तीन महिन्यात एकही प्रकल्प परत गेलेला नाही - उद्योगमंत्री उदय सामंत

01 Nov 2022 11:16:42
तीन महिन्यात एकही प्रकल्प परत गेलेला नाही - उद्योगमंत्री उदय सामंत
ठाणे: विरोधकांना सत्ता गेल्याचा राग आला आहे. मात्र,आमचे सरकार आल्यानंतर मागील तीन महिन्यात एकही प्रकल्प परत गेलेला नाही. असे स्पष्टीकरण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.महाराष्ट्रातुन प्रकल्प गुजरात राज्यात गेल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांना उदयोगमंत्री सामंत यांनी शनिवारी ठाण्यात आयोजीत पत्रकार परिषदेत तारीखनिहाय कागदपत्रे दाखवत चोख प्रत्युत्तर दिले.तसेच, पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना, काही दिवसातच प्रकल्पासंदर्भातील कामकाजाची श्वेतपत्रिका काढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
महाराष्ट्रात गुंतवणुक करणारे उद्योग गुजरात राज्यात गेल्याच्या मुद्यावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांचा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तारीखनिहाय कागदपत्रे दाखवुन विरोधकांचा समाचार घेतला. ठाण्यात शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वेदांता, एअर बस, मेडिकल डिवाइस, बल्क ड्रॅग प्रोजेक्ट हे महत्वाचे प्रकल्प राज्यबाहेर का गेले. कोणामुळे गेले, हे महाराष्ट्रातील जनतेला समजणे गरजेचे आहे.वेदांता प्रकल्पाबाबत एमआयडीसीने दिलेली तारीखनिहाय कागदपत्रे दाखवुन विरोधकांचे आरोप फोल ठरवले. तर एअरबस प्रकल्पासाठी उद्योग विभागाने त्यावेळी एमआयडिसीसोबत बैठकच घेतली नाही. तसेच, आमचे सरकार सत्तेत आल्यापासून तीन महिन्यात एकही प्रकल्प राज्यातुन गेलेला नाही. जे प्रकल्प गेले आहेत ते आधीच्या सरकारने केलेल्या दुर्लक्षामुळेच गेले आहेत. तेव्हा, लवकरच श्वेतपत्रिका काढणार असल्याचेही ते म्हणाले.
 
 
केवळ एमओयु झाले म्हणजे प्रकल्प येत नाहीत. उद्योग राज्यात टिकावे यासाठी मागील सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात हायपॉवर कमिटी का झाली नाही किंवा मागील १४ महिन्यात कॅबिनेट सब कमिटीची बैठकच झाली नव्हती. २० ऑक्टो.२०२२ ला आम्ही बैठक घेतली. तेव्हा, सत्ता गेल्याचा हा राग असुन केवळ राजकारण केले जात असल्याचा आरोप ना. सामंत यांनी केला. तसेच, हजारो कोटींचे १० प्रकल्प महाराष्ट्रात आले असुन आमचे सरकार आल्यानंतर काय काय केले. हे थोड्याच कालावधीत जाहिर करणार असल्याचे स्पष्ट केले.
 
 
नाणार रद्द केला तरच युती - ना.सामंतांकडुन ठाकरे लक्ष्य
प्रकल्प गेल्याचे आरोप तसेच राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांनी नाणार रिफायनरीबाबत जनतेला खरे सांगावे. उद्धव शिवसेनेने २४ तासात नाणार रिफायनरी रद्द करण्याची अट तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातली. त्यानुसार नाणार डिनोटीफाय केल्यानंतरच दुसऱ्या दिवशी युती करण्यावर शिक्कामोर्तब झाले. असा गौप्यस्फोट ना. सामंत यांनी ठाकरेवर केला. तसेच,तेव्हा ३ लाख कोटींचा हा प्रकल्प दिरंगाईमुळे आता १ लाख ७५ हजार कोटींचा झाला आहे.हे महाराष्ट्राचे नुकसान कुणी केले ? असा सवालही त्यांनी केला.
 
Powered By Sangraha 9.0