दिव्य ध्येय की ओर तपस्वी, जीवन भर अविचल चलता हैं।

14 Nov 2022 21:51:10
 
Sahita Kulkarni
 
 
 
 
संहिता कुलकर्णी राष्ट्र सेविका समितीच्या कोकण प्रांत सेवा प्रमुख आणि ठाण्याच्या ‘राजमाता जिजाबाई ट्रस्ट’च्या कार्यवाह आहेत. आयुष्यभर समाजाच्या उत्थानासाठी कार्य करण्याची त्यांची इच्छा आहे. त्यांच्या जीवनकार्याचा घेतलेला मागोवा...
 
 
 
दिव्य ध्येय की ओर तपस्वी
जीवन भर अविचल चलता हैं॥
पतझड के झंझावातों में
जग के घातों प्रतिघातों में
सुरभि लुटाता सुमन सिहरता
निर्जनता में भी खिलता हैं॥
 
 
 
दिव्य ध्येयासाठी समर्पित आयुष्य जगणे हीसुद्धा एक साधना आहे. ती साधना सगळ्यांनाच जमते असे नाही. कारण, या साधनेत क्षणोक्षणी नि:स्वार्थीपणे कार्यरत राहावे लागते. आयुष्यात प्रत्येक वळणावर ‘माझे काय’च्याऐवजी समाजासाठी काय? देशासाठी काय? असा विचार करून कार्य करावे लागते. संहिता कुलकर्णी यांच्या आयुष्याचा मागोवा घेतला, तर जाणवते की, ही साधना त्यांना जमली आहे. त्यामुळेच उदय कुलकर्णी या संघ स्वयंसेवकाशी विवाह झाल्यानंतर काही महिन्यांतच त्या आणि त्यांचे पती अयोध्येला कारसेवेला गेले होते. नवीन संसार होता, स्वप्न होते. पण तरीही धर्म, सामाजिक बांधिलकी म्हणून त्या अयोध्येला गेल्या होत्या. अर्थात, त्यांचे सासरहीसंघविचारी होते. त्यामुळेही सहज शक्य झाले. संहिता आणि उदय यांचा नवीन संसार सुरू झाला. जबाबदार्‍या आल्या. मात्र, या सगळ्या काळातही संहिता यांनी घेतला वसा टाकला नाही. सामाजिक कार्यासाठी नित्यदिन वेळ द्यायचाच, हा तो वसा होता. त्यासाठी संहिता यांनी अर्धवेळच नोकरी करण्याचे ठरवले. पैसे आलेले कुणाला नको असतात? पण संहिता यांनी ठरवले की, गरजा कमी करायच्या.
 
 
 
पैसे कमावणे हे ध्येय नाही, तर समाजाचे ऋण फेडणे, त्यासाठी समाजकार्य करणे, हे ध्येय आहे, असे त्यांचे जीवनसूत्र. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आयुष्य बदलत जातेच. मात्र, संहिता यांनी या सगळ्या वळणावर सामाजिक बांधिलकी मुळीच सोडली नाही. त्यामुळे पूर्णवेळ नोकरी किंवा व्यवसाय करणे शक्य असूनही त्यांनी अर्धवेळ नोकरी केली आणि उर्वरित वेळ घर आणि सामाजिक कार्यासाठी देण्याचे ठरवले. जे ठरवले ते कायमच केले. आजपासून दि. 15 नोव्हेंबर 2022 पासून संहिता आणि त्यांचे पती उदय हे विश्व हिंदू परिषदेच्या तलासरी येथील विद्यार्थी वसतिगृहाचे व्यवस्थापक म्हणून पूर्णवेळ काम करण्यास जात आहेत. जर गरज भासलीच किंवा तसेच कारण असेल, तर दोन काय पुढे कितीही वर्षे या सामाजिक कार्यासाठी देण्यास संहिता कुलकर्णी तयार आहेत. संहिता कुलकर्णी सध्या राष्ट्र सेविका समितीच्या कोकण प्रांत सेवा प्रमुख आहेत. ठाण्याच्या राजमाता जिजाबाई ट्रस्टच्या कार्यवाह आहेत. समितीच्या आणि ट्रस्टच्या माध्यमातून त्यांचे अविरत सेवाकार्य सुरू आहे.
 
 
 
संहिता यांच्यामध्ये इतकी समाजशीलता किंवा राष्ट्रनिष्ठा कुठून आली असेल? तर संहिता यांचे पिता वसंतराव हे सांगोला तालुक्याचे रा. स्व. संघाचे संघचालक, तर त्यांची आई प्रतिभा या राष्ट्रसेविका समितीच्या सेविका. वसंतराव हे संस्कृतचे शिक्षक, तर प्रतिभा या ‘माता-बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’ या संस्थेच्या संस्थापिका. संहिता यांची आई प्रतिभा यासुद्धा राष्ट्र सेविका समितीच्या कार्यकर्त्या. आणीबाणीनंतर नानाजी देशमुख यांनी महिला कार्यकर्त्यांची बैठक घैतली. त्यात प्रतिभाही होत्या. महिलांनी, गृहिणींनी माता आणि बालक यांच्या विकासासाठी संघटनात्मक कार्य करावे, असे त्यांनी सुचविले. तो धागा पकडून प्रतिभा यांनी ‘माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’ संस्थेची स्थापना केली. दोघेही प्रचंड समाजशील. 1975 साली काँगेस इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली. आणीबाणीमध्ये हुकूमशाहीविरोधात आवाज उठवल्याबद्दल काँग्रेस सरकारने रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांना तुरूंगात डांबले. वसंतरावांनाही दीड वर्षांचा तुरूंगवास झाला. बाबांनी असे काय केले की, त्यांना तुरूंगात डांबले? असा प्रश्न संहितांना पडत असे. छोट्या संहिताची समजूत अतिशय ठामपणे घालताना प्रतिभा लेकीला वस्तुस्थिती सहजपणे सांगत. त्या लहानवयातच संहिता यांना कळले की, सत्य, न्याय याच्या समर्थनार्थ उभे राहायलाच हवे. मग त्यासाठी संघर्ष कोणाच्याही विरोधात करावा लागला तरी.
 
 
 
बाबा वसंतराव आणि आई प्रतिभा यांचे हे ध्येयमयी जीवन पाहतच संहिता मोठ्या झाल्या. घरी रा. स्व. संघाचे वातावरण असल्याने संघसमर्पित अनेक कार्यकर्त्यांचा राबता पुजारी घरात असायचा. सरसंघचालक बाळासाहेब देवरस तसेच राष्ट्र सेविका समितीच्या वं. केळकर मावशीही पुजारी यांच्या घरी येऊन गेले. अर्थात, त्याही बालवयापासूनच समितीच्या शाखेत जात. त्यावेळी समितीच्या प्रचारकांचे घरी येणे-जाणे असायचे. त्यांचे ध्येयशील जगणे, समाजशीलता आणि प्रखर देशनिष्ठा पाहून संहिता यांना वाटायचे की, आपणही शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रचारिका म्हणून कार्य करायचे. वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर त्या अडीच वर्षे समितीच्या प्रचारिका म्हणून सोलापूर, धाराशीव, लातूर इथे कार्यरत होत्या.


हा काळ खूप शिकण्याचा होता. समाजातले धगधगते वास्तव, महिलांची परिस्थिती समाजापुढील प्रश्न त्यांना नव्याने समजले. गृहिणींमध्ये प्रचंड आकलनशक्ती असते, क्रियाशीलता असते. मात्र, त्यांना त्याची जाणीवही नसते. या सगळ्यांसाठी आपण आपल्याला संधी मिळेल, तिथे कार्य करायचे, असे संहिता यांनी ठरवले. पुढे राष्ट्र सेविका समितीची पदाधिकारी म्हणून किंवा ‘राजमाता जिजाबाई ट्रस्ट’च्या कार्यवाह म्हणून सामाजिक कार्य करताना त्यांनी पाहिलेले सामाजिक वास्तव त्यांना नेहमीच मार्गदर्शकच राहिले. असो. वयाच्या सातव्या वर्षापासून त्या समितीच्या सेविका होत्या तेव्हापासून ते आजपर्यंत जीवनात बदल झालेच. मात्र, ‘दिव्य ध्येय की ओर तपस्वी,जीवन भर अविचल चलता हैं’ असे जीवनसूत्र ठरवत संहिताचे सेविकापद अबाधित आहे. संहिता कुलकर्णी यांच्यासारख्या ध्येयशील सेवाव्रती समाजाचे दीपस्तंभच असतात.



 
 
 
Powered By Sangraha 9.0