एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असो किंवा एखाद्या संस्थेचा वर्धापन दिन असो, तो सारख्याच उत्साहाने व आनंदात साजरा केला जातो, अशा रीतीने आनंदाची देवाणघेवाण करणे, हे माणसाच्या जातीचे एक वैशिष्ट्य असते. नववर्षाच्या किंवा जन्मशताब्दीच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन आदर व्यक्त करणे हेही माणसाच्या सांस्कृतिक प्रगल्भतेचे लक्षण असते. असे भाग्य जसे एखाद्या महनीय व्यक्तीच्या वाट्याला येते, तसेच ते एखाद्या ग्रंथाच्या किंवा कलाकृतीच्याही भाग्यात असते, म्हणूनच ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत स्वयंवर’ या नाटकांची शताब्दी रसिकांनी उत्साहात साजरी केली. असे भाग्य वर्तमानातील ज्या लोकप्रिय व अजरामर नाटकाला लाभले व ज्या नाटकाने येत्या 8 ऑक्टोबरला 60व्या वर्षांत पदार्पण केले, त्या नाटकाचे नाव आहे, आचार्य अत्रे यांचे ‘तो मी नव्हेच’ हे होय.
नाट्यनिर्माते, नाटककार व दिग्दर्शक मो. ग. रांगणेकर यांच्या ‘नाट्यनिकेतन’ या नाटक कंपनीने सोमवार दि. 6 ऑक्टोबर, 1962 रोजी दिल्ली येथे या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग केला. याच दिवशी दसर्याची ‘विजयादशमी’ होती! हा दसर्याचा ‘विजयी’ मुहूर्त या नाटकालाच नव्हे, तर अवघ्या मराठी रंगभूमीलाच फार फार लाभदायक ठरला! या एका नाटकाने आधीचेच लोकप्रिय राजकीय नेते, विनोदी फर्डे वक्ते असे आचार्य अत्रे अधिकाधिक रसिकप्रिय होत गेले, निर्माते रांगणेकरांना सुगीचे दिवस येऊन स्थैर्य व कीर्ती लाभली आणि मुख्य म्हणजे मराठी रंगभूमीला सर्वार्थाने व सर्वांगाने समृद्ध करणारा ‘प्रभाकर पणशीकर’ हा समर्थ अभिनेता लाभला.
चित्रपट जेव्हा बोलू लागले आणि नाट्य प्रेक्षकांच्या झुंडीच्या झुंडी जसजशा बोलपटांच्या चित्रपटगृहांकडे झेपावू लागल्या; तेव्हा मराठी रंगभूमीवर एकेकाळी अधिराज्य गाजवणार्या संगीत नाटकांची ‘बोलती’ आणि ‘चलती’ हळूहळू बंद पडत चालली. तत्कालीन संगीत व गद्य नाटक कंपन्या जशा बंद पडत चालल्या; तद्वतच तालेवार गायक नट व अभिजात नटसम्राटही अस्तंगत होत गेले. रंगभूमीवरील झगमगते व वैभवशाली ‘गंधर्वयुग’ तर नजरेआड झालेले. मराठी रंगभूमीला त्या कठीण काळात कोणी तारणहारच उरला नव्हता. म्हणजे रंगभूमीवर अधूनमधून नाटके होत होती. नवीन नाटकांचे प्रयोगही होत होते; पण त्या काळी अस्तित्वात असणार्या कोणत्याही नाटक कंपनीकडे नाट्यरसिकांना आकर्षित करून खेचून घेणारे, प्रेक्षकांना वेड लावणारे, ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड नाट्यगृहाबाहेर झळकवणारे असे यशस्वी नाटक मात्र कोणाहीकडे नव्हते आणि अशा कठीण काळात मराठी रंगभूमीला सर्वार्थाने उभारी देऊन तिला समृद्ध करणारे ‘तो मी नव्हेच’ नाटक आले आणि मरगळलेल्या मराठी रंगभूमीला ‘रंगसुंदर’ आणि ‘रंगसमृद्ध’ झाल्याचा ‘साक्षात्काराच’ झाला.
1962 पर्यंत रंगभूमीवर न्यायालयात घडलेले नाटक आलेले नव्हते. हे या नाटकाचे पहिले वैशिष्ट्य! दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, त्या काळी महाराष्ट्रात गाजलेल्या ‘काझी खटल्या’ची या नाटकाला पार्श्वभूमी होती आणि तिसरे आणि महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, आरोपी ‘लखोबा लोखंडे’ हा चार-पाच मिनिटांत वेषांतर करून फिर्यादी पक्षाच्या मुलींना व साक्षीदारांना हातोहात फसवून, पुन्हा आरोपीच्या पिंजर्यात, मूळ वेषात न्यायालयात कसा दिसतो, ते!
हे ‘लखोबा लोखंडे’चे पात्र नटवर्य प्रभाकर पणशीकर यांनी आपल्या अंगभूत सामर्थ्याने व झटपट वेषांतराने इतके काही सजीव साकार केले की, एकच नट रंगमंचावर पाच-सहा भूमिका बेमालूम करतो, यावर प्रेक्षकांचा विश्वासच बसत नव्हता!
पुढे पुढे तर हा पणशीकरांचा ‘लखोबा’ इतका लोकप्रिय झाला की, राजकारणातही ‘लखोबा लोखंडे’ ही उपाधी एक उपमान म्हणून रुढ होऊन गेली! समाजातही फसवणार्या व्यक्तीला लोकच ‘लखोबा’ म्हणू लागले. हा आचार्य अत्रे यांच्या लेखणीचा चमत्कार जसा होता; तसाच तो प्रभाकर पणशीकर यांच्या अभिनय सामर्थ्याचाही होता! या नाटकाने मराठी रंगभूमीवर तर विक्रमांचे नवेच युग निर्माण केले.
‘हाऊस फुल्ल’चा तर या नाटकाने यंत्र तंत्र धडाकाच लावला होता. नागपूरला तर पहिल्या दौर्यातच ऑक्टोबर 1962 मध्ये एका दिवसात तीन प्रयोग ‘हाऊस फुल्ल’ घेतलेच आणि मुंबईतील दादरच्या ‘डिसिल्वा हायस्कूल’च्या पटागंणात खुल्या नाट्यगृहात ओळीने आठ दिवसांत प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीचे आठ प्रयोगही याच नाटकाने केले. रांगणेकरांच्या नाटक कंपनीने मध्ये पडदा टाकून रंगमंचाचे दोन भाग करून या नाटकाचे 190 प्रयोग केले; तर नंतर ‘अत्रे थिएटर्स’ ने मराठी रंगभूमीवरील पहिलावहिला ‘फिरता रंगमंच’ वापरून या नाटकाचे 303 प्रयोग केले. नाटकातील झटपट वेषांतराइतकेच या ‘फिरत्या रंगमंचा’चे प्रेक्षकांना अपार आकर्षण होते. कारण, तोपर्यंत मराठीच काय, तर जगातील कोणत्याही रंगभूमीवर असा ‘पोर्टेबल फिरता रंगमंच’ अस्तित्वातच नव्हता.
या नाटकाचे भाग्य असे की, अनेक ‘शतक महोत्सव’ हे नाटक करू शकले. ‘नाट्यनिकेतन’व ‘अत्रे थिएटर्स’ नंतर हे नाटक निर्माते प्रभाकर पणशीकर यांच्या ‘नाट्यसंपदा’ संस्थेकडे आले आणि पणशीकरांनी या नाटकांच्या प्रयोगांचा सर्व महाराष्ट्रभर अत्यंत वेगाने धडाकाच सुरू केला. शतक, त्रिशतक (300), अष्टशतक (800), पंचशतक (500), सहस्त्र (1000), 1200, 1300, 1500, 1600, 2000 व शेवटी 2700 वा महोत्सवी प्रयोग पुण्यातील कोथरुड येथील यशवंतराव नाट्यगृहात सादर केला. तत्कालीन सर्व क्षेत्रातील महनीय व्यक्ती तर या प्रयोगाला येतच होत्या. परंतु, या नाटकाच्या अनेक ‘शतक महोत्सवां’ना फार मोठ्या कीर्तीवंत मान्यवरांचीही उपस्थिती लाभली, हे या नाटकाचे आणखी एक एक महदभाग्य!
चित्रपती व्ही. शांताराम, नागरपूरचे डॉ. ना. भा. खरे, बै. नाथ पै, महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री बाळासाहेब देसाई,न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी,चित्रपट अभिनेते दिलीप कुमार,दिग्दर्शक ऋषिकेष मुखर्जी, सर्वोच्चन्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती यशवंतराव चंद्रचूड नरश्रेष्ठ गजानन जहांगिरदार, नाटककार बाळासाहेब ठाकरे,विद्याधर गोखले, शिवाजीराव भोसले आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे इत्यादी नामवंतांनी महोत्सवाचे अध्यक्षपद भूषवून नाटकाला व सर्व कलावंतांसह प्रभाकर पणशीकरांना भरभरून आर्शीवाद दिले.
महाराष्ट्रातील मुख्य शहरात तर या नाटकाचे प्रयोग वारंवार होत असत. पण, महाराष्ट्राबाहेरच्या राज्यातही या नाटकाचे प्रेक्षकांना वेड होते. बडोदा, अहमदाबाद, इंदूर, भोपाळ, ग्वाल्हेर, दिल्ली,गोवा, बेळगाव अशा महत्त्वाच्या शहरांतील या नाटकाने ‘हाऊस फुल्ल’चा विक्रम केला.
या नाटकाने राज्याची सीमा जशी ओलांडली, तशीच भाषेची सीमाही पार केली. स्वतः पणशीकरांनी बेळगावमध्ये राहून कानडी भाषा शिकून घेतलीच व कानडी भाषेतील या नाटकाचे कर्नाटकात 28 प्रयोग केले. हा ही या नाटकाचा एक विक्रमच ठरला. पणशीकरांचा कानडी लाखोबाही कर्नाटकात खूप लोकप्रिय झाला.
एक लक्षात घेतले पाहिजे की, हे नाटक केवळ हशा-टाळ्या घेणारे मनोरंजनपुरतेच मर्यादित नव्हते. या नाटकाने रंजनासह ‘भजनात्मक’ प्रबोधनाचेही कार्य मोठ्या प्रमाणात केले. या नाटकाच्या शेवटच्या अंकातील शेवटच्या प्रवेशातील सरकारी वकिलाचे भाषण व नंतरचे आरोपीच्या पिंजर्यातील लखोबा लोखंडेचे बचावाचे भाषण म्हणजे नाटककार आचार्य अत्रे यांच्या लेखणीचा उत्कृष्ट अविष्कार ठरला आहे. लग्न केलेल्या उपवर मुली आणि त्यांचे पालक यांच्या डोळ्यात या नाटकाने झणझणीत अंजन घालून समाजप्रबोधनाचे फार मोठे कार्य केले, असे सर्व क्षेत्रातील मान्यवारांनी मान्य केेले आहे.
नाटककार, निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते असे नाटकाचे महत्त्वाचे तीन शिल्पकारही आता हयात नाहीत. शिवाय या नाटकात अनेक लहानमोठ्या भूमिका अनेक स्त्री-पुरुष अभिनेत्यांनी करून हे नाटक सतत प्रयोगशील राहील याची काळजी घेतली, असेही कलावंत आता आपल्यात नाहीत. अशा या सर्व ज्ञात अज्ञातांना, या नाटकाच्या हीरक महोत्सवाच्या निमित्ताने या नाटकाचा एक घरातलाच साक्षीदार या नात्याने मी मन:पूर्वक श्रद्धांजली अर्पण करीत आहे !
(या नाटकाचा हीरक महोत्सवी समारंभ शनिवार दि. 8 ऑक्टोबर रोजी रविंद्र नाट्य मंदिरात सायंकाळी 7 वाजता संपन्न झाला.)
(तो ‘मी नव्हेच‘ ची जन्म कथा समजण्यासाठी ‘राजहंस’ प्रकाशित ‘तोच मी‘ हे पणशीकरांचे आत्मवृत्त वाचावे.)
-दाजी पणशीकर