चैतन्यमूर्ती डॉ. रामचंद्र देखणे

08 Oct 2022 19:45:52
 
डॉ. रामचंद्र देखणे

 
 
 
संत साहित्य आणि लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक प्रवचनकार कीर्तनकार भारुडकार व्यासंगी व्याख्याते लेखक हरिभक्त परायण डॉ. रामचंद्र देखणे यांचे अलीकडेच देहावसान झाले. देखणे सर आत्मचैतन्यातून ब्रह्मचैतन्यात विलीन झाले. ‘मरण माझे मरूनी गेले मज केले अमर’ अशा संत वचनाप्रमाणे देखणे सर अमर झाले. कारण, त्यांच्या मुखी सतत विठ्ठलनाम होते.
 
 
घरची वारकरी संप्रदायाची परंपरा. पुणे जिल्ह्यातील कारेगाव हे त्यांचे मूळ गाव. वडील वारकरी कीर्तनकार. देखणे सर बालवयातच वडिलांसोबत कीर्तनात टाळ घेऊन उभे राहत आणि अभंगांच्या चाली म्हणत ‘कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा’ या उक्तीप्रमाणे देखणे सरांच्या घरीच परमार्थ होता. या परमार्थाच्या साधनेतून त्यांनी पुढे पंढरीच्या वारीचा वसा घेतला. व्यवसायाने ते पिंपरी-चिंचवड प्राधिकरणामध्ये पहिल्या श्रेणीतील मुख्य जनसंपर्क अधिकारी होते. पण, हे शासकीय सेवेतील कर्तव्य बजावित असताना त्यांनी पंढरीची वारी कधी चुकवली नाही. ‘पंढरीचा वारकरी वारी चुको नेदी हरी’ या संत वचनाप्रमाणे देखणे सर केवळ वारीला जात नसत, तर त्यांनी स्वतःची प्रबोधन वारी दिंडी पालखीसह सुरू केली.
 
 
ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात त्यांची ही दिंडी असे. दिंडीमध्ये ते कीर्तन, प्रवचन, भारुड, भजन अशी अखंड सेवा करीत असत. त्यांना विठ्ठलनामाचा टकळा लागलेला असे. महाराष्ट्रातल्या गावोगावांमधील कीर्तन सप्ताहांमधून ते कीर्तनाची तसेच प्रवचनाची सेवा बजावित असत. त्यांच्या लेखनसेवेला अलीकडच्या काळामध्ये 50 वर्षे पूर्ण झाली होती. 50 हून अधिक ग्रंथांचे लेखन त्यांनी केले आहे. हे लेखन प्रामुख्याने ललित लेखन,बालसाहित्य लेखन, संत साहित्य आणि लोकसाहित्य लेखन या स्वरूपाचे आहे. संत साहित्यातील पर्यावरण विचार हा त्यांचा चिंतनाचा विषय असायचा. पुणे येथील नेहरू सांस्कृतिक केंद्रात आयोजित झालेल्या पर्यावरण संमेलनाचे देखणे सर अध्यक्ष होते. सुमारे 100 हून अधिक संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. अलीकडेच संतांच्या गवळणीवर त्यांचा एक ग्रंथ प्रकाशित झाला होता.
 
 
देखणे सर तसे विज्ञान शाखेचे विद्यार्थी. पुणे विद्यापीठातून त्यांनी ‘बीएससी’ ही पदवी संपादन केली. पण, त्यानंतर त्याच पुणे विद्यापीठातून त्यांनी ‘संत एकनाथांच्या भारुडातील तत्वज्ञान’ या विषयावर विद्यावाचस्पती म्हणजे ‘पीएच.डी’पदवी संपादन केली. देखणे सरांना अलीकडेच ज्येष्ठ नाटककार अशोक परांजपे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘महाराष्ट्र कला संस्कृती मंच’ आणि अमरवाणी इव्हेंट फाऊंडेशन’ तसेच ‘भंडारा डोंगर ट्रस्ट’ यांच्यावतीने देण्यात येणारा पुरस्कार विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या हस्ते 27 ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात आला होता. नेमक्या महिन्याभरात देखणे सर आपल्यातून निघून गेले. 34 वर्षांच्या पिंपरी-चिंचवड प्राधिकरणातील सेवेनंतर निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपले सर्व आयुष्य परमार्थाला वाहून घेण्याचे ठरविले होते.
 
 
अगदी अलीकडे असते उत्तर प्रदेशातील निमिषारण्यात गेले होते. निमिषारण्य ही ऋषींची भूमी. या ऋषींच्या भूमीत त्यांनी रामायण-महाभारतावर प्रवचने दिली. देहू येथील भंडारा डोंगरावर संत तुकाराम महाराज यांच्या भव्य मंदिराचा संकल्प सोडण्यात आलेला आहे. या उपक्रमामध्ये देखणे सर यांचा सततचा सहभाग असायचा. त्यांनी तिथे कीर्तन सेवा ही बजावलेली आहे. कोल्हापूर येथे पहिले ‘विश्वात्मक संत साहित्य संमेलन’ आयोजित झाले होते. या संमेलनाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते झाले होते. या संमेलनाच्या पूर्वसंध्येला बाळूमामाचे गाव असलेल्या आदमापूर येथे देखणे सरांनी कीर्तन सेवा बजावली होती. इतकेच काय, या संमेलनात ‘संत साहित्य’ आणि ‘लोकतत्त्व’ या विषयावर परिसंवादात मार्गदर्शन केले होते.
 
 
‘कीर्तनाची गोडी देव निवडी आपणा’ या संत वचनाप्रमाणे देखणे सरांना कीर्तनाची गोडी लागली होती. त्यांचा श्वास आणि ध्यास कीर्तन सेवा हाच होता. ‘पद्मगंधा प्रकाशन’ अरुण जाखडे यांच्या संस्थेने देखणे सरांचे ग्रंथ प्रकाशित केले आहेत. महाराष्ट्रातील अनेक मान्यवर वर्तमानपत्रांमधून देखणे सर यांनी स्तंभलेखन केले आहे. या लेखांची संख्या सुमारे तीन हजारांच्या वर आहे. तसेच, आजवर 2100 कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत. पंढरीची वारी सुरू असताना त्यांची या वारीवरील लेखनसेवा अतिशय गाजली होती. गेल्या अनेक वर्षे ती परंपरा चालू होती.
 
 
‘गवळण वाङ्मय’ आणि ‘स्वरूप’ हा ग्रंथ देखणे सर यांनी अलीकडेच प्रकाशित केला होता. या ग्रंथाचा धागा पकडून त्यांनी अतिशय मौलिक विचार मांडले. ‘ते असे गौळण’ हे शब्दलालित्य आणि भावलालित्य यांनी नटलेले मराठीतील एक प्रभावी रूपक काव्य आहे आणि अध्यात्माचा अर्थ शृंगाराच्या माध्यमातून सांगण्यासाठी कृष्णचरित्रातील लोकजीवन रूपकासाठी निवडले आणि श्रीकृष्णाची लीला गौळणींमधून मांडली गेली. प्रणय, शृंगार, विलास, विरह तसेच प्रेम, रती रस, राग, अनुराग, भक्ती आणि आत्मनिवेदन अशा विविध रंगछटांनी सजलेले वाङ्मय हे मधुर रसाचे ते शृंगारलेले दालन आहे. गौळण काव्य हे शृंगार आणि सौंदर्याच्या माधुरीने भरलेले म्हणूनच अतिशय रसाळ आहे.
 
 
श्रीकृष्णाच्या गुणसंकीर्तनाने आणि लीला संकीर्तनाने भरलेले म्हणून प्रासादिक आहे आणि भक्तिरसाच्या अर्थगर्भाने परिपूर्ण असल्याने भावदर्शी आहे. देखणे सरांनी प्रस्तुत ग्रंथाच्या माध्यमातून भागवत परंपरा, गवळणींचे तत्त्वज्ञान आणि रूपक, राधा रास कृष्णचरित्रातील आक्षेपांचे खंडन, विविध संतांच्या विराण्या आणि गवळणी, शाहिरांच्या गवळणी, लोकगीतातील आणि लोकनाट्यातील गवळणी, आधुनिक मराठी काव्यातील गवळणी या सर्वांचा परामर्श घेतलेला आहे. देखणे सरांनी कीर्तनाच्या बद्दल अतिशय मौलिक चिंतन ‘महाराष्ट्राच्या प्रयोगात्म लोककला’ या प्रकाश खांडगे यांनी लेखन केलेल्या ग्रंथात मांडले आहे.कीर्तनाचे नित्य कीर्तन आणि नैमित्तिक कीर्तन असे दोन भाग पडतात. कीर्तन भावानुभूती देते आणि रसानुभूतीही देते. अध्यात्मिक उद्बोधन हा कीर्तनाचा पाया आहे. तसेच ब्रह्मानंदी टाळी लागणे हा कीर्तनाचा प्रमोदकर्षबिंदू आहे.
 
 
भारुडाबद्दलही देखणे सरांनी चिंतन केलेले आहे. ते असे - शेक्सपियरची नाटके जशी विश्व रंगभूमीची द्योतक आहेत, तशीच आपल्याकडील भारुडे हेदेखील विश्वरंग भूमीची द्योतक आहेत. भारुडांमध्ये नाट्य आहे. ती रुपकाश्रयी आहेत. आध्यात्मिक उद्बोधन आणि समाजप्रबोधन हा भारुडांचा मुख्य उद्देश. महाराष्ट्रातील 13व्या शतकापासून थेट 17व्या शतकापर्यंत जी समाजस्थिती होती, गावगाड्यात ज्या समाजात स्थितीचे प्रतिबिंब उमटलेले होते, त्याचे दर्शन भारुडांमध्ये होते. गोंधळी, भराडी, वाघे मुरळ्या, जोगती यांसारखे लोकसंस्कृतीचे उपासक, वासुदेव भराडी यांसारखे उपासक, गाय, मुंगी, एडका यासारखे पशुप्राणी या सर्वांचे दर्शन भारुडांमध्ये होते. ‘बहु रूडते भारुड’ असे म्हटले गेले असले तरी दोन तोंडाच्या पक्ष्याला ‘भृंड’ असे म्हणतात, त्यातून भारुडाची उत्पत्ती झाली असावी.
 
 
कारण, भारुडाचे सतत दोन अर्थ आपल्याला लक्षात घ्यावे लागतात,असे देखणे सर नेहमी सांगत. देखणे सर भारुडाचे निरूपण करताना आपण उत्तम अभिनेता आहे, हेदेखील दाखवून देत. वासुदेव गोंधळी, जोशी भराडी दादला अशी वेगवेगळी भारुडे ते प्रत्यक्ष सादर करीत असत. पुणे येथे लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित झालेल्या साहित्य लोककला संमेलनात देखणे सरांनी भारुडांचा कार्यक्रम सादर केला होता. तो अतिशय अविस्मरणीय ठरला होता. महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि महाराष्ट्राचे लोकसाहित्य यांच्यात देखणे सर यांचे अंतर्बाह्य एकरूप होणे ही अतिशय अपूर्वाई होती. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अलीकडच्या काळात ते सदस्य होते. तसेच पुणे येथील गांधर्व महाविद्यालयाच्या समितीचे ते अध्यक्ष होते. देखणे सरांच्या वाणीत रसवंती होती आणि लेखणीमध्ये प्रासादिकता होती. त्यांची आठवण सातत्याने आपणास होत राहील.
 
 
अवघ्या 66 वर्षांत देखणे सर आपल्याला सोडून गेले. त्यांच्या जाण्याने संतसाहित्य आणि लोकसाहित्य यांचे अनुबंध जोडणारा महत्त्वाचा दुवा निखळला आहे. देखणे सरांना विनम्र श्रद्धांजली.
 
 
-बाळासाहेब काशीद
(लेखक तुकाराम महाराज मंदिर ‘भंडारा डोंगर ट्रस्ट, देहूचे अध्यक्ष आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0