विश्वासाच्या नात्याला सुसंवादाचा सेतू...

    21-Nov-2022
Total Views |
nat


मुलांनी कितीही म्हटलं, तरी त्यांना एकटं न सोडणं हा एक महत्त्वाचा उपाय ठरू शकतो. परंतु, पालक आणि मुलांमध्ये विश्वासाचं नातं आणि प्रामाणिक जवळीक निर्माण होणं, आज गरजेचं आहे. वर्तमान परिस्थितीत मुलींसाठी तर ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आपली मुलगी प्रथम जगली पाहिजे, नंतर सांस्कृतिक मूल्ये आपल्याला जपता येणे शक्य आहे.


श्रद्धा वालकरला आता जवळपास भारतात सगळेच ओळखतात. ती 28 वर्षांची मुलगी, जिची तिच्या ‘लिव्ह-इन पार्टनर’ने अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. पण, श्रद्धा वालकर नेमकी कोण होती? तिच्या सोशल मीडिया पोस्ट्सवर नजर टाकल्यास तिच्याबद्दल बर्‍याच काही गोष्टी सांगितल्या जातात. या सगळ्या चर्चित गोष्टी तिच्या रोजच्या जीवनात रक्तरंजित किंवा भयानक दिसत नाहीत. तिच्या ‘पोस्ट’ पाहून, लक्षात येते की, श्रद्धा ही भरभरून जगणारी मुलगी होती. तिच्या स्वत:च्या अटींवर जीवन जीवन जगणारी होती, धाडसी होती. तिच्या ‘इन्स्टाग्राम’ प्रोफाईलमध्ये फक्त 14 फोटो दिसतात आणि प्रत्येक फोटो तिची स्वतःची एक कथा असावी, असेच वाटते. तिच्या सर्व फोटोंमध्ये, लक्ष वेधून घेणारी तिची मनोवेधक छबी ही तिच्या ‘लिव्ह-इन पार्टनर’सोबतची आहे.

 ’हॅपी डेज’ या कॅप्शनसह हे चित्र दि. 14 फेब्रुवारी किंवा ‘व्हॅलेंटाईन डे’ रोजी ’शेअर’ करण्यात आले होते. त्यावरून असे वाटते की, ते दोघे प्रेमात होते किंवा किमान ती तरी त्याच्यावर प्रेम करत होती. एकंदरीत तिचे सोशल मीडिया अकाऊंट आजच्या तरुण-तरुणींमध्ये दिसते, तसे अनेक रंगीबेरंगी फोटोंनी खचाखच भरलेले नाही, तर काही खास अर्थपूर्ण फोटोंनी भरलेले आहे, ज्यावर काही विशिष्ट आठवणींचे तिने नामकरण केलेले दिसते. आजच्या प्रदर्शनाच्या काळात जे लोक त्यांच्या जीवनातील प्रत्येक लहानसहान प्रसंग सोशल मीडियावर प्रदर्शित करण्याचा मोह करत नाहीत, ते आपले मित्रपरिवार व समाजाकडून आपल्या जीवनातील प्रसंगांचे प्रमाणीकरण करत बसत नाहीत. आपले आयुष्य आपल्या इच्छेनुसार ते जगात असतात.

आफताब आणि श्रद्धा पहिल्यांदा एका ‘डेटिंग’ साईटवर भेटले आणि नंतर छतरपूरमध्ये भाड्याच्या घरात एकत्र राहायला गेले. पहिले काही ‘रोमँटिक’ दिवस वगळता त्यांच्यात नंतर भांडणे होऊ लागली होती. तिचा ‘लिव्ह-इन पार्टनर’ आफताब पूनावाला याने काही महिन्यांपूर्वी वालकरचा गळा दाबून खून केला आणि तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि छतरपूर परिसरात फेकून दिले.श्रद्धाच्या वडिलांनी ‘एफआयआर’मध्ये लिहिले आहे की, माझ्या मुलीने (श्रद्धा वालकर) 2019 मध्ये माझ्या पत्नीला सांगितले की, तिला आफताब अमीन पूनावालासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहायचे आहे. त्यांनी स्वतः आणि त्यांच्या पत्नीने तिचा हा निर्णय मान्य केला नाही. कारण, त्यांच्यात आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय विवाह करत नाहीत. त्यावर श्रद्धाने सांगितले ‘मी आता 25 वर्षांची आहे आणि मला माझे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मला आफताब अमीन पूनावालासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहावयाचे आहेच. आजपासून विसरून जा की, मी तुमची मुलगी आहे...’ तिने तिचे कपडे घेतले आणि आफताब अमीन पूनावालासोबत राहायला ती दिल्लीला निघून गेली.

shardha


आज पालकांना वाढत्या वयातील मुलांना सांभाळताना त्यांना समजून घेण्याची आणि त्यांच्या आधुनिक जगातील स्वातंत्र्यावर बंदी न आणण्याबद्दल आपण त्यांना सूचना देत असतो. पण, आता थोडासा वेगळा विचार करायची वेळ आलेली आहे. मुलांना स्वातंत्र्याचा उपभोग करू द्यावयास हरकत नाही, पण त्याचवेळी त्यांना जबाबदारीची जाणीव करून द्यावयास हवी. आयुष्याचे बरेवाईट आणि किचकट भावनिक अनुभव त्यांच्या पालकांसोबत उघडपणे व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य तरुणांनी अनुभवले पाहिजे. संवादाचे दालन बंद न करता, पालकांनी ते मुलांना भावनिक प्रतिसाद देण्यास उघडे ठेवले पाहिजे. येथे पालकांची नकारात्मक भूमिका आणि आडमुठेपणा यामुळे कुटुंबातील संवाद कोलमडून जातात. ते टाळले पाहिजे. कारण, संकटकाळी अशी एखादी श्रद्धा आपल्या आयुष्याला धोका दिसत असताना आपल्या आईवडिलांना हाक मारू शकली पाहिजे. जेव्हा पालक ‘रोमॅण्टिक प्रेम’ हा विषय ऐकतात, तेव्हा बरेच संतापतात आणि बिथरतात. परंतु, आपल्या भेदरलेल्या मुलांची तळमळ ऐकणे आणि ’संवाद’ (चर्चा) सुरू करणे, ही आज अत्यंत गरजेची गोष्ट आहे.

तिची अक्कल वारा खात होती का? अशा विकृत मुलाबरोबर जायचा मूर्खपणा करण्यापूर्वी या वयात तिला कळले नाही का? अक्कल, जाण, समज या गोष्टी कधी कधी दगा देतात आणि त्यातल्या त्यात आजची तरुण पिढी तशी बेधुंद वागताना दिसते. तसाही आजचा समाज बदलला आहे. नैतिकतेचे बंध सैल झालेले आहेत. व्यक्तिगत स्वातंत्र्याची व्याख्या आणि अनुभूती मुक्त व स्वयंकेंद्रित झाली आहे. वास्तविकता अशी आहे की, तुमच्या मुलामुलींच्या रागाच्या आणि निराशेच्या भावना, हट्टाने इतर लोकांसोबत जाणे आणि राहणे, भावनांचा आवेग रोखता न येणे आणि सामाजिक दिशानिर्देशांचे पालन न करता येणे, या आज सर्वसामान्य गोष्टी आहेत. यासारख्या समस्यांचे निराकरण करण्यात येणारे अपयश त्यांच्यातील वैचारिक असमर्थतेमुळे उद्भवते. त्यांचा राग आणि निराशा यांची उत्पत्तीदेखील योग्य अनुभव पाठीशी नसल्याने होताना दिसते.

 स्वायत्तता त्यांच्या एवढी डोक्यात गेलेली असते की, मदत मागण्याची इच्छा त्यांना नसते. अशा परिस्थितीत कुटुंबांना आणि तरुण पिढीला नवीन हिंसक जगाशी कसे जुळवून घेण्यास मदत करणे आणि महिलांवरील अत्यंत क्रूर हिंसाचार रोखण्याचे नवीन मार्ग शिकणे, ही आज काळाची गरज आहे. मुलांनी कितीही म्हटलं, तरी त्यांना एकटं न सोडणं हा एक महत्त्वाचा उपाय ठरू शकतो. परंतु, पालक आणि मुलांमध्ये विश्वासाचं नातं आणि प्रामाणिक जवळीक निर्माण होणं, आज गरजेचं आहे. वर्तमान परिस्थितीत मुलींसाठी तर ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आपली मुलगी प्रथम जगली पाहिजे, नंतर सांस्कृतिक मूल्ये आपल्याला जपता येणे शक्य आहे. पण, एका सर्वसाधारण मुलीचा असा निर्घृण खून होतो, तेव्हा बर्‍याच गोष्टींचा सामाजिक पातळीवर विचार व्हायलाच हवा, हे निश्चित. (क्रमशः)

-डॉ. शुभांगी पारकर

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.