आनंद, दुःख, नकारात्मकता

14 Nov 2022 21:45:28
 
happy
 
 
 
 
माणसाच्या जगात आनंदावर लक्ष केंद्रित करण्याच्या प्रक्रियेवर अधिक भर दिला जातो आणि दुःखाला निरुपयोगी भावना मानली जाते. पण दुःखासारखी एक नकारात्मक भावना आपल्याला आपल्या जीवनाबद्दल, आपल्या भावनांबद्दल आणि सभोवतालच्या परिस्थितीबद्दल विचार करायला लावू शकते. दुःख आपला एक उत्तम मित्र आणि मार्गदर्शक असू शकते.
 
 
सुप्रसिद्ध कवी खलील जिब्रान म्हणतात की, जितके जास्त दुःख तुमच्या मनावर खोलवर कोरले जाईल तितका आनंद तुम्ही सामावून घेऊ शकाल. याचा अर्थ असा होतो की, दुःख ही आपण समजतो तितकी वाईट गोष्ट नाही. सामान्यतः लोक भावनिक पल्ल्याच्या आनंदी बाजूकडे झुकण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या लक्षात हे येत नाही की, प्रत्येक वेळी उंच जाणारा झोका शेवटी खालीच येतो. तसेच जीवनाचे आहे. प्रत्येक उंचावलेली लाट खाली आदळणार आहेच. तरीही एक गोष्ट सगळ्यांच्याच अनुभवाची आहे ती म्हणजे, आनंद, समाधान यांसारख्या सकारात्मक भावनांपेक्षा दुःखाला अधिक आयुष्य असते. लोक बहुतेक वेळा सुन्न आणि उदास झालेले दिसतात, कधी आनंदाची वेळ आली, तरी ती उत्तेजित स्थिती काही त्यांच्या आयुष्यात फार काळ टिकताना दिसत नाही. जे लोक दुःख अनुभवत असतात, त्यांच्या मनात कुठेतरी एक छिद्र पडलेले आहे. तुमच्या इच्छेविरुद्ध तुमचे नुकसान झालेले आहे आणि तुम्हाला त्यातून बाहेर यावयाचे आहे. किंबहुना बर्‍याच लोकांना असे वाटते की, एखाद्या दुःखद प्रसंगातून बाहेर येण्यास मार्ग एकच आहे. आयुष्यात आनंदी राहण्यासाठी एकच पर्याय ठेवला आणि तो सफल नाही झाला, तर माणूस आनंदी कसा राहील. माणसाकडे जीवनाविषयी इतर अनेक पर्याय पर्याय असू शकतात.
 
 
आधुनिक संशोधनात उदासीन वास्तववाद अशी एक नवीन संकल्पना अभ्यासली जात आहे. ही संकल्पना नैराश्याच्या निदानापेक्षा वेगळी मानली गेली आहे. यात माणसाला वास्तवतेची अगदी अचूक जाणीव असू शकते. सतत येणार्‍या उदासीनतेची लक्षणे सकारात्मक आत्मविश्वासाच्या अभावातून उद्भवतात. हा आत्मविश्वास निरोगी आणि सक्षम जगण्यासाठी गरजेचा आहे. असे लोक उत्साहासाठी खूप संघर्ष करू शकतात, पण ते तसे करत नाहीत. यासाठी काही महत्त्वाच्या घटकांकडे लक्ष दिले पाहिजे.
 
 
एकटेपणा : एक उत्तम आणि प्रेमळ कुटुंब आहे. छान मित्रमंडळ आहे, पण आपण त्यांच्याशी मनापासून जोडलेले नसल्यामुळे अनेकदा आपल्याला एकटेपणा जाणवतो. ‘डॉक्टर, गर्दीतसुद्धा मला एकटं एकटं वाटतं’ या गजबजलेल्या काळात हे वाक्य खूप अर्थपूर्ण आहे. या सगळ्यांशी कुठलाही वैयक्तिक संबंध प्रस्थापित न केल्याने, एकाकीपणाची तीव्र भावना, तळमळ आणि वेदना व्यक्तीस होतात.
 
 
नियंत्रणाचा अभाव : अनेक वेळा असे होते की, तुम्ही अगदी योग्य अशा गोष्टी केल्याने किंवा लोकांना ज्या गोष्टी तुमच्याकडून अपेक्षित आहे, त्या करत राहिल्याने तुम्ही कंटाळता. सतत कोणाला तरी वाटते वा आवडते म्हणून आपण गोष्टी केल्या, तर साहजिकच यात आपले काय किंवा आपण काय केले, असा प्रश्न मनात उभा राहतो. आपले आपल्या आयुष्यावरचे, आपल्या निर्णयावरचे नियंत्रण गमाविल्यासारखे वाटते. आपली जणू कठपुतळी झाली आहे, असे वाटायला लागते. त्यामुळे दुःख आणि उदासीनता येते. कधी कधी उदास वाटणे, हे सामान्य आहे. इतर भावना- राग, आनंद, निराशा, चीड किंवा आंदोलन या सर्व दैनंदिन अनुभवण्याच्या आहेत आणि ठीक आहेत. कधीकधी जेव्हा आपल्याला तीव्र भावना किंवा संवेदनशीलता असते तेव्हा ते आपल्या वैयक्तिक नातेसंबंधांवर, कामावर आणि घरगुती जीवनावर गंभीर परिणाम करू शकतात. असे जेव्हा घडते तेव्हा आपल्याला या भावनांना सुदृढ आणि निरोगी, सक्रिय मार्गाने हाताळण्याचे इतर प्रभावी मार्ग शिकण्याची आवश्यकता असते.
 
 
अतिविचार : काही वेळा जेव्हा बाहेर सर्व काही ठीक चाललेले असते, तेव्हा आपल्या मेंदूला दुःखी वाटण्याचे एखादे कारण उगाचच सापडते. जर खरोखर आयुष्यात सर्व काही ठीक चालले असेल आणि जर तुम्ही अजूनही एखाद्याकडून काहीतरी अपेक्षा करत असाल किंवा काहीतरी मोठे घडण्याची अपेक्षा करत असाल, तर तुम्हाला निराश वाटू शकते. कारण, तुम्ही निश्चितपणे जास्त प्रमाणात विचार करत आहात. काही लोकांना फक्त सर्व साध्या-साध्या गोष्टींचे अतिविश्लेषण करण्याची सवय असते, जी फक्त शेवटी संभ्रमात वा गोंधळातच संपते. तुमच्याकडे हाताशी असलेल्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करण्यास शिका आणि त्यात गुंतण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही जीवनात आनंद अनुभवता, म्हणजे नक्की काय? तर तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात किती तृप्त आहात आणि तुम्हाला दैनंदिन जगण्यात किती चांगले वाटते, याचे ते प्रतिबिंब असते. तुमची तब्येत चांगली असताना, उत्तम नोकरी करत असताना आणि आर्थिकदृष्ट्या भक्कम असताना, नाती सुदृढ असतानाही तुम्हाला अलीकडे थोडेसे उदास वाटत आहे का? तसे असल्यास, तुम्हाला मी आनंदी का होऊ शकत नाही, या प्रश्नाचे उत्तर गंभीरपणे शोधावयास पाहिजे.
 
 
 
माणसाच्या जगात आनंदावर लक्ष केंद्रित करण्याच्या प्रक्रियेवर अधिक भर दिला जातो आणि दुःखाला निरुपयोगी भावना मानली जाते. पण दुःखासारखी एक नकारात्मक भावना आपल्याला आपल्या जीवनाबद्दल, आपल्या भावनांबद्दल आणि सभोवतालच्या परिस्थितीबद्दल विचार करायला लावू शकते. दुःख आपला एक उत्तम मित्र आणि मार्गदर्शक असू शकते. दुःख आपल्याला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे, उत्सुकपणे समजून घेण्यास आणि आपल्या जीवनात आपल्याला आपल्याबद्दल उत्कटतेने काय वाटते, हे जाणून घेण्यास मदत करते. दुसर्‍या शब्दांत, दुःखी असण्याचा अर्थ असा नाही की, तुम्हाला परिस्थितीचा सामना करता येत नाही किंवा तुम्ही हार मानली आहे. उलट, दुःख प्रगल्भपणे हाताळल्यास ते तुम्हाला त्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास आणि पुढे जाण्यास मदत करते. ही एक अशी महत्त्वाची भावना आहे, जी तुम्हाला सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास, स्वीकारण्यास, तिच्याकडे लक्ष केंद्रित करण्यास, चिकाटीने मार्ग काढण्यास आणि त्यातून आपला विकास करण्यास मदत करू शकते.
 
 
 
- डॉ. शुभांगी पारकर
 
 
 
Powered By Sangraha 9.0