रंगकर्मींना रंगवणारा खरा ‘रंग’कर्मी

    15-Nov-2022
Total Views |
Manik Kande



माणिक कानडे यांनी रंगभूषाकार म्हणून चार दशकांहून अधिक रंगकर्मींच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे रंग चढवले आहेत. रंगकर्मींना रंगवणार्‍या या खर्‍या ‘रंग’कर्मीच्या प्रवासातील हे अमिट ‘माणिक’ रंग...


माणिक गणपत कानडे हे नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मुसळगावचे. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. कर्मवीर भाऊसाहेब हिरे महाविद्यालयातून ते दहावी उत्तीर्ण झाले. पुढे नाटकाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या माणिक यांनी रंगभूषेत आपला वेगळा रंग निर्माण केला. ते गेल्या चार दशकांहून अधिक काळ रंगभूषाकार म्हणून सर्वपरिचित आहेत. मुंबईत हिंदी राज्य नाट्यस्पर्धा रंगभवन होत असे. तेव्हा एका नाट्यस्पर्धेसाठी माणिक कानडे गेले असता, त्या नाटकाचा ‘मेकअप आर्टिस्ट’ तिथे आला नाही. त्या नाटकात माणिक यांची सैनिकाची भूमिका होती. त्यात एका वेड्या गृहस्थाचे पात्र रंगवायचे होते.





मात्र, रंगभूषा करणारे ‘मेकअप आर्टिस्ट’ न आल्याने माणिकरावांनी नारळाच्या शेंड्यांचा भुगा करुन वेड्याची भूमिका करणार्‍या कलाकराच्या केसांवर टाकून रंगभूषा केली. माणिकरावांनी गमतीतून केलेला हा पहिलावहिला ‘मेकअप’ रसिकांना खूप आवडला. येथून माणिक कानडे या रंगभूषाकाराचा जन्म झाला. नाटकात काम करण्यापेक्षा रंगभूषाकाराचे काम खूप छान जमते, असे त्यांना जाणवले. त्यावेळी कोणालाही ‘मेकअप रुम’मध्ये प्रवेश नसायचा. मग हे तंत्र कुठून शिकायचे, असा प्रश्न माणिकरावांसमोर उभा राहिला. त्यावेळी जरीवारा काका यांच्याकडे ‘मेकअप’चे साहित्य मिळते, अशी माहिती त्यांना कळली. तिथे पहिल्यांदा माणिकरावांच्या हाती चेहर्‍याला लावण्याचे ‘फाऊंडेशन’ लागले.




 मात्र, हे साहित्य हे नाशिकमधील ‘वीर’ नाचवण्यांच्या परंपरेत वीरांना लावण्याचे असल्याने ते रंगकर्मींसाठी उपयुक्त नसे. तो ‘मेकअप’ पटकन जात नसे. मग प्रारंभीच्या काळात केवळ शिकण्यासाठी माणिकरावांनी राज्य नाट्यस्पर्धांमध्ये मोफत रंगभूषा करत अनुभव गाठीशी जमवला. त्याच काळात माणिक कानडे यांची प्रकाशयोजनाकार सतीश सामंत यांची भेट झाली. त्यांनी ‘मेकअप’च्या साहित्याची यादी देत मुंबईतून ’मेकअप’चे सामान मागवून दिले. त्यानंतर प्रसिद्ध नृत्यांगना रेखा नाडगौडा यांच्या कथ्थक नृत्यात रामायणातील नृत्यासाठी प्रथम सतीश सामंत यांच्यासोबत साहाय्यक रंगभूषाकार म्हणून काम केले. त्यावेळी 150 नर्तक-नर्तिकांचे ‘मेकअप’ करण्याचा अनुभव कानडे यांना आला. या संधीमुळे ‘मेकअप’च्या क्षेत्रात माणिक कानडे यांचे नाव नावारुपाला तर आलेच, शिवाय अत्यंत जलद गतीने ‘मेकअप’ कसा करतात, याचे तंत्रही कानडे यांनी आत्मसात केले.त्यानंतर दत्ता पाटील लिखित एका दीर्घांकात त्यांना कुष्ठरोग्याचा हुबेहूब ‘मेकअप’ केला. एका नाटकात स्फोट झाल्यानंतर व्यक्तीच्या जळलेला चेहरा दाखवण्याचे आव्हानात्मक काम माणिक कानडे यांनी लीलया पेलले.
माणिक कानडे यांनी आजवर चार हजारांहून अधिक नाटकांसाठी कलावंतांचे ‘मेकअप’ केले आहेत.





 ‘मेकअप आर्टिस्ट’साठी पारखी नजर हवी, असे माणिक कानडे सांगतात. एखाद्या वेड्याच्या भूमिकेसाठीचा ’मेकअप’ हे सर्वात आव्हानात्मक काम असते, असेही त्यांना वाटते. लेखक नाटकासाठी पात्र लिहितो. दिग्दर्शकाच्या कल्पनेतील पात्रांचे अलगद बोट धरुन रंगमंचावर त्यांना बोलता करणारा कलावंत म्हणजे रंगभूषाकार होय, अशी व्याख्या माणिक कानडे करतात.राज्य नाट्य स्पर्धेत रंगभूषाकार म्हणून त्यांना सर्वांनीच भरभरुन प्रेम दिले आणि माणिक कानडे यांची उपाधी ‘नाना’ म्हणून झाली.





’व्यावसायिक रंगभूमीवरील नाटकांसाठी ‘मेकअप’ उपलब्ध न झाल्यास, माणिकराव कलाकरांचे ‘मेकअप’ही करतात. ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ नाटकाचा रंगभूषाकार अचानक आजारी पडल्यानंतर माणिकरावांनी ‘शो मस्ट गो ऑन’ या उक्तीप्रमाणे कलाकारांचा ‘मेकअप’ करुन दिला होता. रंगभूषाकार म्हणून नाव मिळवण्यासाठी सतीश सामंत, नेताजी भोईर, नारायण देशपांडे यांची मोलाची साथ लाभली, असे सांगण्यास माणिक कानडे विसरत नाही. माणिक कानडे यांचा वारसा त्यांची कन्या समीक्षा निकम-कानडे, सून रेशमा कानडे पुढे नेत आहेत. माणिक कानडे यांना आजवर शेकडो पुरस्कार मिळाले असून त्यात ‘झी गौरव पुरस्कार’, लातूरच्या ‘विजय फाऊंडेशन’चा ‘जीवनगौरव पुरस्कार’ही मिळाला आहे.नवीन कलाकारांनी ‘बॅकस्टेज’वरील ‘आर्टिस्ट’ म्हणून ‘करिअर’ करावे, त्याला कधीही मरण नाही, असा सल्ला माणिक कानडे नवीन पिढीला देतात. माणिक कानडेे यांना पुढील वाटचालीस रंगीबेरंगी शुभेच्छा...!




-निल कुलकर्णी