झाई सी आणि अग्निशीखा..

    18-Nov-2022
Total Views |

राणी लक्ष्मीबाई

१९ नोव्हेंबर हा राणी लक्ष्मीबाई यांचा जन्मदिवस. आज आपण थोडे मागे वळून बघतांना त्यांच्या गोष्टी पुन्हा स्मरत इतरांसमवेत त्याची उजळणी करू आणि राणीला अभिवादन करु.
 
 
"झाई सी"
 
लक्ष्मीबाईंचा उल्लेख करताना आपण नेहमी झाशीची राणी असा करतो आणि त्यायोगे झाशीचादेखील. झाशी हे बुंदेलखंडातील एक ऐतिहासिक शहर. त्या शहराचा उल्लेख करताना आपल्या तोंडी नावे येतात ती राणी लक्ष्मीबाई, मेजर ध्यानचंद, आणि राष्ट्रकवी मैथलीशरण गुप्ता ह्यांच्या सारख्या सुप्रसिद्ध व्यक्तींची.
 
 
नीचे में पूना, ऊँचे पे काशी ।
सबसे सुंदर बीच में झाँसी ।।
 
अशा सगळ्यांच्या परिचयातील ह्या शहराला झाशी हे नाव कसे पडले हे प्रथम आपण जाणून घेऊ. हे शहर १८५७ पासून राणी लक्ष्मीबाईच्या पराक्रमाशी जोडले गेले आहे. हे शहर ९व्या शतकात वसले असे सांगतात. तेथील किल्ला ओरछा शासक वीरसिंह बुंदेला याने १६१३ मध्ये बांधला होता. असे सांगतात की, राजा वीरसिंग बुंदेला यांना दूरवरच्या त्या टेकडीवर सावली पडलेली दिसत असे. तेथे अंधुक प्रकाश असे. तेथील लोकांच्या बुंदेली भाषेत 'झाई सी' असा एक शब्द आहे. ह्याचा सामान्य भाषेतला अर्थ प्रचलित होत होत पुढे त्याचे नामांतर झाशी असे पडले. १७३४ मध्ये छत्रसालच्या मृत्यूनंतर बुंदेलखंड प्रदेशाचा एक तृतीयांश भाग मराठ्यांना देण्यात आला. नंतर ते मराठा राज्य झाले.
 
 
वादातीत व्यक्तीमत्व..
 
 
नेहमी हाॅकीच्या मैदानावरून जा ये करताना मनात जशी ध्यानचंदांची आठवण सदा येत असते तशी आठवण पुण्यात जंगली महाराज रस्त्यावरून जाता येता राणी लक्ष्मीबाईंची देखील येत असते. अनेक मराठमोळ्या स्त्रीया साडी, ड्रेस, जीन्स अशा पहेरावात स्कुटरवर जातायेता आपण बघत असतो. अनेकजणी नऊवारीचा देखील वापर करत असतात पण ह्या राणीने तसेच शिवरायांच्या काळातील योध्यांनी जणू नुऊवारीचा सन्मानच केलेला आहे. देशात राणीचे अनेक पुतळे आहेत पण पुण्यातला हा पुतळा मलाही विशेष वाटतो. पुरुषांसारखा वेष परिधान करुन स्वातंत्र्यासाठी लढताना बलिदान देणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई या स्त्रीचा पुतळा आणि मराठी संगीत रंगभूमीवर आयुष्यभर स्त्रीची भूमिका करणारे नटसम्राट बालगंधर्व या पुरुषाचा पुतळा एकाच ठिकाणी म्हणजे संभाजी उद्यानानजीकच्या परिसरात आहेत, असे हे जगातील एकमेव स्मारक असेल.
 
 
पुणे महानगर पालिकेतर्फे साकारण्यात आलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमात महाराष्ट्राच लाडक व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे यांनी या वैशिष्ट्याचा उल्लेख आपल्या भाषणात तेंव्हा केला होता. तेथील चौकाचेही झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक असे नामकरण करण्यात आले आहे. अश्वारूढ पुतळ्याच्या चौथऱ्याची कोनशिला तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते १६ ऑगस्ट १९५७ रोजी बसविण्यात आली. त्यानंतर अवघ्या वर्षभराच्या आत म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मृतिशताब्दीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १८ जून १९५८ रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण झाले होते. या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी राणी लक्ष्मीबाई यांचे नातू लक्ष्मणराव दामोदरराव आणि पणतू कृष्णराव हे दोघेही उपस्थित होते. पुण्यातल्या एकाच परिसरात असलेल्या ह्या स्मारकाचा आपण उल्लेख केला. ह्या राणीच्याच गावात एका जादुगाराचेही स्मारक आहे. तो जादूगार म्हणजे हाॅकीचा जादूगार मेजर ध्यानचंद. त्यांचाही भव्य पुतळा झाशीच्या टेकडीवर उभारलेला आहे.
 
 
 
 
राणी लक्ष्मीबाई
 
 
 
ही राणी खरच नशिबवान, तीच्या पुतळ्यावरुन, तीच्या स्मारकावरून, तीच्या तारखांवर वाद झाल्याचे आजपावोतो कोणाच्याच ऐकिवात नाही आणि नसेल.
 
 
पुण्याच्या ऐतिहासिक लाल महालातील समूह शिल्पांमध्ये उभा असलेला दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलविण्यात २०१०साली समाजातल्या काही घटकांनी गदारोळ घातलेला आपण जाणतो. तसेच सप्टेंबर २०२२मध्ये गुजराथ मधील महिसागर जिल्ह्य़ातील कदना ह्या गावच्या एका प्रसिद्ध धरणक्षेत्रात विकसीत केलेल्या पर्यटन स्थळी भगवान बिरसा मुंडाचा ऑगस्टमध्येच उभारण्यात आलेला पुतळा पाडण्यात आला होता. पुण्यातील संभाजी उद्यानाच्या जिथे राणीचा पुतळा आहे तिथेच बागेतल्या आतल्या भागात असलेला मराठी भाषेचे शेक्सपिअर म्हटले जाते, त्या राम गणेश गडकरी यांचा पुतळा काही समाजकंटकांनी तेंव्हा उद्ध्वस्त केला होता.
 
 
झाशी फक्त २०वर्षांची?
 
 
झाशी ऐतिहासिक आहे असे जरी आपण मानत असलो तरी राणीच्या झाशीच्या नगरातील शासकीय 'झाँशी नगर निगम 'ने त्या झाचीच्या जन्मतिथीवरुन वाद निर्माण केलेले माझ्या वाचनात आले. राणींसारख्या व्यक्ती वादातीत असल्या तरी त्यांच्या सरकारी स्तरावरील झाशी नगर निगमने मात्र वाद निर्माण केले आहेत. "झाशीचा उदय होऊन फक्त २० दिवसच झालेत" हे एका वृत्तपत्रत वाचल्यावर आपण चक्रावून जाऊ ना? पण सरकारी गॅझेटीयर मधे तसा उल्लेख केला असल्याचे वृत्त वाचनात आले. ऑक्टोबर २०२२च्या वृत्तात त्याचे खुलासेवार वृत्त निट वाचल्यावर त्याचे काय प्रकरण आहे ते समजले. झाशी नगर निगमने झाशीची जन्मतारीख ७ फेब्रुवारी २००२ असल्याचे जाहीर केले होते. ह्या जन्मतारखेवर तेथे प्रचंड वादंग निर्माण झाला होता. मग तेथे सदस्यांचे मंडळ स्थापन केले होते. त्यात इतरांबरोबर इतिहास तज्ञांचा समावेश केला गेला. आता ते निस्तरण्यात येत आहे. झाशीच्या गौरवशाली इतिहासाची नोंद आपण देशविदेशात बघतो. ज्या दिवशी झाशी नगर निगमची सरकारी अधिसूचना आली व ते नगर निगम बनले ती तारीख अधिकृत करण्यात आली होती.
 
 
लेखकप्रिय व लोकप्रिय राणी...
 
 
पुलंपासून ते आपल्या सारख्यांपर्यंत सगळे लष्करी पोशाखात हातात समशेर पाठीवर बाळ घेऊन अश्वारुढ असलेल्या त्या राणीबद्दल सतत बोलत, ऐकत, बघत असतात. अरण्येर अधिकार ह्या बिरसा मुंडांवर उत्कृष्ट लेखन केलेल्या सुप्रसिद्ध लेखिका महाश्वेता देवी ह्यांचे बंगाली भाषेतले हे सगळ्यात पहिले पुस्तक म्हणून ओळखले जाते. त्यांचा नागपूरच्या श्रीमती नीता प्रभाकरराव पुल्लीवार ह्यांनी केलेला हिंदी अनुवाद मी वाचला होता. तसेच आजून एक श्रीयुत राजेंद्र देशपांड्यांचं "अग्निशिखा" हे पुस्तक माझ्या वाचण्यात आले. लेखकप्रिय व्यक्तींमधे ज्या लाडक्या व्यक्तिरेखा असतात त्यातील झाशीच्या राणीचे नाव अग्रभागी येते. आपण ती पुस्तक वाचतो व इतरांनाही ती वाचण्यास प्रेरित करतो. झाशीची राणी ह्यांची प्रसिद्धी जशी वाचकवर्गात आहे तशीच प्रसिद्धी चित्रपट, नाट्य क्षेत्रातही आहे. वि वा शिरवाडकर ह्यांनी त्या राणीवर लिहीलेले "वीज म्हणाली धरतीला" हे नाटक प्रसिद्ध आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या पराक्रमाने आणि जिद्दीने वि वा शिरवाडकरांसारखा प्रतिभावंत लेखक प्रभावित झाला नसेल तरच नवल. हे शिरविडकरांचे विशेष आवडते नाटक. ते म्हणाले होते की, 'राणीचा शोकांत अटळ होता, कारण तिची स्वातंत्र्यश्रद्धा काळाच्या पुढे जाणारी होती.'
 
पहिल्या स्वातंत्र्य युद्धातील सहभाग आणि स्त्रीशक्तीचे दर्शन हे दोन्ही पैलू लोभसवाणे आहेत. हिंदूस्थानातला पहिला सशस्त्र उठाव १८५७मध्ये झाला तेंव्हा शस्त्रबळ कमी असूनही अनेक विरांनी झूंज दिली. त्यात लक्ष्मीबाई तर होत्याच शिवाय तिला साथ देणार्या जुलेखा सारख्या सहचरणी होत्या. जुलेखाने तर रणांगणावरही आपले कला प्रेम सोडले नव्हते. निरनीराळे धर्म, भिन्नभिन्न सामाजिक स्तर ह्यामधल्या स्त्रीयाही एकत्र येऊन लढा कसा चालू ठेवत राणीला साथ देत होत्या ह्याच चित्र ह्या नाटकात आढळते. त्यामुळे लक्ष्मीबाईंइतकीच जुलेखा ही व्यक्तिरेखाही प्रभावी ठरते, मनाचा ठाव घेते. निव्वळ स्वातंत्र्य संग्रामातले एक पान म्हणून न पाहता देशप्रेमाने प्रभावित झालेल्या ह्या स्त्रीयांच्या व्यक्तिगत जीवनाकडेही नाटककाराने पाहिल्याने ह्या नाटकाला वेगळेच परिमाण प्राप्त झाले आहे. १३ मार्च १९७०रोजी ह्या नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता. त्यानंतर त्याचे अनेक प्रयोग झाले. एवढ्यात मात्र त्याचे प्रयोग झाल्याचे ऐकिवात नाही कारण सातत्याने प्रयोग न होणार्‍या शिरवाडकरांच्या काही नाटकांपैकी राणीवरचे हे नाटक आहे. पण ऑक्टोबर २०१९मध्ये आकाशवाणीच्या पुणे केंद्राने भरत नाट्य मंदिर निर्मित ह्याचे आकाशवाणी रुपांतर ऐकवले होते. आजपावेतो ते नाटक पुन्हा बघण्याचा योग आला नाही. नाट्यगुण व काव्यगुण यांचा अप्रतिम संगम ज्यात आहे असे 'वीज म्हणाली धरतीला'चे सादरीकरण समाजासमोर वारंवार व्हायला पाहीजे तसेच राणीच्या जिवनपटाचे अभिवाचन, राणीवरील विपूल साहित्यकृती सतत समोर येत राहिली पाहीजे म्हणजे त्या स्वातंत्र्यविरांना समजून घेण्याची संधी पुढच्या पिढीला मिळत राहील.
 
 
 
 
राणी लक्ष्मीबाई
 
 
 
 
मनु ..
 
 
झाशीच्या राणीचे जन्मापासून ते स्वर्गवासापर्यंतच्या जीवनपटाबद्दल आपण जाणतोच. त्यातल्याच त्या ब्रम्हावर्तातल्या त्या मनुला चूल-बोळक्यांपेक्षा तलवार बंदुकांचे खेळच आधिक आवडायचे. पेशव्यांकडेच ती लहानाची मोठी झाली असल्याने तीचे खेळकर जीवन सर्वांना आवडत असे. नानासाहेब, रावसाहेब, बाळासाहेब हे तीचे बालमित्र. त्यांच्यासोबतच ती मैदानी खेळ, दांडपट्टा, तलवार, घोडेस्वारी, भालाफेक, बरची, जांबिया चालवणे शिकली. शिवाय अश्वपरीक्षाही त्यात आलीच. कधी कधी तर घोडसवारीत ती नानांच्या पुढे जाई. असे तीचे बालपण गेले होते. गंगेच्या घाटावरची विजेचे पंख लावून वावरणारी ती मनु पेशव्यांनी अनुभवली होती. एकूणच झाशीच्या राणीचे चरित्र स्फूर्तीदायी आहे. १८५७ च्या संग्रामात आधी झाशी, नंतर काल्पी आणि शेवटी ग्वाल्हेर येथील लढायांमध्ये आपल्या असामान्य क्षात्रवृत्तीची चुणूक दाखवून तिने ब्रिटिशांना चकित केले. झाशीचा किल्ला घेण्यासाठी ब्रिटीश सेनापतीला शेवटी फितुरीचा आश्रय घ्यावा लागला. आपल्या पुत्राला पाठीशी बांधून लढाई करणारी अशी असामान्य स्त्री जगाच्या इतिहासात क्वचितच सापडू शकते.
 
 
राणीच्या सहकारी महिला..
 
ह्या धैर्यशील राणीला महिला सहकारीदेखील जिवाभावाच्या मिळत गेल्या. राणी जेंव्हा झाशी संभाळत ब्रिटिशांना लढा देत होती तेंव्हा तीच्या गडाच्या साध्या एका एका तटावर शंभरावर स्त्रीया दक्ष होत्या. लढवय्ये तयार करत अशी माणस तयार करण्याची तिची किमया अनेक पुरषांनाही साध्य होत नसायची. राणीच्या सैन्यातल्या सुलेखा सारख्या सहकारी तोफखान्यात जमादाराचे काम करणाऱ्या व मुलांसारखा शंभरावर मुली राणी कडे होत्या. त्या राणीकडून शिकलेल्या स्त्रीया पुढे अनेकांशी चर्चेस जात तेंव्हा त्या आपला कोणताही शब्द कधी जमिनीवर पडू देत नसत.
 
अग्निशिखा..
 
 
मनाने आपल्या अंतःकरणातील प्रखर तेजाचे वाटप राणीने भोवतालच्या लोकांना उत्तम केलेले सगळ्यांना आढळून येत असे. इंग्रजांविरुद्धच्या युद्धात ती न डगमगता शत्रूशी सामना करत असे. जेंव्हा किल्ल्याला वेढा पडत असे तेंव्हा तीची मर्दुमकी तीचे शौर्य सगळ्यांना अचंबित करत असे. युद्धात इंग्रजांच्या तोफा घडीभरही उसंत देत नसत. तटावर आणि शहरामध्ये दिवसरात्र आगिची बरसात होत असायची. किल्यावरुन गावाकडे पाहिले की नजर फाटून जाईल असे देखावे दिसत. मोठमोठ्या इमारती गंजिफांच्या घरांसारख्या कोसळून पडत असत. विहरी आणि टाक्या फुटून रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहताना दिसत. तेल-तुपाच्या वखारी पेटून सारे आकाश ज्वाळांनी भरुन जाई. निराधार भयभीत लोकांच्या झुंडी पेठेपेठेतून सैरावैर्या धावत असत. संपत्तीचा व जिवाचा संहार किती चालत असे ह्याचा तर हिशेबच नसे. आणि ह्या प्रलयामध्ये ही महालक्ष्मी कोसळते आकाश हातावर घेऊन पहाडासारखी उभी असायची. त्या राणीला ना धड झोप मिळे ना जेवण, सारख्या घोड्यावर स्वार असायची ती. गोळ्यांच्या वर्षावात सारा कोट पायाखाली घालत आणि गोलंदाजांना सहाय्य व सुचना करत असायची ती. कुठे तटाला खिंडार पडले की कामगारांबरोबर स्वतः काम करुन ते बुजवून घेत. पेठेत जाऊन लोकांना दिलासा देत हौजेत जाऊन स्वतःच्या हाताने भाकरी वाढत. दुःखीतांची आसवं पुसत असे. बंदूकींच्या फैरी झाडीत हल्ले परतवणाऱ्या सैनिकांमध्ये स्वतः सामील होत असे.
 
 
 हिला मातीने माया दिली आणि आकाशाने तेज दिले; अशी मुलखावेगळी ही मूर्ती कशी उभी राहिली असेल असे त्या राणीला बघताना सगळ्यांना वाटे. नक्षत्रांनाही हस्तगत करणारी अंतःकरणात जिद्द आहे. मनगटात पराक्रम आहे पण ह्या सार्‍या गोष्टींनाही शेवट असतोच ह्याचे तीला भान आहे. राणीला जेंव्हा स्वकियांनीच दगा दिला होता आणि त्यामुळे इंग्रज फौज टोळधाडी सारखी जेंव्हा शहरात शिरली होती, शहर शत्रुने काबीज केले होते तेंव्हा राणीला सगळे सांगत होते की आपण पराभूत व एकाकी झाले आहोत तेंव्हा राणीचे उत्तर होते की ही गोष्ट पत्करायला हवे की आपण एकाकी झाले आहोत, पण पराभव बाहेरून होत नसतो तो आतून होतो. आपलाच माणूस जेंव्हा फितूर होतो तेंव्हा त्याला गोळी घातल्याचे कळाल्यावरही ह्या राणीने फर्मान काढले होते की 'ते आमचे मानकरी होते इतमामात त्यांचा अंत्यसंस्कार व्हायला हवा'. अशी ही राणी म्हणजे आदर्शवत अशीच होती.
 
 
स्वहस्ते स्वर्ग बांधणारी..
 
 
कोणालाही खर वाटणार नाही असं एक नवीन जग ह्या टोपीकरांच्या मुलखात राणी आणि तीच्या सहकार्यांनी निर्माण केले होते. पुणे मुंबई कलकत्ता येथे चाललेल्या घडामोडींच्या वार्ता तीच्या कानी येत असत. आपली हत्यारे आणि त्यांची हत्यारे ह्यांच्यातला भेद राणी जाणून होती. ते टोपीकर इतके पुढे गेलेले, शस्त्रास्त्रांसह पुढारलेले नसते तर मिशीला पीळ भरणारे आमचे प्रतापशाली राजे बाहुल्यांसारखे त्यांच्या समोर कोसळलेच नसते हे राणीला कळत होते. हे खरं आहे म्हणून आपण स्वस्थ रहायचं? त्यांच्या गुलामगिरीतून साखळदंड आम्ही आमच्या गळ्यात दागीन्यांसारखे बांधून घ्यायचे? हा प्रश्न तीला पडलेला असायचा अन त्यावर ती म्हणायची की, माणसं पुढारलेली असोत, मागासलेली असोत, ज्ञानी असोत वा अडाणी असोत, धनवान असोत वा कंगाल असोत; खरकट्यावर जगणाऱ्या कुत्र्याच जिण नशिबी येण हा माणसाचा सर्वात मोठा अपमान आणि अधःपात आहे असे मला वाटते. इंग्रजांच्या जहाजातून येणारा स्वर्ग मी नाकारीन. माझा स्वर्ग मला माझ्या हाताने मला इथे बांधता आला पाहीजे. त्यासाठी आज स्वतःला ह्या चिखलात गाडून घेयलाही मी तयार आहे. ही तिची भावनाच तीला तारणारी होती. साधकांच्या श्रद्धेतून आणि बलिदानातून सिद्ध झालेला यज्ञ केंव्हाही विफल होत नसतो हे तिला तीच्या गुरुंनी पढवलेले असल्याने ती थोर होऊ शकली होती.
 
 
मेरी झासी नही दूँगी..
 
 
७ मार्च १८५४ रोजी इंग्रजांनी एक राजघोषणा प्रसिद्ध करून झाशीचे संस्थान खालसा केले. राणी लक्ष्मीबाई या अन्यायामुळे जळफळत असतांनाच इंग्रज अधिकारी मेजर एलिस लक्ष्मीबाई यांना भेटण्यासाठी आला. त्याने झाशी संस्थान संपुष्टात आणल्याची राजघोषणा वाचून दाखवली. संतापलेल्या राणी लक्ष्मीबाई यांच्याकडे एलिसने परत जाण्याची अनुज्ञा मागताच चवताळलेल्या वाघिणीप्रमाणे त्या म्हणाल्या,''मेरी झासी नही दूँगी!'', हे ऐकून एलिस निघून गेला पण जाताना तोही मनातल्यामनात ह्या राणीला सलाम करत होता.
 
 
अशी ही महाराणी लक्ष्मीबाईसाहेब गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई, (नोव्हेंबर १९, १८३५ - जून १७, १८५८) या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ. स. १८५७ च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. ह्या सेनानी सारख्या आजून सेनानी आपल्या महाराष्ट्रातही बनत आहेत. अशा अनेक संस्था आपण बघतो त्यातील झाशीच्या राणीच्या नावाने मुलींची सैनिकी शाळा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने काढली आहे. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा , कासार -आंबोली , जि . पुणे येथे काढून राणीचे नाव सगळ्या मुलींना प्रेरणा देत आहे.
 
 
त्या राणीला आपल्या सारख्या जनमानसात जो सन्मान आहे तो आपण ह्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी काळात प्रदर्शित करत आहोत. त्यातला एक भाग म्हणून राणीच्या झाशीत ७५ ठिकाणी दिप प्रज्वलन करुन आपली मानवंदना ते झाशीकर देत आहेत.
 
 
जाताजाता कवीवर्य भा. रा. तांबे ह्यांचे राणीवरचे काव्य स्मरु :
 
 
हिंदबांधवा ! थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी ।
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झांशीवाली ।।
तांबेकुलवीरश्री ती
नेवाळकरांची कीर्ति
हिंदुभूध्वजा जणु जळती ।
मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली ।
रे हिंदबांधवा ।।१।।
घोड्यावर खंद्या स्वार
हातात नंगि तलवारखणखणा करित ती वार
गोर्‍यांची कोंडी फोडित पाडित वीर इथे आली
रे हिंद बांधवा ।।२।।
कडकडा कडाडे बिजली
इंग्रजी लष्करे थिजली
मग कीर्तिरूप ती उरली
ती हिंदभूमीच्या पराक्रमाची इतिश्रीच झाली
रे हिंद बांधवा ।।३।।
मिळतील इथे शाहीर
लववितील माना वीर
तरू, झरे ढाळतील नीर
ह्या दगडा फुटतील जिभा
कथाया कथा सकळ काळी
रे हिंद बांधवा ।।४।।
 
तांब्यांची मनु, पेशव्यांची छबेली, नेवाळकरांची सून, झाशीची राणी लक्ष्मीबाई हीचा आज जन्मदिवस. आपण सारे ह्या अजरामर राणीला सतत स्मरणात ठेवत तिच्यासोबतच्या अनेक योध्यांसारखे देशप्रेम आपल्या मनात पेटवत ठेवू. ह्या राणीच्या स्मृतिप्रीत्यर्थ आपण हिंद बांधव तीला नमन करू.
 
 
 
- श्रीपाद मुरलीधर पेंडसे
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.