‘टीआरएस’चे मानापमान नाट्य

10 Nov 2022 20:08:07
 
तेलंगण राष्ट्र समिती
 
 
 
 
तेलंगणमधील रामागुंडम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार, दि. 12 नोव्हेंबर रोजी खत प्रकल्पाचे उद्घाटन करतील. परंतु, आता त्यातही तेलंगण सरकारला आक्षेप. तेलंगणमधील सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीने (टीआरएस) या उद्घाटन कार्यक्रमाला मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना आमंत्रित न केल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री राव यांना कार्यक्रमाला बोलावले नसल्याने तेलंगण राष्ट्र समितीने कुंभाड रचण्यास सुरुवातही केली. परंतु, यामागील सत्य काहीतरी वेगळेच आहे. निमंत्रणावरून वादंग निर्माण झाल्यानंतर प्लांटच्या ‘सीईओ’ने स्पष्टीकरण देत वैयक्तिकरित्या मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांना निमंत्रण दिले असल्याचे सांगता तेलंगण राष्ट्र समितीचा खोटेपणा उघड झाला. केंद्रीय खते आणि रसायनमंत्री मनसुख मांडवीय यांनी दि. 2 नोव्हेंबर रोजी राव यांना पत्र पाठवून कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते. परंतु, तरीही तरीही ‘टीआरएस’चा आरोप आहे की, केंद्र सरकारने मुख्यमंत्री राव यांना निमंत्रित करण्याऐवजी उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्यास सांगितले.
 
 
 
खतांच्या उत्पादनात देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी दि. 7 ऑगस्ट, 2016 रोजी रामागुंडम येथे या युरिया प्लांट प्रकल्पाची पायाभरणी केली होती. आता या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून पंतप्रधानांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होऊन हा प्लांट देशाला समर्पित केला जाणार आहे. राजकीय पोळी शेकत राज्याच्या सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीने आरोप केला आहे की, उद्घाटन कार्यक्रमासाठी ‘प्रोटोकॉल’चे पालन केले जात नाही आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपस्थित राहण्याचे औपचारिक निमंत्रण पाठवले गेले नाही. मात्र, आता त्या प्लांटच्या सर्वोच्च अधिकार्‍याने ‘टीआरएस’च्या खोटेपणाचा आणि राजकारणाचा पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे, देशात मोदी सरकार आल्यानंतर देश युरिया उत्पादनात स्वयंपूर्ण होऊ शकेल, याकरिता बंद पडलेले खत प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्याचप्रमाणे मोदींनी शेतकर्‍यांना स्वदेशी खतांचा वापर करण्याचे आवाहनही केले. त्यामुळे एकिकडे भारताला युरिया उत्पादनात स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना ‘टीआरएस’चे हे मानापमान नाट्य अकलेचा दुष्काळ असल्याचेच द्योतक म्हणावे लागेल.
 
 
 
हिंदूविरोधी शपथा देणार्‍यांना आवरा
 
 
 
काँग्रेसशासित छत्तीसढमधील राजनांदगांव येथील मोहरा येथे राज्यस्तरीय बौद्ध परिषद आयोजित करण्यात आली होती. 7 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या या परिषदेत चक्क लोकांना हिंदू धर्मीयांच्या देवी-देवतांवर विश्वास न ठेवण्याची शपथ दिली गेली. या घटनेचा व्हिडिओ सध्या ‘व्हायरल’ होत असून छत्तीसगढमधील काँग्रेस सरकार पुन्हा एकदा टीकेचे धनी झाले आहे. ‘मी कधीही गौरी, गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवतांवर विश्वास ठेवणार नाही किंवा त्यांची पूजा करणार नाही. देवाने कधी अवतार घेतला यावर माझा विश्वास बसणार नाही,’ अशी शपथ या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती उपस्थित लोकांना देताना दिसून येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यावेळी काँग्रेसच्या महापौर हेमा सुदेश देशमुख यादेखील उपस्थित होत्या. त्यामुळे खुद्द काँग्रेस महापौरांच्या उपस्थितीत हिंदू धर्माला बदनाम करणारा कार्यक्रम होत असल्याने छत्तीसगढ सरकारवर चहुबाजूंनी टीका होत आहे. केंद्रीय आदिवासी व्यवहार राज्यमंत्री रेणुका सिंह यांनी हा व्हिडिओ ट्विट करत म्हटले आहे की, काँग्रेसच्या राजवटीत हिंदूंचा निषेध शिगेला पोहोचला आहे. येथे हिंदू धर्मावर खुलेआम हल्ले होत असून काँग्रेसच्या राजनांदगावच्या महापौर हिंदू धर्माविरोधात शपथ घेत आहेत.
 
 
एखादा सनातनविरोधी कार्यक्रम असो आणि त्याचा संबंध काँग्रेसशी नाही असे होऊ शकते का?” छत्तीसगढ भाजपच्या प्रवक्त्या नीलू शर्मा यांनीही याप्रकरणी काँग्रेसला धारेवर धरत एकीकडे मुख्यमंत्री भूपेश बघेल छत्तीसगढमध्ये रामगमन पथ बांधण्याबाबत बोलत आहे आणि दुसरीकडे काँग्रेसचे नेते हिंदूविरोधी कार्यक्रमात सहभागी होतात. मागील महिन्यातही दिल्लीत अशाच एका कार्यक्रमात सुमारे दहा हजार लोकांना हिंदुत्वविरोधी शपथ देण्यात आली. केजरीवाल सरकारमधील तत्कालीन मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यानंतर त्यांच्यावर झालेल्या टीकेमुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ‘आप’नंतर आता छत्तीसगढमधील काँग्रेसचे सरकारही याला प्रोत्साहन देताना दिसून येत आहे. एकीकडे हिंदूंची मते वळवण्यासाठी राहुल गांधी उशिरा का होईना आता मंदिराचे उंबरे झिजवत आहे, तिकडे हे काँग्रेसजन मात्र हिंदूंना बदनाम करण्यासाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता या हिंदूविरोधाच्या शपथा देणार्‍यांना वेळीच आवरणे आवश्यक आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0