वि. श्री. जोशी यांची ग्रंथसंपदा-भाग-2

19 Nov 2022 21:11:29

वि. श्री. जोशी


 


वि. श्री. जोशी यांनी लिहिलेल्या ‘मृत्युंजयांचा आत्मयज्ञ’ या पुस्तकाची माहिती मी मागील लेखात दिली आहेच. जॅकसन वधाच्या खटल्याची बरीच माहिती या पुस्तकात आलेली आहे. या खटल्यात कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. फाशीचा दिवस ठरला. दि. 19 एप्रिल, 1910. विशेष म्हणजे आदल्या रात्री हे तिघेही क्रांतिवीर अगदी शांत होते. ते गाढ झोपी गेले. सकाळी त्यांना उठवावे लागले. स्नान करून त्यांनी प्रार्थना केली आणि भगवद्गीता हातात घेऊन ते शांत मनाने फासावर चढले. फाशी देणार्‍या माणसाला अनंत कान्हेरेने सांगितले “फाशीची फळी तू उडवू नकोस.. मीच ती फळी माझ्या पायाने उडवीन!” त्याचे हे लोकविलक्षण धैर्य बघून तुरुंगातील अधिकारी स्तंभितच झाले. ही फाशी ठाण्याच्या तुरुंगात देण्यात आली. वेळ गुप्त ठेवण्यात आली होती. लोकांना तुरुंगात काय चालले आहे हे अजिबात कळू नये म्हणून गावाच्या बाजूला उंच पडदा लावण्यात आला होता. निधड्या छातीच्या या वीरांना फाशी दिल्यानंतर त्यांची प्रेते आमच्या ताब्यात द्यावीत, ही त्यांच्या नातेवाईकांनी केलेली अगदी साधी मागणी अत्यंत कठोरपणे धुडकावून लावण्यात आली आणि सरकारने आपल्या संवेदनशून्यतेची प्रचिती आणून दिली. लाखमोलाच्या त्या तीनही देहांचे गुपचूप दहन करण्यात आले आणि त्यांची रक्षा कोणाच्याही हातात पडू नये म्हणून ठाण्याच्या खाडीत फेकून देण्यात आली!! जेथे दहन केले ती जागा धुण्यात आली; इतकेच नव्हे, तर सारवून स्वच्छ करण्यात आली.
 
 
कर्वे आणि देशपांडे हुतात्मा झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाचे कसे हाल झाले, याविषयी मागच्या लेखात मी सांगितले होतेच. कान्हेरे यांच्या दोन्ही बंधूंनासुद्धा सरकारी छळाला तोंड द्यावे लागले. वस्तुत: या दोघांचा या खटल्याशी काहीच संबंध नव्हता. पण, ‘’अनंताचे भाऊ असणे” हाच त्यांचा जणू मोठा अपराध होता. अनंताचे मोठे भाऊ गणेशराव यांना नोकरीतून तडकाफडकी काढून टाकण्यात आले. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. ते दोन वेळच्या जेवणालाही पारखे झाले. दुसरी सरकारी नोकरी मिळण्याची तर गोष्टच सोडा, त्यांना खासगी नोकरीसुद्धा कोणी देईना. कारण, प्रत्येकाला ब्रिटिशांची दहशत वाटत होती. ‘वालचंद’ कंपनीत ठेकेदार असलेल्या फाटक नावाच्या गृहस्थांनी ते धाडस काही काळ दाखवले. पण, नंतर तीही नोकरी गेली. त्यांचे धाकटे बंधू शंकरराव यांची कहाणी जास्त वेदनादायी आहे. अनंत कान्हेरे फासावर लटकले आणि शंकरराव यांना भूमिगत व्हावे लागले. पण, भूमिगत झाले तरी उपजीविका तर चालली पाहिजे! त्यामुळे त्यांनी मुंबईच्या गोदीमध्ये चक्क कोळसे वाहण्याचे-म्हणजे हमालाचे काम केले. पोलिसांना कुठून तरी सुगावा लागलाच. शेवटी कंटाळून ते स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाले आणि ‘माझा गुन्हा तरी काय‘ अशा आशयाचा प्रश्न त्यांनी पोलिसांना विचारला. शंकरराव यांना पोलिसांनी प्रथम ताब्यात घेतले आणि त्यांचा अतोनात छळ करत इतर क्रांतिकारक कोठे आहेत, हे काढून घेण्यासाठी प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. नंतर त्यांना सोडून देण्यात आले तरी त्यांचे नाव 27 वर्षे पोलिसांच्या काळ्या यादीत होते - ते शंकरराव यांच्यावर ‘लक्ष‘ ठेवून होते.
 
  
वि. श्री. जोशी यांच्या या पुस्तकात आलेली आणखी एक वीरगाथा आहे मदनलाल धिंग्रा याची. कोण होता हा मदनलाल? हा एक रुबाबदार पंजाबी तरुण होता. सावरकर लंडनमध्ये शिकायला गेले तेव्हा तोही तेथे गेलेला होता. कसा होता त्याचा स्वभाव? धाडसी पण खुशालचेंडू. देशभक्ती, स्वातंत्र्य याबाबतचे विचारही त्याला कधी शिवले नव्हते. पण, सावरकरांच्या सहवासात आला आणि अंतर्बाह्य बदलून गेला. सावरकर नावाच्या परिसाचा स्पर्श झाला आणि लोखंडाचे सोने झाले! भारतात आणि इंग्लंडमध्ये भारतीयांवर जे अत्याचार चालले होते, त्याने हा युवक पेटून उठला. असाच एक दिवस अत्यंत अस्वस्थ झालेला मदनलाल सावरकरांकडे गेला आणि त्याने तो ऐतिहासिक प्रश्न त्यांना विचारला, “हौतात्म्याची वेळ आली आहे काय?”सावरकर मोठ्या सूचकतेने उत्तरले, “जर एखाद्या हुतात्म्याचा निश्चयच झालेला असेल नि तो सिद्ध असेल तर हौतात्म्याची वेळ आलेली असलीच पाहिजे!” काही दिवसांतच मदनलालने कर्झन वायलीचा वध केला. सावरकर त्याला भेटण्यासाठी तुरुंगात गेले. पोलीस तेथेच उभे होते. त्यामुळे अधिक काही बोलणे शक्य नव्हते. सावरकर त्याला जे काही म्हणाले ते अतिशय अर्थपूर्ण होते, सगळ्या भावना नेमकेपणे व्यक्त करणारे होते. ते उद्गारले, “मी तुझ्या दर्शनासाठी आलो आहे!”प्रत्यक्ष आपला गुरू असे उद्गार काढतो आहे, हे ऐकल्यावर मदनलालला आपल्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे नक्कीच वाटले असेल!
 
 
वायलीचा वध करताना मदनलालने एक निवेदन स्वत:च्या खिशात ठेवले होते. त्याला पकडल्यावर पोलिसांनी ते निवेदन जप्त केले आणि दाबून ठेवले. पण, लंडनच्या वृत्तपत्रात ते प्रसिद्ध झालेच. कारण, त्याची एक प्रत सावरकर स्वत:जवळ बाळगून असावेत. या ओजस्वी निवेदनात मदनलाल म्हणतो, “माझ्या हौतात्म्याचा मला अभिमान वाटतो आहे... परमेश्वरापाशी माझी इतकीच प्रार्थना आहे की, हे कार्य यशस्वी होऊन मानवाच्या हितासाठी आणि परमेश्वराच्या वैभवासाठी ती स्वतंत्र होईपर्यंत याच मातृभूमीच्या पोटी मला पुनर्जन्म प्राप्त होवो आणि त्याच पवित्र कार्यात मला पुन्हा मृत्यू येवो!”
 
 
- डॉ गिरीश पिंपळे
 
 
 
Powered By Sangraha 9.0