देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी कै. मधुकरराव महाजन यांच्या जीवनावर आधारित दीपस्तंभ पुस्तकाचे प्रकाशन

    22-Nov-2022
Total Views |

deve book
 
 
मुंबई : भारतीय जनसंघाच्या संस्थापक कार्यकारिणीचे सदस्य आणि महाराष्ट्राचे पहिले संघटन मंत्री कै. मधुकरराव महाजन यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशन सोहळा शुक्रवारी संध्याकाळी मुंबईत पार पडत आहे. डॉ. विद्या देवधर यांनी लिहिलेल्या 'दीपस्तंभ' या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष उपस्थितीत दादर पूर्व येथील वसंत स्मृती येथे होणार आहे. या सोहळ्यासाठी माजी राजपाल राम नाईक व मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हेही उपस्थित असतील.
 
या कार्यक्रमात माजी अ भा वि प राष्ट्रीय उपाध्यक्ष गौरी गुंडे या गौरवमूर्ती म्हणून उपस्थित असतील. सदर कार्यक्रम भारतीय जनता पार्टी तसेच मधुकर महाजन स्मृती समिती यांच्या वतीने आयोजित केलेला आहे. दादर पूर्व येथे दादासाहेब फाळके मार्ग, वसंत स्मृतीत या कार्यक्रमाचे २५ नोव्हेम्बर रोजी संध्याकाळी ५ : ३० वाजता आयोजन केले आहे. पुस्तक प्रकाशनाच्या वेळी कै. मधुकरराव महाजन स्मृती पुरस्कारही वितरित केला जाईल. 
मधुकरराव महाजन 1942 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम करू लागले. संवेदनशील मन, विस्तृत वाचन आणि यामधून येणाऱ्या चिंतनाने त्यांनी आपल्या जीवनाची दिशा निश्चित केली. वयाच्या तीस वर्षापर्यंत दहा वर्षे संघ प्रचारक राहून त्यांनी 1952 मध्ये सुशीलाताईंसह गृहस्थाश्रमात प्रवेश केला. सरसंघचालक पूजनीय गुरुजींनी त्यांना जनसंघाचे पूर्णवेळ काम करण्यासाठी विचारणा केली तेव्हा राजकारणाच्या माध्यमातून देशसेवा व समाजसेवा साधण्याची ही संधी आहे असे मानून मधुकररावांनी भारतीय जनसंघाचे पूर्णवेळ काम करण्याचे ठरवले. भारतीय जनसंघाचे महाराष्ट्रातील पायाभरणीचे काम मधुकररावांनी केले. त्याचप्रमाणे दादरा नगर हवेली सत्याग्रहाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली.
 
गोवा विमोचन समितीचे ते सहकार्यवाह होते व संयुक्त महाराष्ट्र महाराष्ट्र आंदोलनात भारतीय जनसंघातर्फे सहकार्यवाह म्हणून त्यांनी काम पाहिले. भारतीय जनसंघाचे मुंबईमधील पहिले उमेदवार म्हणून 1957 मध्ये महाजनांनी विधानसभा निवडणूक लढवली 1961 मध्ये जनसंघाचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम थांबवून त्यांनी स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.