...अ‍ॅण्ड ऑस्कर अवॉर्ड गोज् टू

09 Oct 2022 21:41:18
 
sharad
 
 
 
 
कला, कविता आणि लेखनाबद्दल बोललो, तर या क्षेत्रात सगळ्यांत जास्त योगदान देण्याची क्षमता अल्पसंख्याकांमध्ये आहे. बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त योगदान कुणी दिले? मुस्लीम अल्पसंख्याकांनी सगळ्यात जास्त योगदान दिले आहे, ही गोष्ट विसरून चालणार नाही,” इति शरद पवार. असे बोलून शरद पवारांनी स्वत:मधल्या कलाकाराचा अपमान केला आहे. लेखनामध्ये शरद पवारांसारखे ‘स्क्रिप्ट रायटिंग’ कुणी केले का? बॉम्बस्फोटाने मुंबई हादरली तेव्हा तेरावा बॉम्बस्फोट मुस्लीम वस्तीत झाला. अशी ‘स्क्रिप्ट रायटिंग’ करणारे शरद पवार उत्कृष्ट लेखक नाहीत का? शरद पवारांच्या घरात, कुळात हिंदू श्रद्धा, देवदेवतांना मानत नसतील का? मात्र, सार्वजनिक जीवनात हिंदुत्वाच्या नावाने शंख केल्याशिवाय त्यांचे पानही हलत नाही. ही इतकी उत्कृष्ट अभिनय कला कुणाकडेही नसेल. आठवा ते चिंब पावसात उभे राहून भाषण करणे, आठवा ते 2019 साली उद्धव ठाकरे यांच्या सेना गटाला पाठिंबा देत आतून नसते तेे उद्योगधंदे करणे. हे सगळे करत असताना चेहर्‍यावर असे भाव की, आपण त्या गावचेच नाही. हा इतका उत्कृष्ट अभिनय शरद पवारांशिवाय कुणीही करू शकत नाही. त्यामुळे बॉलिवडूमध्ये मुस्लीम अल्पसंख्याकांचे योगदान जास्त आहे, हे शरद पवार यांनी बोलून स्वत:चा अपमान केला.
 
 
 
काही लोकांचे म्हणणे आहे की, ज्या वयात आराम करायचा, त्या वयात उन्हापावसात काहीबाही बोलत फिरावे लागते, हा जबरदस्त ताणही शरद पवारांवर आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये मुस्लीम अल्पसंख्याकांचे योगदान सगळ्यात जास्त म्हणताना त्यांना भारतीय सिनेउद्योगाचे पितामह दादासाहेब फाळके, लता मंगेशकर, किशोर कुमार, राज कपूर, देव आनंद आणि अमिताभ बच्चनही आठवले नाहीत. बॉलिवूडमधील मुस्लीम कलाकारांना आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय संबंधित लोकांना यानिमित्ताने शरद पवार यांनी खूश केले. हिंदू समाज एकवटून चित्रपटाच्या इस्लामीकरणाला विरोध करतो, या सगळ्यापासून मी खूप दूर आहे, असे शरद पवार यांनी यानिमित्ताने त्यांच्या विशिष्ट मतदारांना आणि सेक्युलर धर्मांधांना सांगितले आहे. माझ्या मते, तर आयुष्यभराच्या राजकारणाचा ‘बेस्ट अ‍ॅक्टिंग-ऑस्कर अवॉर्ड’, उद्धव ठाकरेंसोबत युतीचा ‘बेस्ट सिनेमा ऑस्कर अवॉर्ड’ या सगळ्यांचे मानकरी शरद पवारच आहेत. अ‍ॅण्ड अवॉर्ड गोज् टू...
 
 
योगायोग कसा?
 
 
शरद पवारांबद्दलचाच विषय आहे, तर त्यांच्याबाबत विलक्षण योगायोग घडत असतात. मागे ‘एसटी’चा संप सुरू असताना. वातावरण त्यांच्या विरोधात गेले आणि मग अचानक काही लोक त्यांच्या बंगल्यात घुसले. पण ते तिथे नव्हते. मात्र, दहा मिनिटांत त्यांची कन्या सुप्रिया सुळे आल्या. झाले, शरद पवार वयाने ज्येष्ठ आहेत, या एका गोष्टीमुळे ‘एसटी’ संपात टाचा घासून मेलेल्या कामगारांबद्दलची सगळी सहानुभूती शरद पवारांना देण्याचा प्रयत्न काही लोकांनी सुरू केला. विलक्षण योगायोग असतात. काही काही लोकांच्या बाबतीत. असाच एक योगायोग, गेल्या आठवड्यात त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, ‘पीएफआय’वर बंदी का आणली, याचे स्पष्टीकरण द्यायला हवे तसेच रा. स्व. संघावर बंदी आणायचे कुणी म्हणत असेल, तर त्यावरही चर्चा हवी. सुप्रिया असे म्हणेपर्यंत सहसा कुणालाही वाटले नाही की, त्या असे का म्हणाल्या. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच वामन मेश्राम या क्षीण लोकाश्रय असलेल्या व्यक्तीने रा. स्व. संघाच्या मुख्यालयाला घेराव घालण्याचा मनसुबा जाहीर केला. त्याने प्रयत्नही केला. मात्र, तो अयशस्वी झाला.
 
 
 
आता प्रश्न उठतो की, सुप्रिया सुळे यांना खरेच भविष्यातल्या घटना कळतात का? की योगायोग म्हणायचा. त्यातही पुन्हा आणखीन एक योगायोग. दि. 6 ऑक्टोबरनंतर दि. 8 ऑक्टोबर रोजी शरद पवार आणि वामन मेश्राम एका कार्यक्रमात एकत्र आले, अशी निमंत्रण पत्रिका पाहिली. सब मिले हुए हैं की योगायोग? तर असे प्रचंड योगायोग होत आहेत. दुसरीकडे राहुल गांधी पुन्हा बरळले आहेत. हा योगायोग आहे का? त्यांनी पुन्हा रा. स्व. संघ आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल गरळ ओकली आहे. खूप गाजावाजा करून त्यांनी ‘भारत जोडो’ यात्रा काढली, पण त्याचा अपेक्षित परिणाम झाला नाही. मग या यात्रेला ‘फेमस’ कसे करणार? तर रा. स्व. संघ, मोदी आणि त्यातही वीर सावरकरांबद्दल काही विधाने केली, तर आपण चर्चेत येऊ याची खात्री राहुल यांना आहे. राहुल काहीबाही बोलून उगीचच लोकांना दाखवत असतात की, ते बावळट आहेत. ‘वेश बावळा परी अंतरंगी नाना कळा’ असे त्यांचे आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाचा वापर करून कर्तृत्वशून्य राहुल गांधी लोकचर्चेत आणि प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी करतात. त्यामुळे केरळच्या ‘सुपर फ्लॉप’ यात्रेनंतर कर्नाटकात राहुल यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत गरळ ओकणे हा योगायोग नाही.
 
 
 
Powered By Sangraha 9.0