मुबई शहर ग्रंथोत्सव; साहित्याचा अनोखा उत्सव

17 Nov 2022 14:12:01

akshay
 
 
मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आयोजित मुंबई शहर ग्रंथोत्सव 2022 दिनांक 16 व 17 नोव्हेंबर रोजी आयोजित केला होता. दादर पूर्व येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या इमारतीत हा ग्रंथोत्सव उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लेखक, वक्ते व संगणक तज्ज्ञ अच्युत गोडबोले उपस्थित होते. अनेक रसिक वाचकांची तसेच साहित्यिकांची यावेळी उपस्थिती लाभली होती.
 
कार्यक्रमाची सुरुवात भव्य ग्रंथादिंडी पासून झाली. त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री तसेच पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कार्यक्रमाचे उदघाटन करून पुस्तक विक्री केंद्रांना भेट दिली. भोजनोत्तर कार्यक्रमात जेष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे व निवेदिका दीपाली केळकर यांची व्याख्याने आयोजित केली होती. प्रवीण दवणे यांनी शांत बाई शेळके यांच्या जन्म शताब्दीनंतर कवितेतल्या शांताबाई हा कार्यक्रम सादर केला. दीपाली ताईंनी 'शब्दांच्या गाव जावे' हा मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे दाखवणारा व शब्दांची समृद्धी अधोरेखित करणारा कार्यक्रम केला.
 
प्रवीण दवणे यांनी आपल्या कार्यक्रमात शांताबाईंच्या आठवणी सांगताना आपल्याच ज्ञानाविषयी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, "आपली एवढी समृद्ध भाषा, शांताबाईंसारख्या कवयित्रींनी लिहिलेल्या शब्दांतून जिवंत ठेवायला आपल्याला असे आठवडे किंवा स्मृतिदिन आयोजित करावे लागतात ही मोठी खंत आहे. परंतु शांताबाईंच्या शब्दातला पाऊस आपल्याला आजही भिजवू शकतो, आपल्यातून आजही फुलून येतो, ही दाद देण्यासारखी गोष्ट आहे. शांताबाईंच्या कवितेत संगीत आहे, नदीचं वाहणं आहे, आयुष्यातल्या ठराविक काळात आपल्याला संगीत कळायला हवं, सूर कानावर यायला हवेत तर आपण आयुष्यात सतार होऊ शकतो नाहीतर आयुष्यच तुणतुणं होतं."
 
दीपाली ताई आपल्या खास शैलीत शब्दांच्या गमती जमती सांगत होत्या. त्या म्हणाल्या, " आपल्याकडे फार उत्तम शब्द आहेत, काही नादवाचक आहेत, काही सूचक आहेत, काही नेभळट आहेत, काही बेरकी सुद्धा आहेत. आपण त्या सर्वांचे सूक्त जाणून घ्यायला हवे. कधी शब्द वाट चुकतात, काही शब्दांचं नशीब असतं, काही शब्द अगदी विरुद्ध अर्थ दाखवून देतात. शब्द म्हणजे प्रकाश आहे तो ओळखता यायला हवा."
 
हा ग्रंथसोहळा दोन दिवशीय असून आजही अनेक उत्तम कार्यक्रम सादर होणार आहेत. सावित्रीबाई विद्यापीठ पुणे येथील विभाग प्रमुख डॉ राजेंद्र कुंभार यांचे 'वाचनसंस्कृती : काल आज आणि उद्या' या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0