पर्यावरणदक्ष विद्यावाचस्पती

23 Nov 2022 20:55:08
MANSA


चार दशकांहून अधिक काळ पर्यावरण आणि खाडीशी ऋणानुबंध जुळलेले ठाण्यातील डॉ. प्रसाद चंद्रकांत कर्णिक यांच्याविषयी...


ठाणे शहरातील स्थित्यंतरांचे गेली 58 वर्षे साक्षीदार असलेले डॉ. प्रसाद कर्णिक यांचा जन्म 1964 रोजी मुंबईत झाला. मात्र, बालपणापासूनच ते ठाणेकर बनले. ठाण्यात गोखले रोडवर निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या जुन्या वाड्यात सधन एकत्र कुटुंबात त्यांचे बालपण गेले. मराठी माध्यमाची न्यू इंग्लिश स्कूल, त्यांची खानदानी शाळा. त्यांची आधीची पिढी ते स्वतः आणि त्यांची एकुलती मुलगीदेखील याच शाळेत शिकली.पदवीपर्यंत ‘ठाणा कॉलेज’ आणि पदव्युत्तर शिक्षण मुंबईत घेतले. मुंबई विद्यापीठातून एम.एस्सी (प्राणिशास्त्र- सागरी जीवशास्त्र व मात्सिकी); डी.एचई (उच्चशिक्षण पदविका) व पीएच.डी (विद्यावाचस्पती- प्राणिशास्त्र) या पदव्या त्यांनी प्राप्त केल्या.

शालेय जीवनात मराठी वाङ्मय मंडळात सक्रिय सहभाग आणि संस्कृतमधून भाषणे व नाटकात काम केल्यामुळे प्रसाद मराठी वा संस्कृत विषयात शिक्षक होणार, असे सर्वांना वाटत होते. दहावीला उत्तम गुण मिळाल्याने त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला.महाविद्यालयीन शिक्षणाच्या निमित्ताने 1979 साली खाडीकिनारी वसलेल्या ठाणे महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांनी खाडीत पहिले पाऊल टाकले अन् खाडीशी त्यांचा ऋणानुबंध अधिकाधिक वाढत गेला. सुरुवातीला विरंगुळा म्हणून खाडीशी नाते जुळले, नंतर त्याचे रूपांतर अभ्यासात कधी व कसे झाले, हे त्यांनाच कळले नाही. तो ऋणानुबंध आजही तितकाच घट्ट असून ठाणे खाडीतील तसेच किनार्‍यावरील जल व प्राणिसंपदा त्यांना जास्त भावली. किंबहुना, भविष्यात हाच त्यांचा अभ्यासाचा विषयच ठरला. त्यांनी मग प्राणिशास्त्र, सागरी प्राणिशास्त्र, मात्स्यिकी आणि सामुद्रिक विज्ञानावर, खाडीतील तुडतुडी कोळंबीवर संशोधन केले. तेव्हापासून आजतागायत मत्स्य व कोळंबी शेतीविषयक अभ्यासक व मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत आहेत.

1986 ते 1990 पर्यंत इंग्रजी माध्यमाची शाळा, नंतर कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय असे ज्ञानदानाचे कार्य केले. मात्र, कायमस्वरूपी नोकरी न मिळाल्यामुळे मग घरी शिकवण्या घेऊन चरितार्थ चालविला. समंजस जीवनसाथी लाभल्यामुळे मनाजोगती कामे करता आली. शाळेपासूनच सामाजिक क्षेत्रात पाऊल टाकले होते, व्यायामाची आवड असल्याने आयुष्यभरासाठी ’हनुमान व्यायाम शाळा’ही त्यांनी लावली. वयाच्या 16व्या वर्षी ‘घंटाळी मित्रमंडळ’ या योगक्षेत्रातील दिग्गज संस्थेतर्फे ’इंडियन योग सोसायटी’ संचालित अभ्यासक्रमाद्वारे प्रमाणित योगशिक्षक म्हणून काम सुरू केले. योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे यांचे प्रदीर्घ मार्गदर्शन लाभले. आयुष्यात सर्व सफलता या गुरुजनांमुळे मिळाल्याचे डॉ. प्रसाद आवर्जून नमूद करतात. 1980च्या दशकात ठाणे कारागृहातील ’बंदिवानांसाठी योग’ या एकमेवाद्वितीय प्रकल्पात सक्रिय सहभाग घेतला. कारागृहात दोन वर्षे योगअध्यापन चमूचा ते एक घटक होते. व्यसनमुक्तीसाठी योग याचा प्रत्यक्ष अनुभव, यासाठी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात नेमणूक झालेले कदाचित देशातील ते पहिले योगशिक्षक असावेत.

2004 साली डी. वाय. पाटील जीवतंत्रज्ञान संस्थेत प्राध्यापक, नंतर ‘लॅब इंडिया’ या प्रथितयश कंपनीत विशेषज्ञ म्हणून सहा वर्षे सेवा बजावून देश-विदेशातील प्रशिक्षण व अनुभवाची शिदोरी मिळवली. देशातील ’आयआयटी’, ‘आयआयएसईआर’, ‘एनआयएसईआर’ व इतर अनेक शिखर संस्थांमध्ये प्रशिक्षण देण्याची संधी त्यांना मिळाली. अमेरिकेत जाऊन निद्राविज्ञान विषयात संपूर्ण प्रशिक्षण घेतले. त्यानंतर ‘आंतरराष्ट्रीय निद्रा विज्ञान संस्थे’त (International Institute of Sleep Sciences- IISS) स्थापनेपासून मानद तांत्रिक संचालक व निद्राविकार उपचारक या नात्याने ते काम करीत आहेत.

गेली 20 वर्षे ठाण्यातील पर्यावरण दक्षता मंडळाच्या जलसाक्षरता मोहिमेंतर्गत स्वच्छ खाडी अभियानाची मुहूर्तमेढ रोवली. विद्यार्थी व पालक, शिक्षक यांच्यामार्फत पर्यावरण शिक्षण, प्रसारण व संशोधन क्षेत्रात संस्थेच्या माध्यमातून कार्यरत असून याच संस्थेचे ते माजी अध्यक्ष आणि विद्यमान उपाध्यक्ष आहेत. मध्यंतरी संपूर्ण वर्षभर एका नियतकालिकात ’माहेरची खाडी’ हे लोकप्रिय साप्ताहिक सदरही त्यांनी चालविले. आजघडीला योग, मत्स्यशास्त्र, निद्राविज्ञान व पर्यावरण या विषयात सक्रिय असल्याचे ते सांगतात.

हौस म्हणून निसर्ग निरीक्षण, काव्यलेखन आणि नाटकातही त्यांनी काम केले. सतत कार्यमग्न असलेल्या डॉ. प्रसाद यांनी पुरस्कारांची कधीच अपेक्षा केली नाही. मात्र, 2016 साली ठाणे महापालिकेने योग व वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘ठाणे गौरव पुरस्कारा’ने सन्मानित केले.भविष्यात अजून खूप मोठा पल्ला गाठायची मनीषा बाळगलेल्या डॉ. प्रसाद यांचा, आपल्या ज्ञानाचा समाजाला जास्तीत जास्त लाभ कसा करून देता येईल, याकडे कटाक्ष आहे. आत्मप्रौढी न मिरवता नवीन पिढीला संदेश देताना ते, कुठलेही काम मनापासून करा; जे ठरवाल त्यासाठी बौद्धिक वा शारीरिक मेहनत घेतली, तर यश तुमचेच असल्याचे ते सांगतात. अशा या पर्यावरणदक्ष खाडीरक्षकाला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!



Powered By Sangraha 9.0