कुष्मांड नवमी म्हणजेच आवळा नवमीची गोष्ट

02 Nov 2022 12:43:30

navmi
कुष्मांड नवमी किंवा आवळा नवमी
 
 
 
आपण हल्ली पंचांग पाहतो का? ख्रिस्त जन्मानंतर सुरु झालेली कालगणना जगन्मान्य झाली आणि आपण सोयीची म्हणून ती वापरू लागलो. अशातच पंचांगाकडे आपले थोडे दुर्लक्ष झालेच. पण जर कधी पंचांग आपण वाचलेच तर तुम्हाला असे दिसेल की प्रत्येक दिवशी अपवाद वगळता काहीतरी दिनविशेष आहेच. आपल्या हिंदू संस्कृतीत सणांना आणि उत्सवांना फार महत्व दिलेले आहे. अनेक कथांच्या आणि प्रथांच्या माध्यमातून आपण पुढच्या पिढीला शिक्षण देत असतो, तसंच आपल्या संस्कृतीत होऊन गेलेल्या महान योध्यांचं आणि वीरांचं स्मरण करून देऊन त्यांच्या मनात हिम्मत जागृत करत असतो. आज आहे कुष्मांड नवमी किंवा आवळा नवमी. या दिवसाचं महत्व आपल्याला माहिती आहे का?
 
 
कार्तिक शुद्ध नवमीला कुष्मांड नवमी येते तिला अक्षय्य नवमी सुद्धा म्हणतात. या दिवशी श्री कृष्णाने कुष्मांड नावाच्या राक्षसाचा वध केला होता. प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा वाईट शक्तींचा प्रादुर्भाव होऊन ही पवित्र भूमी संकटांनी या अत्याचारांनी ग्रासली त्या त्या वेळी भगवान विष्णूंनी विविध कालसापेक्ष रूपं घेऊन दुष्ट शक्तींचा नायनाट केला. कुष्मांड नामक असाच एक क्रूर राक्षस होता. कार्तिक नवमीला या कुष्माण्डाचा वध झाल्याने हि नवमी कुष्मांड नवमी म्हणून साजरी केली जाते. काही भागात या दिवशी कोहळा कापून राक्षस वध केला जातो तर काही समाजात कोहळा आतून पोखरून तो सुवर्णाने किंवा मौल्यवान वस्तुंनी भरून तेवढी संपत्ती गरजूना दान केली जाते.
 
 
याच दिवसापासून द्वापार युगाचा प्रारंभ झाला. आणि याच दिवशी श्रीकृष्ण वृन्दावनातून मथुरेत आले होते. आणि म्हणूनच आजच्या दिवशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालण्याचा पायंडाही उत्तरेकडील भागात घातला गेला.
 
 
मग आवळा नवमीची कथा काय आहे? तर असे म्हंटले जाते की, लक्ष्मी देवी जेव्हा पृथ्वीवर अवतीर्ण झाल्या होत्या तेव्हा त्यांना हरी व हर या दोघांची पूजा करावी अशी इच्छा झाली. व त्या दोघांनाही जेवू घालावे असे त्यांच्या मनात आले. परंतु प्रथम कुणाला बोलवावे हा प्रश्न त्यांना पडला. अशावेळी एक कल्पना त्यांना सुचली, या दोघांनाही एकत्रित प्रसन्न करून घ्यावे व एकाच वेळी जेवावयास बोलवावे. म्हणून श्री शंकराला प्रिय तो बेल व कृष्णाला प्रिय ती तुळस. या दोन्ही वनस्पतींमध्ये जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म असलेली वनस्पती म्हणजे आवळा. लक्ष्मी देवींनी आवळ्याच्या झाडाखाली हरिहराच्या मूर्तींची स्थापना केली व भोजनाची सिद्धता केली. यावेळी भगवान विष्णूंनी आवळ्याच्या फळाला वरदान सुद्धा दिले. आजच्या दिवशी आवळ्याचे सेवन जो करेल त्याचे आरोग्य उत्तम राहील. हे दिवस साधारण ऑकटोबर महिन्यातले असतात. आवळ्यात शीतल गुणधर्म असल्याने या कालावधीत आवळ्याच्या रसाचे सेवन करणे उत्तम समजले असते.
 
 
Powered By Sangraha 9.0