धन्यवाद! भारतीय स्त्रीशक्ती

20 Nov 2022 21:37:02
miss india

ज्युनिअर मिस इंडिया मुंबई’ची ऑडिशन दि. 20 नोव्हेंबर रोजी होणार होती. या कार्यक्रमात 4 ते 15 वर्षांपर्यंतच्या मुली सहभागी होणार होत्या. या ऑडिशनमध्ये सहभागी होण्यासाठी मुलींना तीन हजार रुपये अधिक 18 टक्के ‘जीएसटी’ नोंदणी शुल्क भरणे अनिवार्य होते. सहभागी सर्वच मुलींना आयोजकांकडून दोन हजार रुपयांची भेटवस्तू दिली जाणार होती. याचाच अर्थ सहभागी मुलींना दिली जाणारी भेटवस्तू त्यांनी भरलेल्या नोंदणी शुल्कातूनच मिळणार असणार. ‘ऑडिशन’मध्ये सहभागी होणार्‍या मुलींना ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ टीमकडून व्यवस्थित प्रशिक्षण देण्यात येणार होते. ‘मॉडेलिंग’, ‘फॅशन’, ‘फोटोशूट’ याबाबतचे प्रशिक्षण तर होतेच होते. तसेच याच माध्यमातून मुलींना टीव्ही सीरियल्स आणि चित्रपटातूनही काम करण्याची संधी मिळणार होती म्हणे. दि. 19 नोव्हेंबरपर्यंत संबंधित सगळे या कार्यक्रमाच्या तयारीत होते. मात्र, हा कार्यक्रम रद्द झाला. याचे कारण या कार्यक्रमाचे आयोजक ‘माय सिटी इव्हेंट्स इंडिया कॉर्पोरेशन’चे डायरेक्टर सरबजित सिंग यांना राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने समन्स बजावले. भारतीय स्त्रीशक्ती शक्ती संघटनेने राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगामध्ये या कार्यक्रमासंदर्भात तक्रार केली होती. संघटनेचे म्हणणे होते की, कार्यक्रमामुळे बालहक्कांचे हनन होतेे.
खरंच वय वर्षे चार असलेल्या बालिकेला ‘फॅशन’, ‘मॉडेलिंग’ वगैरेचे ज्ञान आकलन असते का? पालकांच्या दुराग्रहामुळे मुलींनी नकळत्या वयात अशा स्पर्धांचे तणाव का सहन करावेत? आयोजकांचे म्हणणे आहे की, ‘मॉडेलिंग’ आणि याच प्रकारच्या क्षेत्रात काम करण्यासाठी बालिकांना लहान वयातच प्रशिक्षण मिळते, ही एक उत्तम संधी आहे. पण आपल्यापुढे कोणत्या आणि किती संधी आहेत, याबाबत अजाण बालिकेला माहिती तरी असते का? उलट अशा ‘ऑडिशन’ आणि कार्यक्रमामुळे ती या स्पर्धेत जिंकण्याच्या-हरण्याच्या तणावाला बळी पडू शकते. सौंदर्यस्पर्धा आहेत. त्यामुळे या स्पर्धेत सुंदर दिसण्यासाठी बालिकांवर अनेक सौंदर्योपचार किंवा प्रक्रिया केल्या जाऊ शकतात. हे सगळे बालिकांनी का सहन करायचे? सगळ्यात वाईट की, सौंदर्य, शरीर आणि भौतिकता हेच सत्य आहे, याचे संस्कार या अजाण बालिकांवर होतील. या अशा स्पर्धा आणि त्यांच्या ‘ऑडिशन्स’ समाजाला पूरक नाहीच. भारतीय स्त्रीशक्तीने यासाठी पुढाकर घेतला. त्याबद्दल संघटनेचे अभिनंदन!
नशा जिहाद!

मी नुकत्याच दिल्ली पोलिसांनी मृत श्रद्धाच्या मित्रमैत्रिणींशी चौकशी केली. त्यानुसार कळले की, श्रद्धा आणि आफताब दोघांनाही अमली पदार्थांचे व्यसन होते. तर्क असेल, अंदाज असेल, पण आता हे स्पष्ट होते की, पारंपरिक धार्मिक कुटुंबातील श्रद्धाला आफतबाच का आवडला? तसेच आफताब तिला मारायचा, छळायचा, तरीसुद्धा तिला आफताबसोबतच का राहायचे होते? ती कठपुतळीसारखी त्याचे प्रत्येक म्हणणे का ऐकायची? असे काय होते आफताबमध्ये? तर याचे उत्तर एकच आहे, अंमली पदार्थांचे व्यसन. या व्यसनाने श्रद्धाचा घात केला. तिला हे व्यसन कसे लागले? कुणी लावले? याचा उलगडाही होणे गरजेचे आहे.कदाचित या नशेची तिला इतकी सवय झाली असेल की, ती स्वत:ला त्या नशेपासून वेगळी करू शकली नसेल. नशेच्या धुंदीत आफताबसारख्या नराधमाने तिचा गैरफायदा घेतला असेल. आफताबला विरोध केला किंवा त्याला सोडून गेलो, तर आपल्याला अंमली पदार्थ कुठून मिळणार? आपण कसे राहणार? तसेच आफताबकडे असे काहीतरी असेलच, ज्याचा वापर करून आफताब तिला त्याच्या मर्जीप्रमाणे वागायला भाग पाडत असेल. हे सगळे मनात आलेले विचार आहेत. पण यावरही विचार व्हायला हवा. श्रद्धाच्या मृत्यूनंतर अनेक खुलासे होत आहेत. अमली पदार्थांच्या नशेत त्याने श्रद्धाचा खून केला. पण, ही घटना श्रद्धापुरतीच मर्यादित नाही. डोळे आणि मन उघडे ठेवून पाहिले, तर जाणवते की, नशेच्या बाजाराने समाज पोखरला जात आहे. प्रत्येक शहरात प्रत्येक गावात एकतरी असे ठिकाण आहेच की, तिथे नशेचा व्यापार खुलेआम होतो. लहान मुलांना नशेडी बनवले जाते. अगदी पद्धतशीर सर्वेक्षण करूनच मुला-मुलींना हेरून त्यांना सुरुवातीला विनामूल्य अंमली पदार्थांची चटक लावली जाते. पुढे या मुलांकडूनच गुन्हेगारीची कृत्ये करवून घेतील जातात. अशाच प्रकारे शाळा-महाविद्यालयातल्या मुलींकडून तर देहविक्रीचा धंदाही करवून घेतला जातो. हे सगळे अत्यंत पद्धतशीरपणे सुरू आहे. ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’ने जे साध्य होत नाही ते या नशा जिहादने होत आहे. श्रद्धाच्या प्रकरणातून हे स्पष्ट झाले आहे. नशेचा व्यापार करणारे हे भयंकर दहशतवादीच आहेत. कारण, त्यांच्यामुळे कितीतरी निष्पाप जिवांच्या आयुष्याची राख रांगोळी होत आहे. अमली पदार्थांचा व्यापार करणार्‍या नराधमांच्या मुसक्या आवळायलाच हव्यात.




Powered By Sangraha 9.0