चारही वर्ण जेव्हा एकसमान भावनेने परस्परात सामंजस्य स्थापन करीत सुखासमाधानाने राहतील, तेव्हा देशाची व्यवस्था सर्वदृष्टीने संपन्नतेला प्राप्त होईल. सर्वच नागरिक सर्व प्रकारच्या दुःखापासून दूर होऊन अमृतत्वाकडे वाटचाल करील.
उच्चा दिवि दक्षिणावन्तो अस्थुर्
ये अश्वदा: सह ते सूर्येण।
हिरण्यदा अमृतत्वं भजन्ते
वासोदा: सोम प्रतिरन्त आयु:॥
(ऋग्वेद -10/107/2)
(सोम) हे सोम्यशील समाजा, देशा, (ये) जे (दक्षिणावन्त:) त्यागी, तपस्वी व ज्ञानयुक्त जीवन जगणारे आहेत, (अश्व-दा:) आशुगतीने क्षात्रतेजाचे दान करणारे, (हिरण्य-दा) धन-ऐश्वर्याचे दान करणारे आणि (वासो-दा:) सर्वांना निवास (व्यवस्था) प्रदान करणारे (दिवि) आकाश मार्गातील (सूर्येण सह) सूर्यासोबत (उच्चा अस्थु:) समानतेने उच्चस्थानी राहतात. (ते) ते (अमृतत्त्वं भजन्ते) अमृतत्वाला प्राप्त होतात. (आयुः प्र-तिरन्ते) आपल्या आयुष्याला वाढवतात.
समाज तोच मानला जातो, ज्यात समज असते. प्रामुख्याने मानवाच्या समूहाला ‘समाज’ म्हटले जाते. कारण, मानवसमूहामध्ये विचार प्रवणता, विवेक, सभ्यता, सहिष्णुता आदी गोष्टी दिसून येतात. मनुष्येतर प्राण्यांमध्ये सामंजस्यपणाचा अभाव असतो. म्हणून त्यांचा समाज होऊ शकत नाही. अशा पशुसमूहांना ‘झुंडी’ किंवा ‘कळप’ असेही म्हटले जाते. मानवाचे मात्र वेगळे आहे. परस्पर स्नेहभाव, सौम्यता, सुशीलता, साम्यता किंवा सामंजस्यपणा या गोष्टी मानवांमध्येच आढळतात. म्हणून मानव समाज सर्वश्रेष्ठ समाज म्हणून ओळखला जातो. याचसाठी सदरील मंत्रात राष्ट्रात राहणार्या लोकसमुहाला अथवा समाजाला ’सोम’ या नावाने संबोधले आहे. ज्यात सोम म्हणजे शांतवृत्ती, सौम्यशील भावना, कोमलता, माधुर्य, सद्गुणवृत्ती यांचे अस्तित्व असते, तो मानव समाज! याउलट ज्या मानवसमूहातून सौम्यगुणांचा नायनाट होऊन परस्पर द्वेष-मत्सर, तिरस्कार, कटुता, असहिष्णुता आदी दोष बळावून शत्रुत्व निर्माण होते, तो मानवी समाज होऊ शकत नाही. म्हणूनच समाजव्यवस्थेला अनुसरून मंत्रात आलेली ‘सोम’ ही संज्ञा अतिशय सार्थ ठरते.
समाजाचा रथ सुव्यवस्थित चालण्यासाठी चार चक्रांची म्हणजेच वर्णांची आवश्यकता असते. चारही वर्ण अगदी सुव्यवस्थितरित्या आपापली कर्तव्ये बजावत असतील, तर सारा देश व समाज आनंदात राहू शकतो. जर काय समाजरुपी रथाची वर्णस्वरुप चार चाके असमान गतीने मागेपुढे जात राहतील किंवा ती खाली-वर असमान होत असतील, तर राष्ट्र अस्थिर झाल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्राची सर्व व्यवस्था डळमळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच या मंत्रात आलेले दक्षिणा-वन्त:, अश्व-दा:, हिरण्य-दा:, वासो-दा: हे चार शब्द अनुक्रमे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या चार वर्णांचे प्रतिपादन करतात.
1) दक्षिणा-वन्त: ब्राह्मणा: - दक्षिणा म्हणजेच दातृत्व भावना. त्यांचे समग्र जीवन ब्रह्मज्ञान म्हणजेच वेदादी सत्य शास्त्रांचे ज्ञान वितरित करण्यासाठी तत्पर असते, ते ब्राह्मणवृंद ! अहर्निश जे केवळ याच ज्ञानदानाच्या कार्यात मनसा, वाचा, कर्मणा तल्लीन असतात, असे ते धन्य वेदज्ञ ब्राह्मण. राष्ट्रातील प्रत्येक मानवाला पवित्र अशा सत्य वैदिक ज्ञानाचे अमृत पाजण्यासाठी, जे आपले सारे आयुष्य खर्ची घालतात, असे विद्वान खर्या अर्थाने त्या समाजाची व राष्ट्राची आभूषणे होत. स्वतःच्या स्वार्थ वा सुख-दुःखांची थोडीही चिंता न करता कोणाकडून काही दक्षिणा मिळो किंवा न मिळो, समाजाला शहाणे करून सर्वांमध्ये आनंदाची नवनिर्मिती करणारे त्या ’दक्षिणावन्त:’ अशा गुण, कर्म व स्वभावे ज्ञानी सुजनांमुळे समाजात सत्याचे अस्तित्व टिकून राहते. याच कार्यासाठी तप आणि श्रमाचा आश्रय घेत मानवाच्या सर्वांगीण समृद्धीसाठी झिजणारे ते खरे साधक म्हणजेच दक्षिणावंत विद्वान पंडित.
2) अश्व- दा: क्षत्रिया: - लौकिक भाषेत अश्वास घोडा असे म्हणतात. घोड्याला ‘अश्व’ ही संज्ञा देण्यामागचे कारण, म्हणजे तो नित्य आशुगामी आहे. त्यांच्यासारखी धावण्याची शक्ती इतर कोणत्याच प्राण्यात नाही. तसेच ‘अश्नाति अश्व:।’ म्हणजेच जो हरभरे किंवा चण्यासारखे अतिशय पुष्टकारक, बलवर्धक व शुद्ध सात्त्विक असे अन्न खातो, म्हणून तो अश्व!
आशु म्हणजेच शीघ्र गतीने प्रगती साधणार्या राष्ट्रालादेखील ‘अश्व’ असे म्हटले जाते. जे आशुगतीने किंवा तत्परतेने आपल्या राष्ट्राला सुरक्षेचे दान करतात. बाह्यशत्रूंच्या आक्रमणापासून आणि तसेच अंतर्गत बंडाळींपासून राष्ट्राला वाचवतात, ते अश्व-दा:आहेत. समाज व राष्ट्राच्या सर्व प्रकारच्या संरक्षणासाठी प्राण तळहाती घेऊन लढणारे शूरवीर सैनिक हे सर्व अश्वदाच ठरतात. त्याचबरोबर सर्वत्र वाढत चाललेल्या सर्व प्रकारच्या अन्यायाला वाचा फोडून त्याचा प्रतिबंध करणारे आणि प्रजेच्या हितासाठी नेहमीच तत्पर असलेले ते सर्व ’अश्व-दा क्षत्रिय’ होत.
3) हिरण्य-दा: वैश्या: - हिरण्य म्हणजेच सोने किंवा धनैश्वर्य होय. जे आपल्या देशाला सोने, चांदी इत्यादी सर्व प्रकारच्या मौल्यवान धातूंनी समृद्ध बनवतात. तसेच विविध प्रकारच्या धनाने व ऐश्वर्याने देशाला आर्थिक सुबत्ता प्रदान करतात. शेती, व्यापार, उद्योगधंदे, पशुपालन इत्यादींच्या माध्यमाने राष्ट्र प्रगत व धनसंपन्न बनवण्याकरिता तत्पर असतात, ते सर्व ’हिरण्य -दा: वैश्या:’ होत. राष्ट्राची अर्थव्यवस्था भरभक्कम करण्याच्या कामी वैश्यवर्गाची श्रमनिष्ठा आणि प्रयत्नांची पराकाष्ठा अत्यंत मोलाची ठरते.
4) वासो-दा: शूद्रा: - वास म्हणजेच निवास. समग्र देशवासीयांच्या राहण्याची व अस्तित्वासाठी लागणार्या सर्व वस्तूंची व्यवस्था करणारे हे वासो-दा असतात. राहणे म्हणजेच जीवन जगणे. सर्व प्रजाजनांना जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या प्रमुख गरजांबरोबरच इतरही भौतिक साधनांची निर्मिती, उभारणी इत्यादी कामात सतत परिश्रम करणारे जे कोणते घटक आहेत, ते सर्व वासो- दा:। केवळ मजूरच नव्हे, तर अगदी अभियंत्यांपासून ते सर्व क्षेत्रातील उपाय जाणणारे व प्रत्यक्ष कष्ट करणारे जे बांधव आहेत, त्यांना ‘वासोदा:’ असे म्हटले जाते. आज मोठमोठे सुंदर प्रासाद, गगनचुंबी अशा उंच इमारती, लांबरुंद रस्ते व महामार्ग, मजबूत पूल, वाहने, रेल्वे, विमाने तसेच रुग्णालये, कार्यालये इत्यादींची निर्मिती करणारे जे श्रमनिष्ठ घटक आहेत, ते सर्व आम्हा सर्वांना वास-निवास प्रदान करणारे असल्याने त्यांना ‘वासो-दा:’ म्हटले जाते. या वासोदांविना समाजात आम्ही राहणार तरी कसे? आमचे जाणे-येणे, शिकणे, कामे करणे इत्यादी सर्वकाही या वासो-दा बांधवांच्या अपार कष्टांवर आधारलेले आहे.
सौम्य, शांत व समृद्ध समाजव्यवस्थेला या चारही वर्णांची गरज असते. हे चारही वर्ण तितकेच महत्त्वाचे व एकसमान आहेत. सर्वच जण तितकेच उच्च दर्जाचे. हे सर्वजण समान भावनेने कर्तव्यदक्ष राहतात, तेव्हा समाज व राष्ट्राची सर्वांगीण प्रगती साधली जाते. पण जेव्हा भेदाभेद होईल, तेव्हा मात्र ते राष्ट्र अधोगतीच्या मार्गाने वाटचाल करेल. ज्या समाजात ज्ञानी विद्वान ब्राह्मण, शूरवीर क्षत्रिय, त्यागी श्रीमंत वैश्य वर्ग आणि श्रमशील व कष्टाळू असा सेवकवर्ग आकाशातील सूर्याप्रमाणे गतिमान राहून सर्वोच्च स्थितीला प्राप्त होईल, तेव्हा त्या समाजात सर्वजण सुखी व आनंदी राहतील. कोणीही एक दुसर्यांचा शत्रू बनणार नाही. सर्वजण अगदी भावंडाप्रमाणे बागडतील. कोणत्याही प्रकारची वस्तू किंवा पदार्थांची कमतरता भासणार नाही. सर्व प्रकारचे वैभव या एकसमान वर्णभावनेमुळे अनंत काळापर्यंत नांदत राहील. यासाठीच तर मंत्राच्या शेवटी म्हटले आहे-ते अमृतत्वं भजन्ते,आयु: प्र तिरन्ते!
चारही वर्ण जेव्हा एकसमान भावनेने परस्परात सामंजस्य स्थापन करीत सुखासमाधानाने राहतील, तेव्हा देशाची व्यवस्था सर्वदृष्टीने संपन्नतेला प्राप्त होईल. सर्वच नागरिक सर्व प्रकारच्या दुःखापासून दूर होऊन अमृतत्वाकडे वाटचाल करील. अमृत म्हणजे सर्व प्रकारचे सुख व आनंद, जिथे की मृत्यूला अजिबात थारा नसेल. विषाचा तीळमात्रदेखील लवलेश नसेल. अशामुळे कोणाचाही अकाली मृत्यू होणार नाही. सर्वजण नानाविध रोगांपासून दूर राहून निरामय जीवन जगतील. ‘जीवेत शरदः शतम्!’ या वेदांनी प्रतिपादित केल्याप्रमाणे उक्तीनुसार शतायुषी बनून आपल्या जीवनाला यशस्वी करतील.सद्य:स्थितीत वेदमंत्रात प्रतिपादित केलेली वैदिक वर्णव्यवस्थेची महत्ता अत्याधिक प्रासंगिक आहे, ज्यामुळे आपले राष्ट्र किंबहुना सारे विश्व सर्वदृष्ट्या समृद्ध व आनंदी होण्यास प्रवृत्त होईल.
-प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य