साडे बारा हजाराव्या प्रयोगाच्या निमित्ताने...

11 Nov 2022 19:35:43

damle
 
 
 
 
नुकताच प्रशांत दामले यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट या प्रयोगाचा १२ हजार ५०० वा प्रयोग पार पडला. एका लग्नाची गोष्ट ह्या त्यांच्या गाजलेल्या नाटकाचा आणि सध्या सुरू असलेल्या 'एका लग्नाची पुढची गोष्ट'शी तसा काहीही संबंध नाही. प्रशांत दामलेंनी या नाटकाचा प्रयोग करून आपल्या आयुष्यातील साडे बारा हजारावा प्रयोग साजरा केला.
 
 
कविता लाड मेढेकर आणि प्रशांत दामले ही तशी रंगमंचवरील सर्वांच्याच ओळखीची जोडी. या नाटकात सुद्धा हीच जोडी आपल्याला पाहायला मिळते. त्यातच अतुल तोडणकर यांची सुद्धा महत्वाची भूमिका आहे. अद्वैत दादरकर यांनी हे नाटक लिहिले आहे. या नाटकाचे कथानक एका सर्वसामान्य घरातील पती पत्नीच्या नात्याचे प्रतिनिधित्व करते. साधारणतः चाळीशी पार केल्यावर पन्नाशीकडे झुकणारे वय आणि या वयातील स्त्री पुरुषांच्या नात्यातील भावविश्व् विनोदी पद्धतीने दाखवण्यात आलेले आहे.
 
'मिड लाईफ क्रायसिस'चे अनेक आयाम यातून सहज अधोरेखित होतात. आज समाज ज्या गोष्टींकडे गांभीर्याने पाहतो त्या गोष्टी खरतर किती सहज आणि अगदी क्षुल्लक असतात हे या नात्यातून दिसून येते. कविता लाड मेढेकर यांनी या नाटकात मनी म्हणजे प्रशांत दामलेंची अर्धांगिनी ही भूमिका केलीये आणि त्याच बरोबर आपल्याला एका प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात पोहोचवण्याचे संवादकाचेही काम केले आहे.
 
मनी आणि मनीच्या घटस्फोटित बहिणीचा सुरुवातीचा संवाद मनी-मन्याच्या नात्याची प्रस्तावना करून देतो आणि मग प्रशांत दामले म्हणजेच मन्याची एंट्री होते. एकही संवाद न घडता फक्त प्रवेशावर दामले टाळ्या घेऊन जातात. आणि ईथून सुरु होतो तो खळाळून हसण्याचा दोन अंकी प्रवास. लहान असताना आपण एकमेकांना जोक सांगायचो, कोडी घालायचो.. आठवतं? केवढे जोक्स यायचे तेव्हा. किती हसायचो आपण. आता रोजचे दिवस जातात येतात, त्यात अनेक सुखद विनोदी घटनाही असतात.
 
ओठांवर एखादी स्मित रेषाही येते. पण खळाळून हसणं काही नियमित होत नाही. इथे नाटक पाहताना मोकळं व्हायला होतं. तेही न बोलता! त्यांच्या भावना, त्यांचे प्रश्न, आपल्यापेक्षा वेगळे वाटतच नाहीच. इथेच नाटक आपल्याला जिंकून घेतं. नात्यातला गुंता हा खरंतर गांभीर्याने घेण्याचा मुद्दा आहे. नात्यांच्या गोष्टी अधोरेखित करणारी अनेक नाटकं येतात. गाजतात. लोकप्रिय होतात. विचार करायला लावतात. पण नाती काय बुद्धीने तोलून मापून घ्यायची गोष्ट असते का?
 
ती भावनेने समजून घेऊन हसत खेळत कशी जपावी हे मनी आणि मन्या तुम्हाला सांगतात. मन्या, मन्याचं कार्यालय, मन्याचा कलीग, मन्याची बायको आणि गर्लफ्रेंड या भोवती हे नाटक फिरत राहतं, खुलत राहतं. मनीची घटस्फोटित बहीण यात ग्रे शेडचीभूमिका करते. तिच्या अस्तित्वामुळे निखळ, निर्मळ माणसातले विशुद्ध भाव ठळक होतात. तिची व्यक्तिरेखा म्हणजे अतिशयोक्ती जरी वाटली तरी पुष्कळ मनोरंजन होतं.
 
 
मधूनच येणारा संजय राऊत यांचा उल्लेख किंवा आघाडी सरकारवर केलेली कोटी हशा पिकवत असली तरी एखादा दुखावलेला प्रेक्षक प्रयोग चालू असता उठून उत्कटतेने आपला निषेध नोंदवतो. दामले आणि तोडणकर अतिशय सराइतपणे असे प्रसंग हाताळून नाटक तारून नेतात. पण यातूनच प्रेक्षक नाटकाशी आणि कलावंतांशी किती जोडले गेले आहेत ते दिसून येते. निखळ मनोरंजन आणि हलकं फुलकं नाटकं पाहायचं असल्यास हे नाटक अगदी उत्तम आहे... प्रशांत दामलेंना पुढील २५ हजाराव्या प्रयोगासाठीही शुभेच्छा...
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0