
मोबाईलमधील क्रूर खेळांमुळे मुलांमधील हिंस्रता वाढत चालली आहे, हे या भ्रमयुगातील कटू वास्तव. ‘ऑनलाईन’ नावाच्या संकटाने निरागस मनांची ‘एलओसी’ पार केली आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांच्या वाढलेल्या जबाबदारीची कवीला रास्त जाणीव आहे, असे संवेदनशील लेखन करणार्या शिक्षकांपैकी उमेश घेवरीकर हे एक उपक्रमशील शिक्षक. ते जसे मातृहृदयी शिक्षक आहेत, तसेच ते एक उत्तम कवीही आहेत. त्यांचा ‘शिक्षणाच्या कविता’ हा संग्रह ‘ग्रंथाली’ने नुकताच प्रकाशित केला. या संग्रहात केवळ 36 कविता असल्या, तरी या कवितेने अवघे शिक्षणविश्व आपल्या कवेत घेतले आहे. हल्ली आपला समाज शिक्षणाकडे अतिशय तटस्थपणे, त्रयस्थपणे आणि अलिप्तपणे पाहतो आहे. बिघडत चाललेल्या शिक्षणव्यवस्थेकडे समाजाचे लक्ष वेधण्यासाठीच कवीने हा कवितालेखनाचा खटाटोप केला आहे.
मला शिकवायला हवे त्यांना
अधिक जबाबदारीने, नेटाने आणि निष्ठेने
मला जागे राहायलाच हवे
किंवा
शिक्षण व्हावा पाया
अवघ्या समाजमंदिराचा
घडावा सुजाण नागरिक
शाळांनी देश घडवावा
आजच्या शिक्षणप्रक्रियेत शिक्षक हा एक यंत्र बनला आहे. तो सराईतपणे वर्गात जातो. प्रथेप्रमाणे तास संपवतो. सत्यनारायणाच्या कथेची निरर्थक बडबड प्रसादाच्या अपेक्षेने ऐकून घेत राहावी, तसे विद्यार्थी वर्षाअखेर ‘उत्तीर्ण’ नावाचा प्रसाद हातावर पडावा, या अपेक्षेने शिक्षकांची निरर्थक बडबड ऐकून घेत राहतात. शिक्षणप्रक्रिया इतकी गतिमान झाली की गडबडीत विद्यार्थी कधी ‘याचक’ बनले आणि आपण कधी ‘पुरोहित’ बनलो, हे समजलेच नाही, अशी प्रांजळ कबुली हा कवी देतो. विद्यार्थ्यांमध्ये सवयीने निरर्थक बडबडीचा प्रतिकार करण्याची क्षमता तयार झाली आहे. तरीही शिक्षक पाट्या टाकण्याचे काम करतोच आहे. कारण, ‘सवाल माझ्या रोजीरोटीचा आहे’ हे त्याला त्याच्यापुरते सापडलेले उत्तर आहे. ज्यावेळी शिक्षकाचे विद्यार्थ्यांशी मित्रत्वाचे नाते जुळते, तो क्षण सुंदरच असतो. खरेतर शाळेतील प्रत्येक क्षण आनंददायी असतो, पण फाजील कर्मकांडात गुंतल्यामुळे आम्ही या आनंदाच्या क्षणांना मुकलो आहोत. अशा सुंदर क्षणांची भलीमोठी यादीच कवीने तयार केली आहे.
एकेकाळी अ-आई, ब-बदक, क- कमळ अशी अक्षरांना आणि अंकांना ओळख होती. तो काळ सोज्वळ होता. आता अक्षरांनी आणि अंकांनी आपली जुनी ओळख गमावली आहे. आता तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात स्क्रीन आणि प्रोजेक्टर वापरून मुले यंत्रमानव बनतील की काय, अशी भीती कवीला वाटते. आपला एखादा विद्यार्थी गैरमार्गाला लागलेला दिसतो, तेव्हा कवी म्हणतो :
सप्तरंगात माखलेला माझाच चेहरा
मलाच भेसूर दिसू लागला
असे पराभवाचे प्रसंग कबूल करण्यासाठी जो प्रामाणिकपणा लागतो, तो कवीच्या ठायी निश्चितच आहे. या ओळींतून कवीची आपल्या पेशाप्रति असलेली बांधिलकी अधोरेखित झाली आहे.उत्कृष्ट शिक्षक कसा असावा, हे ठरवण्याआधी शिक्षण म्हणजे काय, हे समजून घेणे आवश्यक आहे. कारण,शिक्षकाची भूमिका व त्याचे कार्य हे शिक्षणाशी व विद्यार्थ्याशी जोडलेले आहे. शिक्षक आणि शिक्षण हे हातात हात घालून चालत असते. शिक्षणातून काय साध्य करायचे आहे, हे ध्यानी घेतल्याशिवाय कुठलाही शिक्षक उत्कृष्टतेकडे वाटचाल करू शकणार नाही. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा विकास कसा होतो, याची व्यवस्थित कल्पना असल्याशिवाय शिक्षक विद्यार्थी घडवू शकणार नाही.
आजच्या काळात निरनिराळ्या प्रकारची माहिती देणे यालाच शिक्षण समजले जाते. त्यामुळे विविध प्रकारची माहिती आपल्या विद्यार्थ्यांना पुरवणे हेच आपले काम आहे, असा समज शिक्षकांनी करून घेतलेला आहे. परिणामी, अधिकाधिक माहिती विद्यार्थ्यांना पुरवणारा शिक्षक आपल्याला उत्कृष्ट शिक्षक समजतो. परंतु, ज्ञान आणि माहिती या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे लक्षातच घेतले जात नाही. त्याही पुढे जाऊन जीवनात प्रत्यक्षात उपयोगी पडणारा शहाणपणा हासुद्धा शिक्षणातला महत्त्वाचा बिंदू आहे, हे नव्या शिक्षकाच्या ध्यानातही नसते. माहितीचे रूपांतर ज्ञानात करण्यासाठी अनुभव देण्याची व त्या ज्ञानाचे शहाणपणात रूपांतर करण्यासाठी विचार करण्याची एक महत्त्वपूर्ण पायरी असते, हे ध्यानात घेऊन आपले काम करणारा शिक्षकच ‘उत्कृष्ट शिक्षक’ ही बिरुदावली मिरवू शकतो. कारण, शिक्षणाचा उपयोग शेवटी जीवन जगताना करायचा असतो. याचे उत्तम उदाहरण या कवितासंग्रहातून दिसून येते. कवी उमेश घेवरीकर हे स्वतः शिक्षक असल्याने त्यांना अनेक गोष्टी बारकाईने टिपल्या आहेत. त्यामुळे या ’शिक्षणाच्या कविता’ काळजाचा ठाव घेतात.
शाळेची इमारत म्हणजे सिमेंट, गिट्टी आणि वाळूचा पद्धतशीरपणे रचलेला निर्जीव ढिगारा. पण, कवीच्या संवेदनशील मनाला हे मान्यच होत नाही. ही शाळा कवीला सजीव आणि सचेतन परिवारच वाटते. कोरोना काळात घेवरीकरांच्या कवितेतील शाळा उदास झाली आहे. कोरोनाच्या कहरात एकाकी पडलेली शाळा आपल्या विद्यार्थ्यांना म्हणते, ‘मिस यू बाळा!’
शाळा माणसाच्या जीवनाला कशी व्यापून उरते हे खालील ओळींतून व्यक्त झाले आहे
सुटते जरी ही शाळा
मनामनांत पुन्हा भरते
जीवननौका वादळातही
या शाळेमुळेच तरते
कवीला अपेक्षित असलेला देव हा दगडधोंड्यात नसून चालताबोलता विद्यार्थी हाच त्यांचा देव आहे. हा देव आणि देश शिक्षणरंगी रंगावा, हे कवीने मागितलेले कालोचित पसायदान आहे! शिक्षणक्षेत्रात दरवर्षी नवनवीन घोषणा जन्माला येतात. कधी सर्वशिक्षा अभियान तर कधी समग्र शिक्षा अभियान, कधी ज्ञानरचनावाद तर कधी अध्ययनक्षमता. हे सगळे शब्दांचे बुडबुडे आहेत, याची कवीला यथार्थ जाणीव आहे. औषधांची केवळ नावे बदलून मूळ आजार दूर होत नाही, हे कडवट वास्तव नाकारण्यात काहीच अर्थ नाही. अंतर्गत गुणांचा टेकू लावून आम्ही निकालाची टक्केवारी वाढवत असलो, तरी शाळाबाह्य मुलांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.
मातृहृदयी, सेवाभावी, हाडाचे शिक्षक
नेमक्या कितव्या वेतन आयोगानंतर
लाभणार आहेत या निरागस लेकरांना
प्लीज, सांगा ना गुरुजी!
वरकरणी सरळ साधा सोपा दिसणारा, तरीही सगळ्यांनाच निरुत्तर करणारा हा यक्षप्रश्न संवेदनशील माणसाचे काळीज आरपार चिरत जातो. हे असे का झाले? याचे उत्तरही दिले आहे. शिक्षण नावाच्या सरस्वतीच्या या पवित्र मंदिरात दलालांची टक्केवारी वाढली आहे. सरस्वतीच्या दरबारात नको ती भुतावळ जमली आहे. प्रगतीच्या नावाखाली सगळीकडे नुसती धूळफेक चालू आहे. खिरापतीच्या अंतर्गत गुणांनी आम्ही शालेय शिक्षणाचा अक्षरशः ‘निक्काल’ लावला आहे. समाजाची दिशाभूल करणारा फसवा निकाल शंभरीपार गेल्यामुळे सगळेच आपापली पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानत आहेत.शाळेत शिकत असताना राम आणि रहीम, मेरी आणि मीरा, किसन आणि हसन, गौतम आणि कृष्ण, संता आणि संतोष, लीला आणि लीली एकदिलाने राहतात, गुण्यागोविंदाने शिकतात. नंतर-
शाळा सुटते पाटी फुटते
राम आणि रहीम यांच्यात
भिंत का उभी राहते?
असा रोकडा सवाल कवीने उपस्थित केला आहे. खरे म्हणजे राम आणि रहीम यांच्यात अकारण जातीयतेची, धार्मिकतेची भिंत उभी राहते, हाच आमच्या शिक्षणव्यवस्थेचा पराभव आहे. या कविता म्हणजे जसे व्यवस्थेतील दोषदिग्दर्शन आहे, तसेच कवीने एक शिक्षक म्हणून अंतर्मुख होऊन केलेले आत्मपरीक्षणही आहे.
वाट शाळेची चालता
मला ती वाटावी पंढरीची
मी या कोवळ्या निरागस
लेकरांमध्ये पाहावी विठूमाऊली!
प्रत्येक शिक्षकाला जर शाळेची वाट ही पंढरीची वाट वाटायला लागली आणि निरागस लेकरांमध्ये विठूमाऊली पाहायची दिव्य दृष्टी लाभली, तर शिक्षणाच्या क्षेत्रातील सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटतील. तो दिवस लवकर उगवावा, हीच तर आपली सगळ्यांची प्रार्थना आहे!एकीकडे झोपडीत भरणार्या सरकारी शाळा आणि दुसरीकडे धनदांडग्यांचे चकचकीत ‘एज्युकेशन मॉल’ यातील विषमता आणि विसंगती कवीने ‘ंटीव्हायरस’ या कवितेत टिपली आहे. तरीसुद्धा खेड्यापाड्यातील मुलामुलींना हतबल न होता शिक्षणाची कास धरण्याचा सल्ला कवीने दिला आहे, असे सांगत ‘तुझी तूच सावित्री होशील’ असा विश्वास या कवीने दिला आहे. तो खरोखरच मौलिक आहे. कवीने लिहिलेले ‘शाळा’, ‘फळा’, ‘पुस्तक’, ‘लेखणी’ या शीर्षकाचे हायकूही वाचनीय आहेत.
गायक-वादक जसे नियमित रियाज करतात, तसा शिक्षकानेही ‘वर्ग’ नावाची आपली मैफल सजविण्यासाठी नियमित अभ्यासाचा रियाज करावा, हे सांगायला कवी विसरत नाही. या संग्रहातील कवितांची संख्या कमी असली, तरी या कवितेचा आवाका दांडगा आहे. आजचा काळ हा ‘डिजिटल’ तंत्रज्ञानाचा काळ आहे. शिक्षणक्षेत्रात नव्यानं होणारे बदल लक्षात घेऊन शिक्षकांना अध्यापन कार्याबरोबरच ‘डिजिटल’ स्वरूपाचं शैक्षणिक लेखन करावं लागेल. समोर असणारा प्रत्येक विद्यार्थी हा विचार, बुद्धी, ज्ञान व क्षमता याबाबतीत वेगळा असणार आहे, याची जाणीव ठेवून अध्यापन कार्यात ‘विद्यार्थी फोकस’ करता आला पाहिजे. शिक्षकाला विद्यार्थ्यांबरोबर समाज व समाजपरिस्थितीही वाचता येणं आवश्यक आहे. कारण, समाजाचं ‘चरित्र’ घडवण्याचं काम शिक्षकच करत असतात.
आजूबाजूला कितीही आव्हानात्मक परिस्थिती असली तरी ‘सारेच दीप कसे मंदावले आता’ असं न म्हणता नवे प्रकाश किरण दाखवण्याचं महत्त्वपूर्ण कार्यही शिक्षकालाच करावं लागेल, हे निश्चित. विद्यार्थी घडवताना खरं तर शिक्षक स्वतःलाही घडवत असतो. त्या दृष्टीनं आजन्म विद्यार्थी असणं ही खर्या शिक्षकाची ओळख असते. काळाबरोबर होणारे बदल टिपत त्यानं भविष्यात येऊ घातलेल्या अनेक गोष्टींशी स्वतःला जुळवून घ्यायला हवं, तरच शिक्षक म्हणून तो अधिक सक्षमपणे उत्तम काम करू शकेल.
काळाबरोबर येणारी नवी आव्हाने पेलताना त्यांच्याकडे केवळ समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिल्यास त्याचा अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत छान उपयोग करून घेता येईल. ‘झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा’ ही भूमिका इथं दिशादर्शक ठरेल. मरगळ झटकून कायम नावीन्यपूर्णतेचा ध्यास असणं अधिक महत्त्वाचं. ध्यास, आत्मविश्वास, कयास आणि अभ्यास ही चतुःसूत्री शिक्षक म्हणून आत्मसात करायला हवी. उमेश घेवरीकर यांचा ‘शिक्षणाच्या कविता’ हा कवितासंग्रह विचार करायला लावणारा व जख्खड झालेल्या मनाला विचाररूपी थप्पड देणारा आहे...
पुस्तकाचे नाव : ‘शिक्षणाच्या कविता’ (कवितासंग्रह)
कवी : उमेश घेवरीकर
प्रकाशक : ग्रंथाली, मुंबई
पृष्ठे : 56
मूल्य : 80 रु
-आशिष निनगुरकर