कोल्हापुरात अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले!

02 Nov 2022 14:59:06

नितेश राणे
मुंबई : कोल्हापुरात 13 वर्षीय मुलगी गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असल्याने वातावरण तापले आहे. या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवण्यात आल्याचा आरोप केला जातो आहे. तर यामागे लव्ह जिहाद असल्याचा आरोपही हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजप नेते नितेश राणे कोल्हापुरमध्ये जाणार आहेत. याविषयी नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजनही केले आहे.
 
 
लव्ह जिहादवरून आक्रमक भूमिका घेणारे भाजप आमदार नितेश राणे बुधवार ता 2 रोजी कोल्हापुरात येणार असल्याने शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यासंबंधी असलेल्या मुलाने 13 वर्षीय मुलीला पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी मुलाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याच्या घटनेला 18 दिवस उलटले आहेत. तरीही अद्याप तिचा शोध लागलेला नाही. याबाबत वेगाने तपास करण्याची विनंती कुटुंबियांनी केली आहे.
 
 
मुलीचे नातेवाई आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी दोन दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. आम्हाला न्याय द्या, अन्यथा राज्यभरात सर्वत्र आंदोलन करू, असा इशाराही मुलीच्या नातेवाईकांनी दिला आहे. हे लव्ह जिहादचं प्रकरण असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात कोल्हापुरात जन आक्रोश आंदोलन करणार आहेत. आंदोलनात आमदार नितेश राणे सहभागी होणार आहेत. कोल्हापूरच्या भवानी मंडपातून जुना राजवाडा पोलीस ठाण्यावर नितेश राणे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चानंतर नितेश राणे पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत.
 
Powered By Sangraha 9.0