उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टिप्पणी!

07 Oct 2022 11:48:27


पुणे : “शिमग्यावर कधीही प्रतिक्रिया देत नसतात”, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या दोन्ही मेळाव्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांना पुण्यात आज गुरुवारी ( दि.६) टोला लगावला. मी काल मेळावे सुरू असताना नागपूर येथील धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या कार्यक्रमात होतो त्यामुळे त्यांचे भाषण ऐकले नाही रात्री ही भाषणे बघितली असे ते म्हणाले. तुम्ही कितीही फिरवून विचारले तरी माझे हे एकच उत्तर असेल, असे त्यांनी सांगितले.
 
एकनाथ शिंदे भाजपाची स्क्रिप्ट घेऊन बोलतात, या उद्धव ठाकरेंच्या आरोपावरून बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "असं जे म्हणत आहेत, त्यांनी आपला स्क्रिप्टरायटर बदलायला हवा. तेच ते, तेच ते.. किती वेळा तीच स्क्रिप्ट. एकतर तुमच्या स्क्रिप्टरायटरला क्रिएटिव्हिटी दाखवायला सांगा, नाहीतर नवीन स्क्रिप्टरायटर आणा. आम्हालाही हे ऐकून कंटाळा आला आहे.”
 
...म्हणूनच ठाकरेंवर ही वेळ आली
शिवसेनेच्या सगळ्या फुटीचं मुख्य कारणच हे आहे की मूळ शिवसेनेचा विचार बाजूला टाकून उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा विचार स्वीकारला. तसं आचरण स्वीकारलं. ज्यांचे मुंबईच्या बॉम्बस्फोटाशी संबंध आहेत, जे सावरकरांना रोज शिव्या देतात अशा लोकांसोबत बसणं मान्य केलं. म्हणूनच त्यांच्यावर ही वेळ आली”, असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
 
विधानसभेवर भगवा फडकणारच. पण तो शिंदेंच्या नेतृत्वाखालची खरी शिवसेना आणि भाजपा या युतीचा भगवा फडकणार”, असेही फडणवीस म्हणाले.
 
 
एकनाथ शिंदे यांनी खरी शिवसेना कोणती, हे दाखवून दिले असेही देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन करताना सांगितले.
याबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, “ज्या प्रमाणात लोक बीकेसीच्या मैदानावर पाहायला मिळाले ते पाहाता एकनाथ शिंदेंनी हे दाखवून दिलं की खरी शिवसेना कोणती. त्या मैदानाची क्षमता शिवाजी पार्कपेक्षा दुप्पट आहे. पण तरीही तिथे तुडुंब गर्दी होती. महाराष्ट्रभरातून लोक आले होते. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच, हे कालच्या मेळाव्यात सिद्ध केले आहे. यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो”, असं फडणवीस म्हणाले.
 
 
आपल्या भाषणात एकनाथ शिंदें यांनी विकासाच्या मुद्द्यांना हात घातला, उद्धव ठाकरेंच्या आधीच्या भाषणात हे कधी दिसले नाही,“आम्ही काय करतोय, काय करणार आहे हे एकनाथ शिंदेंनी भाषणात सांगितलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते पक्षप्रमुखाचंच भाषण करायचे. त्यांनी एकही भाषण मुख्यमंत्र्याचं केलं नाही”, असेही फडणवीस यांनी या मेळाव्यावर प्रतिक्रिया देताना पुण्यात सांगितले.
Powered By Sangraha 9.0