्ञानाने प्रभावित झाले आहेत.एका सुभाषितकाराने उपनिषद व भगवद्गीतेचे महत्त्व प्रतिपादन करताना म्हटले आहे-

सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दन:। पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्॥

अर्थात, भगवद्गीता हे उपनिषदरूप गाईचे दूध आहे. त्याचे दोहन करणारे योगेश्वर श्रीकृष्ण म्हणजेच गोपाळनंदन आहेत. ज्ञानी व विद्वान असा धनुर्धारी अर्जुन हा वासरू असून तोच या गीतामृत रुपी दुधाचे प्राशन करीत आहे. खरेतर असे कितीतरी असंख्य अर्जुन या जगात विद्यमान होते व आजही आहेत, जे की उपनिषदातून पुढे आलेल्या गीतारुप ज्ञानाचे रसपान करीत आहेत.उपनिषदांच्या संख्येच्या बाबतीत बरेच मतभेद आढळतात. त्यातल्या त्यात प्रामुख्याने 108 उपनिषदे आहेत, असे मुक्तिकोपनिषदात म्हटले आहे. यातील दहा उपनिषदे ऋग्वेदाशी संबंधित आहेत.


19 उपनिषदे शुक्ल यजुर्वेदाशी,32 कृष्ण यजुर्वेदाशी, 16 सामवेदाशी आणि 31 अथर्ववेदाशी संबंधित आहेत. पण, प्रचलित उपनिषदे मात्र 11 होय. यात ईशोपनिषद किंवा ईशावास्योपनिषद, केनोपनिषद, कठोपनिषद, प्रश्नोपनिषद, मुंडकोपनिषद, मांडक्योपनिषद, ऐतरेयोपनिषद, तैत्तिरीयोपनिषद, छान्दोग्योपनिषद, बृहदारण्यकोपनिषद आणि श्वेताश्वेतरोपनिषद यांचा समावेश होतो.

 ईशोपनिषदाविषयी


वरील एकादश उपनिषदांपैकी ईशोपनिषद हे सर्वाग्रणी उपनिषद. ज्ञानाच्या दृष्टीनेदेखील हा ग्रंथ सर्वोपरी. मूलतः हा यजुर्वेदाचा शेवटचा म्हणजेच चाळीसावा अध्याय. परमेश्वराचे महत्त्व, त्यांचे शुद्ध स्वरूप, उपासना, सत्य ज्ञानयोग, कर्मयोग, विद्या-अविद्या, आत्म-अनात्मस्थिती इत्यादी विषयांचे प्रतिपादन करणारे हे उपनिषद आहे. या उपनिषदाच्या अध्ययनाने अनेकांना आध्यात्मिक ज्ञानाच्या नवनवीन पैलूंचा प्रत्यय आला व ते आत्मानंदी बनवून मोक्षगामी ठरले.



-प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.