बाळासाहेबांची चळवळ संपली, उरली ती फक्त राऊतांची वळवळ!

23 Nov 2022 11:22:57


बाळासाहेबांची चळवळ संपली, उरली ती फक्त राऊतांची वळवळ!

मुंबई : खासदार संजय राऊतांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केलेलली चळवळ बंद केली आणि फक्त स्वतःची वळवळ सुरू ठेवली आहे, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडेंनी केली आहे. सामनातील एका जाहिरातीवरुन त्यांनी हा शिवसेनेला टोला लगावला आहे. ते म्हणाले, "आपण बघितलेली दुसरी वेळ आहे. एका ठिकाणी शिंदेंना खोके सरकार, ED सरकार सगळं म्हणायचं. त्यात शिंदेंची जाहिरात पहिल्या पानावर द्यायची.", असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.
"आधी वाढवण बंदरासाठी त्या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा. आणि दुसऱ्या ठिकाणी त्यासंदर्भातील जाहिरात द्यायची, अशा प्रकारची दुटप्पी भूमिका नेहमी घेतली जाते. बाळासाहेबांनी एक चळवळ सुरू केली होती. ती आता चळवळ संपलेली आहे. आणि फक्त संजय राऊतांची वळवळ त्याच्यामध्ये राहिलेली आहे.", असा घणाघात त्यांनी केला. मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, "शिवसेनेच्या मुखपत्रातून प्रत्येक भूमिका जाहीर होतात. वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीला ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी स्वतः भेटून पाठींबा दिला. त्याच वृत्तपत्रात वाढवण बंदराची जाहीरात घेतात. उद्या समजा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विजयी करा, म्हणून निवडणुकीत जाहीरात दिली तर ते त्यांच्या भूमिकेच्या विरोधात आहे ना? मग तुम्ही एका ठिकाणी जर त्या आंदोलनाला पाठिंबा देतायं तर कंपनीची जाहिरात का घेता, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
दोनच दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंना वाढवन बंदर संघर्ष समितीतील पदाधिकाऱ्यांनी भेट दिली होती. यांना फक्त पैसा पाहिजे. आमची तत्व आम्ही गुंडाळून ठेवू, पण आम्हाला पैसे पाहिजेत, या पद्धतीची भूमिका आहे सामानाची, अशीही टीका त्यांनी केली आहे. आम्ही बिनशेपटाचे आहोत की नाही, हे तुम्हाला येत्या निवडणूकीत दाखवून देऊ, असे म्हणत राऊतांनी केलेल्या टीकेचा त्यांनी समाचार घेतला आहे.
Powered By Sangraha 9.0