सामाजिक न्याय-कल्याणासाठी...

    21-Nov-2022   
Total Views |
mansa


महाराष्ट्राच्या सामाजिक कल्याणात्मक वाटचालीमध्ये महाराष्ट्र महिला व बाल विकास सह आयुक्त रवींद्र पाटील यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या विचारकार्याचा घेतलेला मागोवा...


वर्णभेद, जातिभेद, लिंगभेद आणि सर्वच प्रकारच्या भेदांपलीकडे जाऊन मानवी करूणा आणि सहृदयतेने शोषित, पीडित, वंचित समाजघटकांसाठी काम करणार्‍या व्यक्ती या समाजाचे आधारस्तंभ असतात, दीपस्तंभ असतात. यापैकीच एक महाराष्ट्र महिला व बाल विकास सह आयुक्त रवींद्र शालिग्राम पाटील. एक प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी कधीच चौकटीत दिलेले आहे तेवढेच आणि तसेच निर्णय घेतले नाहीत. त्यापलीकडे जाऊन संवेदनशीलतेने त्यांनी प्रत्येक निर्णयासंदर्भात कृतीसंदर्भात कार्यवाही केली आहे. हातात अधिकार, मनात सामाजिक भान आणि त्याचबरोबर तर्कशुद्ध विचार करणारी बुद्धिमत्ता असलेली व्यक्ती समाजाच्या उत्थानासाठी किती प्रेरणादायी काम करू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे रवींद्र यांचे आजपर्यंतचे कार्य म्हणावे लागेल.

राज्यसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांची प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्या-ज्या ठिकाणी नियुक्ती झाली, त्या प्रत्येक स्तरावर त्यांनी सकारात्मक बदल आणला. सामाजिक क्षेत्रात अधिकारी व्यक्ती म्हणून त्यांच्या विचारकार्याचा इतका प्रभाव आणि विश्वास आहे की, शोषित, पीडित समाजघटकांच्या कल्याणासाठीच्या प्रत्येक योजनानिर्मिती, जागतिक स्तरावरच्या परिषदा यामध्ये रवींद्र नाहीत, असे होतच नाही. किंबहुना, या सगळ्यांमध्ये रवींद्र यांचा शब्द आणि दिलेला सल्ला मोलाचाच मानला जातो.मानवी तस्करी हा समाजाला लागलेला एक शापच. भारतात मुख्यत: नेपाळ आणि बांगलादेशमधून मुलींची तस्करी केली जाते. त्यांना जबरदस्तीने पळवून देहविक्रीच्या दलदलीत लोटले जाते. महिला व बाल विकास अधिकारी म्हणून जेव्हा अशा घटनांवर रवींद्र यांना काम करण्याची वेळ आली, त्यावेळी रवींद्र यांनी या दलदलीत फसलेल्या मुलींची सुटका, पुनर्स्थापना आणि पुनर्वसन या त्रिसूत्रीवर भर दिला.

1996 साली मुंबईच्या ’रेड लाईट’ परिसरात पोलीस प्रशासनाने धाड टाकली आणि 450 मुलींची सुटका केली. त्यातल्या 28 मुलींना सुरक्षिततेच्या दृष्टीने पुण्याला एका बालगृहात ठेवण्यात आले. त्या मुली नेपाळच्या होत्या. त्यांना पुन्हा नेपाळला पाठवायचे होते. त्यांच्या सुरक्षिततेची आणि त्यांना पुन्हा नेपाळला सुरक्षित पाठवण्याची जबाबदारी अधिकारी म्हणून रवींद्र यांची होती. रवींद्र यांनी या सर्व मुलींची काळजी पालकांच्या ममत्वाने घेतली. त्यांचे समुपदेशन केले, त्यांनी आयुष्याला पुन्हा सकारात्मकरित्या सामोरे जावे, स्वदेशी जाऊन चांगले आयुष्य घडवावे, अशी प्रेरणा या मुलींना दिली. या मुली ज्या दिवशी बालगृहात आल्या होत्या, तेव्हापासून ते बालगृह सोडून नेपाळला जाईपर्यंत मुलींच्या वागण्यात आमूलाग्र बदल झाला. बोलणे, वागणे आणि इतर सगळ्याचमध्ये चांगला बदल झाला. या मुली या सगळ्याचे श्रेय रवींद्र यांना देतात.

अशाच तस्करीने भारतात आलेल्या आणि देहविक्रीच्या जाळ्यात सापडलेल्या बांगलादेशी मुलींना बांगलादेशात पुन्हा सोडताना काय व्यवस्था प्रक्रिया असली पाहिजे, यासाठी बांगलादेशमध्ये दोन वेळा परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी रवींद्र यांनी मार्गदर्शन केले. गोवा सरकारने 2007 साली देहविक्री करणार्‍या महिलांची सुटका, पुनर्स्थापना आणि पुनर्वसन यावर नियोजन करण्याचे ठरवले. त्यामध्येही रवींद्र यांचे महत्त्वाची भूमिका आहे.2012 पासून देवदासी बनण्याचे प्रमाण कमी आहे. कारण, रवींद्र यांनी देवदासी कायद्यात सुचवलेली तरतूद. त्यांनी देवदासी कायद्यात स्पष्ट नमूद केले की, एखादी मुलगी देवदासी म्हणून सोडताना विधी केले जातात, त्या विधीचे आयोजक, तिथे उपस्थित असलेले सर्व आणि संबंधित सर्व यांना गुन्हेगार म्हणून शिक्षा द्यायला हवी.

या नवीन तरतुदीमुळे देवदासी बनवण्याच्या प्रथेला कुठेेतरी आळा बसला. तसेच घरगुती हिंसा विरोधी कायद्यामध्ये रवींद्र यांनी सुचविले की, या कायद्याचे संरक्षक त्या-त्या स्तराचे सर्वच प्रशासकीय अधिकारी असतील. त्यांनी या कायद्याची माहिती घ्यावी आणि आपापल्या स्तरांवर अंमलबजावणी करावी. प्रशासकीय अधिकार्‍यांना जबाबदारी दिल्यामुळे कायदा पारित केल्याच्या दुसर्‍या दिवसापासून त्यासंदर्भात कारवाई सुरू झाली. बालन्याय अधिनियम कायद्याच्या संशोधनामध्ये तर रवींद्र आणि त्यांच्या सहकार्‍यांमुळे आमूलाग्र बदल झाला. सुरक्षिततेसाठी मुलांना बालगृहामध्ये ठेवले जाते. पण, रवींद्र यांनी संशोधन केले की, विशिष्ट परिस्थितीमध्येच बालगृहात ठेवायला हवे. त्यासाठी काही नियम केले. त्याचा परिणाम असा झाला की, पूर्वी महाराष्ट्रात 1,150 बालगृहे होती, ती संख्या आता व्यवस्थित परीक्षण आणि नियोजन यामुळे 450 वर आली आहे.

समाजासाठी अत्यंत निष्ठावान, संवेदनशील असलेले रवींद्र मूळचे जळगाव- अचलपूरचे. वडील शालिग्राम एका खासगी कंपनीत कामाला, तर आई कमल या शिक्षिका. दोघेही समाजशील आणि प्रामाणिक. ते नेहमी रवींद्र यांना सांगत कधीच खोटे बोलू नकोस, कुणाचेही मन दुखवू नकोस.होईल तेवढी सगळ्यांना मदत कर. असो. पाटील कुटुंब नेहमी मूळ गावी जळगावला जात असे. काळाच्या पटलावर अर्थहीन झालेल्या काही रूढींमुळे महिलांना होणारा त्रास, घरगुती हिंसा आणि महिलांचे शोषण हे सगळे रवींद्र यांनी पाहिले. या दुर्बल, शोषित, वंचित घटकांसाठी आपण काम करायचे, हे लहानपणीच रवींद्र यांच्या मनात ठसले. त्या वयात घेलेला निर्णय पार पाडण्यासाठी रवींद्र यांनी अपार मेहनतीचे व्रतच घेतले. खूप अभ्यास करायचा, सामाजिक क्षेत्रात शिक्षण घ्यायचे आणि त्यातूनच या क्षेत्रात काम करायचे, हे त्यांनी ठरवले. जे ठरवले ते केले. रवींद्र म्हणतात की, “त्यांना प्रासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावरही सामाजिक न्याय, समाजकल्याण आणि उत्थान यासाठीच कार्य करायचे आहे. सामाजिक न्याय कल्याणासाठी व्रतस्थ असलेले रवींद्र पाटील हे समाजभूषण आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.