कमलनाथांचे हिंदूद्वेषी अभिष्टचिंतन

17 Nov 2022 19:51:31
kamal nath

हातची सत्ता गेल्यानंतर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी नव्या वादाल तोंड फोडले आहे. देशात भले काँग्रेस रसातळाला जात असली तरीही कमलनाथ यांनी जंगी वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा करायला कुणाची ना नाही, पण त्यातही हिंदूविरोधाचाच राग आळवला जात असेल, तर अशा काँग्रेसजनांना शाब्दिक जोडे मारणे गरजेचेच. कमलनाथांची काही छायाचित्रे आणि एक व्हिडिओ सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाला असून त्यात कमलनाथ वाढदिवसानिमित्त शिकारपूरमध्ये भगवान हनुमानाचे चित्र आणि मंदिराचा आकार असलेला केक कापताना दिसत आहेत. छायाचित्रांनुसार केकचे चार भाग केले असून केकच्या खालून पहिल्या थरावर ‘हम है छिंदवारा वाले’, दुसर्‍या थरावर ‘जीवेत शरद: शतम’, तिसर्‍या थरावर ‘कमलनाथजी’ आणि चौथ्या थरावर ‘जन नायक’ असे लिहिले आहे. चौथ्या थरावर भगवान हनुमानजींचा फोटो आणि केकवर मंदिरासारखे शिखर असून ध्वज लावलेला आहे. यानंतर हिंदू धर्माची खिल्ली उडवल्याबद्दल कमलनाथांसह काँग्रेसवर चहुबाजूंनी टीका होऊ लागली. काँग्रेसचा प्रत्येक नेता आपल्या कामातून आणि वागण्यातून हिंदूविरोधी मानसिकता दाखवतो. हा केवळ केक नसून त्यांच्या मूळ मतदारांना काँग्रेसचे सरकार आल्यास मंदिरे अशीच पाडली जातील असा संदेश आहे, अशी टीका आता काँग्रेसवर होऊ लागली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही “काँग्रेसवाल्यांना देवाच्या भक्तीशी काहीही देणेघेणे नाही. हा सनातन परंपरा आणि हिंदू धर्माचा अपमान आहे, जो हा समाज मान्य करणार नाही,” अशा शब्दांत विरोध केला आहे. मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनीही कमलनाथांना चांगलेच खडेबोल सुनावले. एकीकडे ‘भारत जोडो यात्रा’ सुरू असताना राहुल गांधी संधी मिळेल तसे मंदिरात जाऊन गंध, टीळा लावतात. परंतु, दुसर्‍या बाजूला काँग्रेसजन त्यांच्या सगळ्या आशा-आकांक्षांवर पाणी फेरतात. आधी राम मंदिराच्या विरोधात असणारी काँग्रेस नंतर मवाळ झाली. हिंदू एकतेचा धक्का दोनदा बसल्यानंतर हिंदूंना जवळ करण्यासाठी यथायोग्य प्रयत्न झाले. परंतु, तरीही कमलनाथ यांच्यासारखे काही नमुने काँग्रेसचे खरं चरित्र समोर आणतात. याची मोठी किंमत काँग्रेसला चुकवावी लागेल, हे नक्की. जशी मणिशंकर अय्यर यांनी चायवाला म्हणून हिणवलं आणि त्यानंतरचा इतिहास आपल्यासमोरच आहे.

घुसखोर ते तृणमूलचे मतदार...


इकडे ‘भारत जोडो’ यात्रा काश्मीरकडे कूच करत असताना सदानकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करणार्‍या ममता बॅनर्जी सध्या मीडियाच्या कॅमेर्‍यांपासून जरा लांब गेल्या की काय, असा प्रश्न पडतो. पार्थ चॅटर्जीकडे पैशांचं भलमोठ घबाड सापडल्यानंतर ममतांचं भाजपविरोधी आणि मोदीविरोधी आकांडतांडव काहीसं थांबले असे वाटत होते. परंतु, तसे तूर्त दिसत नाही. कुंपणच शेत खातयं हे समजल्यानंतर ममताबानोंच्या नसलेल्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. पश्चिम बंगालमध्ये मतदार याद्यांमध्ये बांगलादेशी घुसखोरांच्या नावाचा समावेश असणे ही काही नवीन बाब नाही. आता सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे बर्धमान दक्षिणचे आमदार खोकन दास यांनी एका सभेला संबोधित करताना या घुसखोरांना मतदार बनवण्याचा एक आदर्श आणि प्रामाणिक मार्ग दाखवला. ‘टीएमसी’चे समर्थक असलेल्या बांगलादेशी घुसखोरांची नावे मतदार यादीत असावीत, असे दिव्य ज्ञान त्यांनी पाजळले आणि एवढ्यावरच न थांबता याची खातरजमा करण्याची जबाबदारीही तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर सोपवली आहे. बांगलादेशातून अनेक लोक येत आहेत. हिंदूंच्या भावनांमुळे अनेकजण भाजपला पाठिंबा देतात. मतदार यादीत तृणमूलचे समर्थक असल्याची खात्री करण्याचे आवाहन करत आहे. देशातील इतर राज्यांप्रमाणेच पश्चिम बंगालमध्येही मतदार यादीत सुधारणा करण्याचे काम सुरू असताना ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या आमदाराने हे वक्तव्य केले आहे. खोकन दास यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना वर्धमान भाजपचे प्रवक्ते सौम्यराज मुखोपाध्याय म्हणाले की, “या मुद्द्यावर पक्षीय राजकारण करण्यापेक्षा आमदारांनी बेकायदेशीर स्थलांतरितांची माहिती केंद्र आणि राज्य सरकारला द्यावी.” यामुळेच भाजप नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा ‘सीएए’ लागू करणार असल्याचेही ते म्हणाले. ममताबानोंच्या राज्यात लोकशाहीच मूल्ये दिवसाढवळ्या तुडवली जात असताना त्या मात्र चिडीचूप आहेत. ममतांनी नेमका कशाचा धसका घेतला आहे, हे त्याच जाणो. परंतु, बंगालमध्ये खरी परिस्थिती काय आहे हे त्यांच्याच आमदाराने सांगून कबुली दिली हे एकप्रकारे बरे झाले. ‘खेला होबे’ म्हणणार्‍या ममतांचा आणि त्यांच्या पक्षाचा साळसूदपणाही समोर आला. ‘इव्हिएम’ला विरोध करणार्‍या विरोधकांनी तृणमूलच्या या आमदारावरही टीका करावी, म्हणजे पारदर्शक शब्दाला काहीतरी अर्थ शिल्लक राहील.


Powered By Sangraha 9.0