स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलचं शरद पवारांचं भाषण : जसंच्या तसं

    18-Nov-2022
Total Views |

Sharad Pawar


भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अवमानकारक वक्तव्ये केलेली आहेत. महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेने साधा निषेधही नोंदविलेला नाही. याच वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात केलेल्या भाषणाची एक चित्रफीत व्हायरल होत आहे. यात शरद पवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल नेमकं काय म्हटलंयं याबद्दल आता चर्चा होऊ लागली आहे.

शरद पवार आपल्या भाषणात म्हणतात, "मायभूमीला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी एक ध्यास घेतलेलल्या आणि आयुष्यभर प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या महामानवाचं स्मारक आज उभं राहतंयं. एका दृष्टीने नवी पीढी, जी स्वातंत्र्यप्राप्तीच्या नंतर वाढलेली पीढी या महामानावाच्या संदर्भात कृतज्ञता व्यक्त करत आहे, ही अतिषय आनंदाची बाब आहे. मुंबई महापालिकेने अतिषय चांगल्या ठिकाणी जागा दिली आहे. समोर शिवछत्रपती साक्ष देत आहेत. मागे सागर आहे आणि याच स्वातंत्र्याच्या ध्यासामुळे 'सागरा प्राण तळमळला' ही लोकप्रिय कविसुमनं भारतमातेसाठी लिहीली. त्यामुळे अतिशय समर्पक अशा जागेवर ही वास्तू उभी आहे, असे प्रतिपादन शरद पवार यांनी यावेळी केले होते.


ते पुढे म्हणतात, "भारत स्वातंत्र्याच्या लढ्यात सामुदायिक शक्ती एकत्र झाली. लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अवघा भारत एकसंध झाला. संयमाच्या जोरावरही आपण अवघा देश पारतंत्र्यातून मुक्त करू शकतो हा इतिहास संपूर्ण जगापुढे ठेवला. ही गोष्ट निर्विवाद आहे. मात्र, १८५७च्या स्वातंत्र्याच्या लढाईनंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारसरणीतून शसस्त्र क्रांतींच्या विचारसरणीतून निश्चितपणाने लढा देण्याची प्रेरणा अनेकांना मिळावी ही गोष्ट आज मान्य करावी लागेल. सावरकरांनी वयाच्या १८व्या वर्षी स्वातंत्र्यसंग्रामात झोकून देण्याची धाडसी भूमिका त्यांनी दाखविली होती. मित्रमेळ्याची स्थापना असो वा नंतरच्या काळात उच्चशिक्षणासाठी परदेशातून परत आल्यानंतर जवळपास ५० वर्षांची शिक्षा भोगण्याची कामगिरी ही नव्या पिढीला प्रेरणा देणारी आहे.


त्यांनी केलेलं कार्य अतिषय कष्टाचं होतं. त्यांना या त्यागाची आणि कष्टाची मोठी किंमत चुकवावी लागली होती. घरावर ब्रिटीशांनी नांगर फिरवला. मुंबई विद्यापीठानं दिलेली पीएचडी परत घेतली. एखाद्याच्या व्यक्तिगत जीवनात शोक व्यक्त व्हावा, अशी प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. पण शोकाला श्लोकत्व देण्याची भूमिका त्यांनी दिली. ज्या ज्या प्रसंगांना तोंड देण्याचा प्रसंग त्यांच्या आयुष्यात आला होता. त्यावेळच्या भावनांचं स्वरुप त्यांनी महाकाव्य निर्मिती करुन केली, अशी स्तुतीसुमने पवारांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वाहिली होती.






आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.