बच्चू कडू
अमरावती : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते माजी राज्यमंत्री बच्चू कडू आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील टोकाच्या राजकीय संघर्षाला अखेर पूर्णविराम लागला आहे. कडू यांनी राज्यात झालेल्या सत्तांतरात खोके घेतला होते अशा आशयाची टीका अपक्ष आमदार रवी राणा यांनी कडू यांच्यावर केली होती. त्याला प्रत्युत्तर देत बच्चू कडू यांनी देखील राणा यांच्यावर आरोप केले होते.
अमरावतीतील या दोन नेत्यांमधील अंतर्गत संघर्षाची उब मुंबईतील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत देखील पोहोचली होती. मंगळवारी बच्चू कडू यांनी अमरावतीत आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेत हा वाद संपल्याचे जाहीर केले आहे. रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली तेव्हाच आपल्यातील वाद संपुष्टात आला होता आणि हा विषय संपला असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
मोठेपणाच्या भूमिकेसाठी राणांचे आभार
कार्यकर्त्यांना संबोधित करताना बच्चू कडू म्हणाले की 'आपल्याकडून चूक झाली आहे हे लक्षात आल्यानंतर रवी राणा यांनी शब्द मागे घेतले आणि दिलगिरी व्यक्त केली. राणा यांनी घेतलेल्या या मोठेपणाच्या भूमिकेचे मी स्वागत करतो. तुम्ही शब्द मागे घेऊन दोन पाऊले मागे घेतल्यानंतर आम्ही चार पावले मागे जाण्यास तयार आहोत. त्यांच्या आणि माझ्या संघर्षात मला सर्वसामान्य जनतेचे नुकसान होऊ द्यायचे नाही. काही वाद हे न वाढलेलेच बरे असतात त्यामुळे आम्ही या वादावर पडदा पाडत आहोत,' अशी जाहीर भूमिका आमदार बच्चू कडू यांनी घेतली आहे.