'शिवसेना', 'धनुष्यबाण' गोठविणार! पवारांना आधीच कल्पना होती?

09 Oct 2022 20:07:21

'शिवसेना', 'धनुष्यबाण' गोठविणार! पवारांना आधीच कल्पना होती?
मुंबई : पवार शिवसेना पक्षाच्या सद्यस्थितीवर आश्वासक असल्याचे दिसत आहेत. "शिवसेना हे नाव गेलं आणि चिन्ह गेलं याचं मला अजिबात आश्चर्य वाटत नाही!, हे होणार याची मला खात्री होती. हल्ली निर्णय कोण घेतं याची माहिती तुम्हाला सर्वांनाच आहे, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. मला पूर्ण खात्री होती की, असं काहीतरी घडेल हे मला माहिती होतं ते घडलं. हे सगळं घडवून आणलं जात आहे का?, या प्रश्नावर उत्तर देताना पवारांनी प्रतिक्रीया दिली नाही.
यापुढे निवडणूकांना पुढे जायचं असेल तर आपल्याला हवे ते चिन्ह राहणार आहे याची खात्री राहत नाही. शिवसेनेने आता नव्या चिन्हाद्वारे निवडणूक लढवावी, अशा सूचना त्यांनी उद्धव ठाकरेंना केली आहे. मी स्वतः वेगवेगळ्या चिन्हांद्वारे लढविली आहे. पहिली निवडणूक बैलजोडी, दुसरी निवडणूक गाय-वासरू, तिसरी निवडणूक चरखा, चौथी निवडणूक पंजा आणि आत्ताचे असलेले राष्ट्रवादीचे चिन्ह घड्याळ या निवडणूक चिन्हांवर मी स्वतः निवडणूक लढविली असल्याची माहिती त्यांनी दिली. लोकं तुम्हाला तुमच्या कामानं लक्षात ठेवतात. चिन्हांचा काहीही फायदा होत नसतो, असेही ते म्हणाले.
पवार शिवसेना ही अजिबात संपणार नाही, असा दावा करत आहेत. उलट शिवसेना पुन्हा जोमाने वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेचे चिन्ह गेल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुठलाही परिणाम होणार नाही, असेही पवार म्हणाले. शिवसेनेच्या नव्या नावांची सूचीही त्यांनी उद्धव ठाकरेंना सुचविली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), असे नावही त्यांना लावता येईल, असेही ते म्हणाले. यापूर्वीही काँग्रेसचे काँग्रेस (इंदिरा ), काँग्रेस (आर), असे गट पडल्याची आठवणही त्यांनी करून दिली. पवार शिवसेना नाव आणि चिन्ह जाणार याची खात्री असल्याचा पुर्नउच्चार या पत्रकार परिषदेत करत होते.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगानंतर शिवसेनेने धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव गोठविल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर एक बैठक घेतली. या बैठकीनंतर ते महाराष्ट्राला पुन्हा एकदा फेसबूक लाईव्ह किंवा पत्रकार परिषद घेऊन संबोधित करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. या बैठकीला महत्वाचे नेते उपस्थित आहेत. उद्धव व आदित्य ठाकरे यांच्यासह दिल्लीतून अरविंद सावंत, अनिल देसाई, भास्कर जाधव यांच्यासह अन्य मंडळी मातोश्रीवर उपस्थित आहेत. विचारधारेशी निगडीत जवळचे चिन्ह शिवसेनेला मिळवण्याचे प्रयत्न असणार आहेत.
Powered By Sangraha 9.0