सार्वजनिक वाहतूक व्यवस्था

21 Nov 2022 19:55:14
pune

मोठी शहरे, शहरातून जाणारे महामार्ग, प्रमुख रस्ते यावरील वाहतूककोंडी टाळायची असेल तर सर्वोत्तम पर्याय हा या रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी होणे हाच आहे. कारण, साधारण दररोज पुण्याच्या आणि इतर महानगरांच्याही कोणत्या तरी भागातून वाहतूककोंडीची बातमी ही जणू ठरलेलीच.पुण्याची दिवसागणिक वाढणारी लोकसंख्या आणि घरागणिक वाढणारी वाहनांची संख्या बघता, उपरोक्त पर्याय उपयुक्त ठरेल असे वाटत नाही. कारण, पुण्याने आता इलेक्ट्रॉनिक वाहन खरेदीच्या बाबतीतदेखील आघाडी घेऊन आपले वाहनप्रेम अबाधित ठेवले आहे. अर्थात यात गैर आणि चुकीचे काहीच नाही, तथापि शहरात जी वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे, त्याला रस्त्यांवरील वाहनांची गर्दी हेदेखील एक कारण आहे, हे सगळ्यांनी समजून घेणे गरजेचे आहे. अर्थात, त्यासाठी वाहने खरेदीच करू नका, असा सल्ला देणेदेखील संयुक्तिक नाही. मात्र, ही वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी मानसिक तयारीची गरज आवश्यक आहे. काही वर्षांपूर्वी ‘दूरदर्शन’वर जेव्हा ‘वागळे की दुनिया’ ही मालिका दाखवली जायची तेव्हा त्यातून माणसाच्या गरजा आणि त्यापेक्षा तो बाळगत असलेल्या असंख्य अपेक्षा याची गल्लत झाली की कशी कुटुंब चालवताना कसरत करावी लागते, हे अतिशय प्रभावीरित्या दाखविले जात असे.ही आठवण यासाठी विशेषकरून द्यावीशी वाटते, कारण पुणे हे देशातील नव्हे, तर जगातील एक सर्वच दृष्टीने प्रगत शहर आहे. त्यामुळे येथील शहाणे लोक जर मुर्खासारखे वागू लागले, तर यामुळे पुण्याच्या प्रतिष्ठेला धक्का बसू शकतो. आता हेच बघा ना, अलीकडील काळात या वाहतूककोंडीचा केवळ पुणेकरांनाच नाही, तर येथे बाहेरून आलेल्या पाहुण्यांना देखील फटका बसला. त्यामुळे पुणेकर नागरिकांनी आता आपल्या शहराच्या प्रतिष्ठेसाठी आणि सततच्या वाहतूककोंडीच्या बदनामीतून वाचण्यासाठी आपल्याकडील वाहनांचा वापर आवश्यक कामांसाठी तर करावाच. मात्र, कोणताही किंतू न ठेवता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय स्वीकारावा. यामुळे रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी तर होईलच. पण कोंडी नक्की फुटेल. हो, पार्किंग व्यवस्थेचे काम यासाठी संबंधित प्रत्येक यंत्रणेला मात्र चोख करावेच लागेल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही देखील तितकीच सक्षम करावी लागेल.
प्रदूषणमुक्ती दुर्लक्षितच!

स्त्यांवर ई-वाहने धावणार म्हणजे प्रदूषणमुक्ती होणार, याचा अर्थ आता आपल्याला काहीच करायचे नाही, हा जो आविर्भाव आणला जातोय, तो भविष्यात घातक ठरणार की काय, अशी भीती सार्थ ठरू नये.आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियान’ ही संकल्पना केवळ जाहीर केली नाही, तर प्रत्यक्षातदेखील आणली. प्रदूषणमुक्त परिसराचे किंबहुना भारताचे हे पाऊल होते. अर्थात, यापूर्वी असे प्रयत्न झाले नाही असे नाही. मात्र, त्याचा प्रभाव कोठेच दिसत नव्हता. आता या अभियानामुळे गावे पुन्हा स्वच्छतेकडे वाटचाल करताना दिसत आहेत. तथापि, ही गती देखील पुरस्कार मिळविण्यापुरती मर्यादित झाली की काय, ही शंका घ्यायला वाव उरतो. कारण, ई-वाहनांची संख्या वाढू लागल्यानंतर आता ‘शहराची प्रदूषणमुक्तीकडे वाटचाल’ असे मथळे झळकू लागले. ई-वाहन हा एक जरुर पर्याय आहे. पण, त्यामुळे संपूर्ण प्रदूषणमुक्ती होणार हा जो आभास निर्माण केला, तोच मुळात घातक ठरू पाहतो आहे.पुण्यात तर आता ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग दिसतात, जागोजागी अस्वच्छता आढळून येते, सार्वजनिक ठिकाणेदेखील धुळीने माखलेली दिसतात. त्यातच ‘सर्व काही यंत्रणा करेल’ ही मानसिकतादेखील लोकांमध्ये प्रबळ होत चालली आहे. नद्या प्रदूषित होत आहेत. रस्त्यांलगतची वृक्षराजीदेखील धुळीने बरबटलेली दिसते. याला केवळ यंत्रणेला दोष देऊन चालणार नाही, तर आपण देखील तितकेच दोषी आहोत, हे लक्षात घेतले पाहिजे.प्रदूषणमुक्त परिसर ही काळाची गरज आहे. ई-वाहने आली म्हणून आपसुकच प्रदूषणमुक्ती होणार नाही, तर त्यासाठी सर्वांगीण सातत्य हवे; अन्यथा भविष्यात आपला परिसर प्रदूषणयुक्त राहिला म्हणून आज घरात जे पाच सदस्यांपैकी दोन रुग्ण आहेत, त्यात झपाट्याने वाढ होईल आणि येणारी उमलती पिढी तर प्रदूषणातच जन्म घेईल की काय अशी भीती वाटते. ती निरर्थक ठरविणे समाजाचे कर्तव्य आहे, ‘स्वच्छ भारत’ ही निरंतर प्रक्रिया आहे, तात्पुरती नव्हे!
-अतुल तांदळीकर
 
Powered By Sangraha 9.0