शमीमा बेगम निर्वासितच बरी!

22 Nov 2022 20:48:35
 
शमीमा बेगम
 
 
 
 
जिहादी दुल्हन शमीमा बेगम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचे वडील मुळचे बांगलादेशचे, तर आई ब्रिटनची. तर शमीमाचा जन्म ब्रिटनचाच. 2019 साली ब्रिटनने शमीमाचे नागरिकत्व रद्द केले. इतकेच नाही, तर पुन्हा तिला ब्रिटनचे नागरिकत्व मिळू नये, अशीही तरतूद केली.
 
 
शमीमाने पुन्हा याचिका दाखल केली. त्यानुसार बेगमचे वकील तस्निमेन अकुंजी याचे म्हणणे की, ”शमीमाच्या ब्रिटन नागरिकत्वाचा खटला आता ती मानवी तस्करीची बळी होती की, नाही यावर लक्ष केंद्रित करेल. नागरिकत्व काढून घेण्यापूर्वी हा पैलू विचारात घेतला गेला नव्हता.” हो आता शमीमा म्हणत आहे की, ती मानवी तस्करीची बळी आहे. तसे म्हणे 2021 साली एका पुस्तकात छापून आले आहे. पण, 2019 साली शमीमाने स्वतःबद्दलसांगितले होते की, तिच्या सोबतच्या मैत्रिणी ‘इसिस’च्या दहशतवाद्यांच्या संपर्कात होत्या. तिलाही तसेच करायचे होते म्हणून ती मैत्रिणीसोबत सर्वप्रथम इस्तंबूल आणि त्यानंतर सीरियामधील ‘इसिस’च्या लष्करी तळावर गेली. आता हे सगळे नाकबुल करत शमीमा स्वतःला मानवी तस्करीचा बळी सांगत आहे.
 
 
15 वर्षांची असताना शमीमा 2015 साली कदीजा सुल्ताना आणि अमीरा अबासे या दोन मैत्रिणींसोबत सीरियाला पळून गेली. पळून गेली ते सीरियाच्या ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेच्या तळावरच. या तळावरच, तिने ‘इसिस’चा अतिरेकी यागो रिडीज्ग याच्याशी लग्न केले आणि ती ‘इसिस’च्या अतिरेकी तळावरच राहत होती. पुढे ‘इसिस’वर कारवाई झाल्यावर ‘इसिस’च्या तळावरीलस्त्रियांना सीरियाच्या शिबिरामध्ये ठेवण्यात आले. ती या तळावर आली. तेव्हा केवळ 15 वर्षांची होती. त्यानंतर तिला याच तळावर तीन मूलं झाली. दोन मुलांचा कुपोषणाने मृत्यू झाला, तर एकाचा ‘न्युमोनिया’ने. अर्थात तोपर्यंत ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेचे कंबरडे मोडले हेाते. शमीमाने मग ब्रिटनमध्ये पुन्हा परतण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण, ब्रिटनने नकार दिला. तिचा कथित पती दहशतवादी यागो रिडीग्ज याच्याशी तिचे सौख्य असणारच. यागोने तो ज्या देशाचा नागरिक आहे त्या नेदरलँड्स देशाच्या प्रशासनाकडे मागणी केली की, शमीमाला नेदरलँड्सचे नागरिकत्व मिळावे. अर्थात नेदरलँड्सने ही मागणी धुडकावली. आपले वडील मूळचे बांगलादेशी नागरिक आहेत, ही आठवण येऊन शमीमाने मग बांगलादेशाकडेही नागरिकत्वासाठी मागणी केली. मात्र, बांगलादेशाने शमीमाला सांगितले की, ”शमीमा ही बांगलादेशची नागरिक नाही. शमीमा दहशवादी कृत्यात सहभागी आहे. ज्या दिवशी शमीमा बांगलादेशात पाऊल ठेवेल त्याच दिवशी तिला तुरुंगात टाकण्यात येईल आणि कायद्यानुसार फाशीची सजा सुनावण्यात येईल.”
 
 
त्यामुळे शमीमा आता कोणत्याच देशाची नागरिक नाही. ‘जिहादी दुल्हन’ होताना तिला अभिमान, आनंद आणि मजाही वाटली होती. मात्र, आता तो माज पूर्ण उतरला आहे. ती सीरियाच्या ‘अल रोज कँप’मध्ये राहत आहे. तिचे म्हणणे आहे की, इथे जिहादींच्या इतरही पत्नी आहेत. शमीमा ब्रिटनला परत जायचे म्हणते म्हणून त्या सगळ्या शमीमाचा खून करण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्थात, शमीमाच्या कोणत्याच विधानावर ब्रिटन विश्वास ठेवायच्या मनस्थितीत नाही. कारण, शमीमा नुसतीच जिहादीची पत्नी नव्हती, तर जिहादी जे जॅकेट वापरायचे ते जॅकेट बनवण्याचे काम ती करायची. थोडक्यात, दहशतवाद्यांना त्यांच्या दहशतवादी कृत्यात मदत करायची.
 
 
जिहादी संघटनेत सामील होण्यासाठी 900 लोक एकट्या ब्रिटनमधून गेले होते. ब्रिटनने यातील दीडशे लोकांचे नागरिकत्व रद्द केले होते. शमीमाला स्वतःच्या जीवनाची काळजी वाटत आहे. मात्र, 2015 ते 2019 ‘इसिस’च्या दहशतवाद्यांसोबत राहत असताना तिने कधीतरी विचार केला असेल का? की ती ज्या दहशतवाद्यांना सोबत करत आहे, त्यांनी हजारो लोकांचा क्रूर खून केला आहे. कुणाला जाळून, कुणाला पाण्यात बुडवून, कुणाला उंच डोंगरावरून ढकलून, कुणाला जीवंत पुरून, कुणाला बेछुट गोळीबार करून, तर कुणाला बॉम्बस्फोट करून याच दहशतवाद्यांनी हालहालकरून मारून टाकले. तीही माणसच होती ना? त्यामुळे शमीमासारख्या व्यक्तींना शून्य द्या दाखवायला हवी. दहशतवादाला समर्थन आणि सोबत केले की आयुष्याचे सर्व दरवाजे बंद होतात, ही भीती दहशतवादी आणि त्यांच्या सोबती महिलांना वाटलीच पाहिजे. शमीमा बेगम निर्वासीतच ठीक आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0