रोगापेक्षा इलाज भयंकर

    23-Nov-2022
Total Views |
nikam


नाशिकमध्ये नुकतीच एक भयंकर घटना घडली. ती ऐकून हसावे, रडावे की त्या व्यक्तीची किव करावी, असा प्रश्न साहजिकच आपल्या सर्वांसमोर उपस्थित होईल. नाशिकमध्ये वाढत्या थंडीमुळे सर्दी पडसे, तापाचे रुग्ण वाढले आहेत. आता हिवाळा आला की हे सर्दी-खोकला हे म्हणा ओघाने आलेच. त्यावर अनेक ‘पॅथी’द्वारे, घरगुती इलाजही आहेत. तसेच कुठल्याही डॉक्टरकडे गेल्यावर अगदी सहज आपल्याला सर्दी-खोकला थांबविण्यासाठी औषधाच्या गोळ्याही उपलब्ध होतात. मात्र, असे असताना नाशिकच्या एका प्रतिष्ठित महाविद्यालयातील उच्चशिक्षित प्राध्यापक साहेबराव दौलत निकम याने चक्क सर्दी, खोकल्यावर मात्रा म्हणून भरपूर मद्य चारचाकीमध्ये रिचवले.विशेष म्हणजे, कधीही मद्याच्या थेंबालाही हात न लावणार्‍या, कुठलेही व्यसन नसणार्‍या आणि शांत, विद्यार्थीप्रिय आणि नम्र स्वभावाच्या अशा या प्राध्यापकाने केवळ मद्यप्राशनच केले नाही, तर ते करून भरधाव वेगात गाडी चालवून वर्दळीच्या रस्त्यावर दहा जणांना एकापाठोपाठ एक धडक देऊन जखमी केले. या मद्यपी वाहनचालकाला थांबवण्यासाठी पोलिसांनी उपनगर, इंदिरानगर, अंबड, मुंबईनाका पोलिसांचे पथक गाडी थांबवण्यासाठी त्याचा पाठलाग करत होते. मात्र, त्यांनाही न जुमनता या बेभान प्राध्यापकाने तोपर्यंत 10 ते 11 जणांना आपल्या गाडीने उडवले होते.अखेर गाडीचे टायर फुटले आणि पोलिसांनी या मद्यपी प्राध्यापकाला ताब्यात घेतले. टायर फुटल्यानंतरच त्याला ताब्यात घेण्यात आले म्हणजे गाडीचा वेग किती भयंकर होता, याची कल्पना यावी. यानिमित्ताने आता प्रश्न पडतो की, नवीन पिढीला विद्यादानाचे कार्य करणार्‍या या प्राध्यापकाने मित्राच्या सांगण्यावरून सर्दी-खोकल्यावर मात्रा म्हणून मद्यसेवन करावे आणि ही गोष्ट एका उच्चविद्याविभूषित प्राध्यापकलाही कळू नये? विवेकाला इतकी नशा झिंग का यावी?हेच कृत्य कदाचित एखाद्या अशिक्षित अथवा समाजविघातक घटकाकडून झाले असते, तर त्यामागची कारणेही लक्षात आली असती. परंतु, चक्क महाविद्यालयाच्या प्राध्यापकाकडून आणि तेही सर्दी-खोकल्याचे कारण पुढे करत, हे असे भयंकर कृत्य हे केवळ नाशिक शहराचीच नाही, तर शैक्षणिक व्यवस्थेची मानही तितकीच शरमेने खाली घालणारे कृत्य म्हणावे लागेल.
 
अन् विवेकाला आली नशा...


चवटीत राहणार्‍या अशा या मद्यधुंद चालक साहेबराव निकम या प्राध्यापकाचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी दिले असता त्यात अति अल्कोहोल असलेले मद्याचे अंश पोलिसांना मिळाले. म्हणजे कधीही कुठलेही व्यसन न केलेल्या प्राध्यापकाने केवळ सर्दी-खोकल्यावर गुणकारी मात्रा म्हणून घेतलेले मद्य दहा जणांना जखमी करून गेले. त्यात शाळेतील मुख्याध्यापकालाही या प्राध्यापक महाशयांनी उडवले. त्यांच्या हाडांवर शस्त्रक्रिया करण्यात येत असून तेही गंभीर जखमी आहेत. वास्तविक वैद्यकीय विज्ञान आज शोधाच्या परमोच्च पातळीवर पोहोचले असून सर्दी-खोकल्याच्या रोगावर मद्य रिचवून बेदकारपणे वाहन चालवणे आणि कुणाची काहीही चूक नसताना त्यांना एका प्राध्यापकाच्या रोगाची मात्रा इतकी महाग पडत असेल, तर या प्राध्यापकाला आणि त्याला असा हा अजब सल्ला देणार्‍या दोघांवर गुन्हा दाखल व्हायला हवा.
हल्लीच्या काळात मानवाच्या विवेकबुद्धीला इतका गंज का चढावा, असाच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. तसेच अशा प्रकरणानंतर कुणी खरोखरच पुस्तकी शिकले म्हणजे ती व्यक्ती खरचं सुसंस्कृत झाली असे म्हणता येईला का? मद्याची झिंग ही क्षणभंगूर, हानिकारक तर आहेच. परंतु, तो एक सामाजिक प्रश्नही आहे.वास्तविक मनुष्याचे जगणेच इतके विलक्षण सुंदर असते की, त्याला स्वत: अशी वेगळीच ’झिंग’ आहे. कला, क्रीडा, वाचन, निसर्ग, भ्रमंती या अशा छंदातून मानवाला नेहमी पूरणारी ऊर्जा, उत्साह येत असतो. अशा वेळी कुठल्याही अमली, मादक पदार्थाच्या नशेचा शेवट असाच होतो.यापूर्वीही पुण्यात एका माथेफिरू एसटी चालकाने केवळ राग अनावर झाला म्हणून पुण्याच्या वर्दळीच्या ठिकाणी बेदरकारपणे बस चालवून अनेकांचे अपघात घडवून आणले होते. आता यानंतर विवेकाला अशा प्रकारे नशा येणार असेल, तर ती कुणीही खपवून घेता कामा नये. त्यामुळे संबंधित प्राध्यापकांच्या पत्नीसह नाशिककरही या घटनेने अवाक झाले आहेत.अशा प्रकारे मद्यप्राशन करून निरपराध, नागरिकांचा बळी जाणार असेल तर यासाठीचा कायदा अधिक कठोर आणि त्यांची अंमलबजावणीही काटेकोर, जलद व्हावी हीच अपेक्षा...!
 
-निल कुलकर्णी


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.