अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आज मतदान!

प्रचाराच्या अखेरच्या दिवसापर्यंत आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरूच

    02-Nov-2022
Total Views | 103
ANDHERI


मुंबई
:ऋतुजा लटके यांनी आज अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मतदान केले ‘१६६ अंधेरी पूर्व’ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर विरोधी पक्ष 'नोटा' या पर्यायाचा प्रचार करत असल्याचा आरोप ऋतुजा लटके यांनी निवडणूक आयोगाकडे केला आहे. या आरोपांबाबत पडताळणी करून कारवाई केली जाईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांनी दिली.




ही पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासूनच अनेक कारणांनी चर्चेत होती. कारण शिवसेनेत फूट पडल्यांनंतर आणि राज्यात सत्तांतर होऊन फडणवीस-शिंदे युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाने उमेदवार दिल्यानंतर शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे जात पक्षचिन्हावर दावा सांगितला. यादरम्यान निकाल देताना निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवले. यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला पक्षचिन्ह आणि पक्षच्या नावाचे पर्याय सुचविण्यास सांगितले. यात उद्धव ठाकरे गटाला मशाल या पक्षचिन्हासह उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळाले तर शिंदे गटाला ढाल-तलवार या पक्षचिन्हासह बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आले.


|
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे गट होता प्रयत्नशील




शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे गट शिवसेनेने लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली. तर भाजपनेही या निवडणुकीत उडी घेत मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविण्याची जय्यत तयारी केली होती. भाजपने मुरजी पटेल यांना निवडणूक रिंगणात उतरवत उद्धव ठाकरे गेटसमोर कडवे आव्हान उभे केले. यानंतर प्रचारालाही सुरुवात केली. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून भाजपच्या मुरजी पटेलांची उमेदवारी मागे घ्यावी आणि निवडणूक बिनविरोध करावी अशी विनंती केली होती. त्यावर फडणवीस यांनी आपण पक्षातील नेत्यांशी विचारविनिमय करुन याबाबत निर्णय घेऊ, असे सांगितले होते. कालांतराने पक्षातील नेत्यांशी विचारविनिमय करून भाजपने आपला उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, तरीही ७ उमेदवारांनी उमेदवारी कायम ठेवल्याने ही निवडणूक बिनविरोध न होता. आज या जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडते आहे.



अंतिम लढतीसाठीचे उमेदवार :
१. ऋतुजा लटके (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२. बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी - पीपल्स)
३. मनोज नायक (राईट टू रिकॉल पार्टी)
४.नीना खेडेकर (अपक्ष)
५.फरहाना सय्यद (अपक्ष)
६. मिलिंद कांबळे (अपक्ष)
७. राजेश त्रिपाठी (अपक्ष)

 
प्रत्यक्ष मतदान ते निकालकाळात निर्बंध कोणते ?

- निर्बंध कालावधी दरम्यान मद्यविक्री दुकाने व तत्सम बाबीं येथील व्यवहार, खरेदी-विक्री, देवाणघेवाण इत्यादींवर पूर्णतः बंदी असेल.
- धार्मिक स्थळांचा राजकीय वापर करण्यावर निर्बंध
- एकगठ्ठा पाठवण्यात येणाऱ्या लघु संदेशांवर (एस.एम.एस.), ध्वनीक्षेपकांच्या वापरावर निर्बंध
- कोणत्याही प्रकारची सभा, जाहीर सभा घेण्यास अगर मिरवणूक काढण्यावर निर्बंध
- मतदान केंद्रापासून २०० मीटरच्या परिसरात उमेदवारांचे तात्पुरते कार्यालय, संपर्क ठिकाण उभारण्यावर निर्बंध.
- माध्यमांवरील ओपिनियन पोल, सर्वेक्षण इत्यादी बाबींवर निर्बंध


यापूर्वीचे निवडणूक निकाल काय सांगतात ?
२०१९मध्ये झालेल्या निवडणुकांत शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांना ६२, ६१५ इतकी मत मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष आमदार मुरली पटेल यांनी ४५ हजार ८०८ इतकी मत मिळविली होती. या मतदारसंघात एकूण २ लाख ८६ हजार २८२ इतके मतदार असून २०१९साली झालेल्या निवडणुकांत ५३.४५ टक्के म्हणजेच १ लाख ५३ हजार २२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत प्रमुख मुद्दे
या मतदारसंघात प्रामुख्याने ५ मोठ्या झोपडपट्ट्या आहेत. त्यामुळे झोपडपट्टीतील नागरिकांचे पुनर्वसन हा याभागात प्रमुख विषय आहे. सामान्य लोकांना पाणी मिळावे, रस्त्यांचे काम सुरळीत व्हावे, झोपटपट्टी पुनर्वसनाची रखडलेली काम मार्गी लागावी अशा मुद्द्यांना घेऊन ही निवडणूक लढविली जाते आहे.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121