ठाकरे गटाचा आणखी एक नेता अडचणीत; ACB कडून चौकशी सुरु!

08 Oct 2022 15:49:02
 
Vaibhav Naik
 
 
 
रत्नागिरी: उद्धव ठाकरे गटातील अनिल परब यांच्यानंतर कोकणातील आणखी एक नेता तपास यंत्रणांच्या जाळ्यात सापडला आहे. अ‍ार्थिक गैरव्यवहाराप्रकरणी सिंधुदुर्गातील उद्धव ठाकरेंच्या गटातील आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीने चौकशी केली आहे.एसीबीने तब्बल अर्धा तास चौकशी केली, यानंतर 20 वर्षांतील उत्पन्नाचा हिशोब देण्यासाठी वैभव नाईक यांना आठ दिवसांची मुदत दिली आहे.
 
 
वैभव नाईक हे कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार आहेत. दरम्यान शुक्रवारी त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांच्याकडून चौकशी झाली. यावेळी एसीबीने वैभव नाईक यांना 2002 ते 2022 या कालावधीतील उत्पन्नाची चौकशी केली. तसेच नाईक यांना उत्पन्नाचा तपशील देण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली आहे. या आठ दिवसात वैभव नाईक यांनी एसीबीकडे सर्व उत्पन्नाचा तपशील द्यायचा आहे.
 
 
रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तेविषयी चौकशी केली. कणकवलीतील शासकीय विश्रामगृहात ही चौकशी झाली. रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पथकाकडून ही चौकशी करण्यात आली. यानंतर एसीबीने 12 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी येथे उपस्थित राहण्यासंदर्भात नोटीस दिली आहे. त्यामुळे तपास यंत्रणांची नजर आता कोकणाकडे वळल्याचे दिसत आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0