मिशनऱ्यांच्या धर्मांतराविरोधात लढा देणारे बिरसा मुंडा !

    15-Nov-2022   
Total Views |

birsa
 
 
 
तो काळ होता ब्रिटीश राजवटीविरोधातील लढाईचा. इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात भारतीय जनता पिचलेली होती. ब्रिटीशांच्या मदतीने चालविल्या जाणाऱ्या मिशनऱ्यांनी तर धर्मांतरणाचं जाळं पसरविण्यास सुरुवात केली होती. पण याविरोधात अखेरपर्यंत निकराचा लढा दिला तो थोर स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांनी.. . आजच्या झारखंड आणि जुन्या छोटानागपूर भागातील उलिहाटू गावात मुंडा जमातीत बिरसा यांचा जन्म झाला. तो काळ ब्रिटिश सत्तेचा होता. ते बाळ असतानाच त्यांच्या आई वडिलांना ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. त्यावेळी ख्रिस्ती धर्मगुरू असहाय्य आणि गरीब जनतेला आमिष दाखवून ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास भाग पाडत.
 
बिरसाच्या आई वडिलांनी त्याची बुद्धिमत्ता पाहून त्याला चाईबासा येथील मिशन स्कूलमध्ये दाखल केलं. पण गोमांस खाण्याचा प्रसंग आला तेव्हा बिरसांच्या मनात बंडाची ठिणगी पेटली. मिशनच्या एका पुजाऱ्याने मुंडा समाजाला चोर संबोधून त्यांच्याबद्दल अप्रामाणिक असे बिरुद वापरल्याने या ठिणगीचं ज्वालेत रूपांतर झालं. तुम्ही चोर आणि बेईमान लोक आहात ज्यांनी मुंडांवर अत्याचार करून आमची जमीन बळकावली. तुमच्यात आणि ब्रिटीश सरकारमध्ये काही फरक नाही, असं कठोर शब्दांत सांगून बिरसा यांनी मिशन स्कूल सोडलं. हे बिरसा मुंडा नक्की कोण? त्यांचा काळ केव्हाचा? 
 
आज म्हणजे १५ नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिन. या जमातीच्या, समाजाच्या, धर्माच्या आणि संस्कृतीच्या हक्कांसाठी त्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं. मुंडा समाजाला जल, जमीन आणि जंगलाचा हक्क मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असतानाच वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी लोकांनी त्यांना देवाचं स्थान दिलं. ब्रिटीश सरकार, ख्रिश्चन मिशनरी आणि त्यांना पाठिंबा देणारे जमीनदार सगळेच बिरसा मुंडाचे सर्वात मोठे शत्रूझाले.
 
याच दरम्यान ते आनंद पांडा यांच्या संपर्कात आले. रामायण, महाभारत यांसारख्या ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला. या ग्रंथांचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. हळूहळू अध्यात्मिक महापुरुष म्हणून त्यांना मान्यता मिळू लागली. बिरसायत या नावाने त्यांनी आध्यात्मिक चळवळ सुरू केली. या चळवळीत मुंडा, उराव तसच इतर अनेक समाजातील हजारो लोक सामील होऊ लागले. दारू पिऊ नका, चोरी करू नका, गायींना मारू नका, पवित्र बाळीचे मणी घाला, तुळशीचे रोप लावा, अशा छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि म्हणूनच लोकांमध्ये आध्यात्मिक चैतन्य जागृत होऊ लागलं. बिरसांच्या या वाढत्या सामर्थ्याने ब्रिटिश सरकारमध्ये भीती निर्माण होऊ लागली.
 
 
त्यांनी विश्वासघाताने बिरसा मुंडा यांना हजारीबाग तुरुंगात डांबले. पण त्यांना जास्त काळ तुरुंगात ठेवता आले नाही. तुरुंगातून सुटल्यानंतर बिरसा यांनी ब्रिटिश सरकार उलथून टाकण्याचा निर्णय घेतला. जल, जमीन आणि जंगल यांच्या हक्कासाठी त्यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध तीव्र आंदोलन सुरू केलं. या संदर्भात 9 जानेवारी 1900 रोजी डोंबारी टेकडीवर विशाल जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. हे आंदोलन चिरडण्यासाठी ब्रिटिश सरकारने स्ट्रीटफिल्डच्या नेतृत्वाखाली आंदोलकांवर अंदाधुंद गोळीबार केला. ज्यामध्ये हजारो मुंडांचा बळी गेला. जालियनवाला बागेप्रमाणेच हे भयंकर आणि सुनियोजित हत्याकांड होतं.
आता बिरसाला पकडण्यासाठी इंग्रजांनी बक्षीस जाहीर केलं. काही दिवसांनी बिरसा मुंडा यांना पकडण्यात ब्रिटिश सरकारला यश आलं त्यानंतर त्यांना रांची तुरुंगात ठेवण्यात आले होते. पण 9 जून 1900 रोजी बिरसा यांचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. कॉलरामुळे त्यांचा मृत्यू झाला असं म्हणतात पण ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना विश पाजल्याचंही काहींचं म्हणण आहे.
 
बिरसा मुंडा हे आदिवासी अस्मितेचे एक महान नायक होते, ज्यांच्या प्रेरणेतून आजही आपल्याला धर्म आणि संस्कृतीबद्दल जागरूक राहण्याचा संदेश मिळतो. आज आपण भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करत आहोत. पण हा सुवर्ण क्षण दाखवताना आपण भगवान बिरसा मुंडा सारख्या हजारो आदिवासी वीरांचे बलिदान विसरता कामा नये. या बलिदान वीरांच्या स्मरणार्थ १५ नोव्हेंबर हा बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस वनवासी गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. अशा या थोर स्वातंत्र्यसेनानी व जननायक बिरसा मुंडा यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन...!
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.