शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी दाखविले उद्धव ठाकरेंना 'आस्मान'!

दसरा मेळाव्याच्या डबलबारीत टोमणेसभेला मुद्देसुद आणि समर्पक उत्तर

    05-Oct-2022
Total Views |

Eknath Shinde

शिंदे गट दसरा मेळावा 2022
मुंबई : "तुम्ही आम्हाला म्हणता बाप चोरणारी टोळी निर्माण झाली. पण तुम्ही तर बापाला विकण्याचा प्रयत्न केला. सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली. आम्ही काय तुम्हाला ती टोळी म्हणयाचे का?, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विचारला आहे. आज लोकांना कळून चुकलं आहे की तुम्ही कोण आहात. त्यामुळेच आज हा जनसागर आमच्यासोबत आहोत. तुम्ही सत्तेसाठी लाचार झालात. भरकटलात बाळासाहेबांच्या विचारांशी फारकत घेतली. हिंदुत्ववादी राजकारण करुन मी चुक केली, असं राज्याच्या विधानसभेत सांगितलं. हे जाहीरपणे सांगताना काँग्रेसला खुश करण्यासाठी तुम्ही अशी वक्तव्य केलं तेव्हा तुम्हाला काहीच वाटलं नाही. शिंदे गट दसरा मेळावा 2022 मुंबईतील बीकेसी मैदानावर पार पडला त्यावेळी ते बोलत होते. 
 
याकूब मेननला ज्या न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली ती शिक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्याला तुम्ही मंत्री केलं. मुंबईकरांच्या रक्ताचा सौदा करणाऱ्याच्या आरोपीला माफी द्या म्हणून मागणी करणाऱ्याला तुम्ही मंत्रीपद दिलंत आत्ता सांगा खरे गद्दार कोण. आमच्यावर वाट्टेल ते आरोप करता आम्हाला परवा नाही. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन तुम्ही जेव्हा आमच्याच विरोधात बोलता.", असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केला. दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमात भाषण करताना ते बोलत होते. तुम्ही जे पाप केलं त्याबद्दल आधी बाळासाहेबांच्या शीवतीर्थावरच्या समाधीवर माफी मागा नंतर आमच्याशी बोला, असे आव्हान त्यांनी उद्धव ठाकरेंना दिले.
 
गेली ४०-४० वर्षे आम्ही हिंदुत्वाच्या विचारांसाठी आम्ही खास्ता खाल्या. बाळासाहेबांच्या नेतृत्वात आंदोलनं केली. पोलीस केसेस घेतल्या घरादारांवर तुळशीपत्र ठेवलं. बाळासाहेब आमचं दैवत आहे. त्या देवाचा अंश म्हणून मी तुमच्याकडे पाहत होतो. गप्प होतो. अडीच वर्षे तुम्ही जे केलं तेव्हा आम्ही गप्प होतो. अनेक आमदार आम्हाला सांगत होते. आपण केलेली ही विचारांशी फारकत आपल्याला महागात पडणारी आहे. त्यावेळी आम्ही आदेश समजून आम्ही गप्प बसलो. पण बाळासाहेबांच्या विचारांशी तिलांजली ज्यावेळी देण्याचा प्रयत्न झाला तेव्हा आम्ही पेटून उठलो. आमच्या मतदार संघात ज्यावेळी पुढचा आमदार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा असल्याचे भासवला गेला. त्यावेळी आम्ही पक्षप्रमुखांशी बोलण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी त्यांना लाजा वाटत नाही का?, असा प्रश्न विचारला जायचा.
 

 
"मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना उघड्या डोळ्यांनी आम्ही पक्ष संपताना पहायचा का?"


आमच्या आमदारांना निधी नाही. आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसला शंभर शंभर कोटींचा निधी दिला जायचा. ज्यावेळी हे असह्य झालं तेव्हा आम्ही उठाव केला. गद्दार गद्दार म्हणून टाहो फोडण्यापेक्षा आता आत्मपरिक्षण करा. आत्तापर्यंत राज ठाकरे, नारायण राणे कित्येक लोकं गेले. इथे निहार बसलायं. स्मिता ठाकरेही बसल्यात हे सगळे चुकीचे आहेत का? आम्ही तुमच्या हिताचं सांगितलं ते तुम्हाला ऐकवलं नाही. कुठल्या परिस्थित शिवसेना भाजपचं सरकार आलं ते आपण सर्वांनी पाहिलयं. निर्णय़ घेताना आम्हालाही वाईट वाटलं. गेल्या अडीच वर्षांतील खदखद जी होती ती कधीतरी बाहेर येणारच होती. त्यामुळेच हा उठाव झाला. हा परिवर्तन आणि उठाव ज्याची दखल जगातील 35 देशांनी घेतली. जनतेच्या सेवेसाठी असे निर्णय घेण्यासाठी धाडस लागते.


 
"अडीच वर्षे मुख्यमंत्री होता फक्त अडीच दिवस मंत्रालयात गेलात!"


२०१९मध्ये जेव्हा तुम्ही महाविकास आघाडीसोबत गेला होता तेव्हा तुम्ही राजीनामे दिले होते का? तेव्हा जनादेशाशी गद्दारी कुणी केली? अडीच वर्षांत तुम्ही अडीच तास मंत्रालयात गेलात. फक्त कोविड कोविड करून दुकानं बाजारपेठा बंद केल्यात पण तुमची दुकानं मात्र, सुरू होती. माझ्याशिवाय हे कुणाला माहीती असणार? एकेकाळी हिंदूंना हिंदू बोलण्यासाठी लाज वाटायची ही ओळख बाळासाहेबांनी पुसून टाकली. बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट म्हणायलाही तुम्ही कचरत होता. त्यांच्याही नावापुढे फक्त पक्षप्रमुख म्हणून नाव लावलं जात होतं. मंत्रालयाबाहेर पाटी लागली यातच तुम्ही खुश होतात. शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही जेव्हा फ्री देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या तेव्हाही तुम्ही काहीच केले नाही. पण आज सांगतोय. जो कोणी देशात देशविरोधी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा करणार असेल. देशाच्या अखंडतेला नख लावण्याचा प्रयत्न केला तर खपवून घेतल्याशिवाय जाणार नाही., असा इशाराही त्यांनी देशविघातक शक्तींना दिला.
 
"पीएफआयबद्दल एक शब्दही का काढला नाही?"
 
पीएफआयबद्दल एक शब्दही त्यांनी काढला नाही. मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सांगतोय केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. पीएफआयबद्दल तुम्ही एक शब्दही काढला का, का तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला वाईट वाटेल म्हणून. पीएफआयबद्दल आज ठासून सांगतोयं. केंद्र सरकारने केलेल्या कारावाई प्रमाणेच राज्यातील पीएफआयशी संबधितांवर मुख्यमंत्री म्हणून कठोर कारवाई करणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणण्याची मागणी करता? थोडी जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे. आज ज्या देशहितासाठी झटणाऱ्या संघटनेवर शिंतोडे उडवणाऱ्यांसोबत तुम्ही बसता. बाळासाहेब आणि शरद पवारांशी मैत्री होती. पण बाळासाहेबांनी कधी पवारांशी राजकीय मैत्री केली नाही. वैचारिकदृष्ट्या काँग्रेस-राष्ट्रवादी तुमचा विरोधक तेव्हा आपले गळे कापायला निघाले तेव्हाही तुमचे डोळे उघडले नाहीत. महाविकास आघाडीत शिवसेना हा मोठा पक्ष. जेव्हा शिवसेनेच्या मुळावर हे पक्ष उठले तेव्हा हा महाभारतातील धृतराष्ट्र संजय जितके सांगेल तितकेच ऐकत होता.
 
शिवसेना कुणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही!

 
"शिवसेना ही कुण्या एकाच्या मालकीची प्रा.लिमिटेड कंपनी नाही. एखाद्याबरोबर भागीदारी केली आणि दुसऱ्याशी काँट्रॅक्ट केलं ही गोष्ट खपवून घेणार नाही. आम्हाला आमच्या धंद्यावरुन हिणवलं. टपरीवाला, रिक्षावाला, चहावाला काय काय म्हणून आम्हाला हिणवलं. आता बोलणारे कुठे आहेत? (संजय राऊत) काँग्रेस-राष्ट्रवादीशीच हे चहावाला, टपरीवाला, रिक्षावाला लढून त्यांचे किल्ले भुईसपाट केले. तेव्हा कुठे तुम्ही उभे राहिलात. का शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. का टपरीवाला मुख्यमंत्री होऊ शकत नाही? का सर्वसामान्य गरीबाचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकत नाही? काय फक्त सोन्याचा चमचा घेऊ येणाऱ्यांनीच मुख्यमंत्री व्हायचं आहे. ही जहागीरी महाराष्ट्राच्या जनतेने तोडून टाकलेली आहे. तुम्ही चहावाल्याची खिल्ली उ़डवतायं. आज ज्या चहावाल्याची खिल्ली उडवता त्यांच्या पक्षाला पक्षाध्यक्ष मिळत नाही. इतके पक्षप्रमुख आहे त्यांच्याकडे पक्ष नाही.", असेही त्यांनी सांगितले.
 
बाळासाहेबांची स्वप्न पूर्ण करणाऱ्या मोदी-शहांची खिल्ली तुम्ही उडवता?

 
"मी इंदिरा गांधींनाही मानत होतो. त्या या देशाच्या प्रंतप्रधान होऊन गेल्या. त्याच प्रमाणे आता मोदींनी जगाला भूरळ घातली आहे. जेव्हा जगावर संकट येतं तेव्हा इथून मदत जाते. तुम्ही हे कधी पाहिलं होतं का? त्यांची टिंगल तुम्ही लोकं करता. बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या कलम 370 हटवणाऱ्या अमित शाहांना तुम्ही अफझल खान म्हणता. ज्यांनी घोषणा केली की मंदीर वही बनाएंगे ते बाळासाहेबांचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींची पूर्ण केलं त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची टींगल करता. तुम्ही कुणाकुणाला हिणवतायं? राणेसाहेबांना तुम्ही जेवणाच्या ताटावरुन उठवलं. काय तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीचा काय अपमान झाला? माझा कंत्राटदार म्हणून उल्लेख करता? होय मी या राज्याच्या विकासाचं कंत्राटी मुख्यमंत्री आहे. माझी चिंता करू नका, बाळासाहेबांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सडकून टीका केली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभारामुळ देशाचं वाटोळं झालं हे बाळासाहेबांनी शिकवलं. तुम्ही त्यांच्या विचारांना तिलांजली दिलीत.", अशी आठवण यानिमित्ताने शिंदेंनी करुन दिली.
 
"शिंदेंची मुख्यमंत्रीपदाची संधी ठाकरेंनी हुकवली?"
 
आम्ही महाविकास आघाडीला सुरुवातीपासून त्याला विरोध केला. योग्य वेळ आली तेव्हा निर्णय घेतला. शरद पवारांनी तेव्हा अट घातली उद्धव ठाकरे तुम्ही मुख्यमंत्री व्हा. पवार साहेबांनी सांगितलं उद्धवजी तुम्हाला मुख्यमंत्री व्हावं लागलं. तुम्हीही असचं सांगितलं बाळासाहेबाचं हे स्वप्न आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड करावी, असं पवारांचं मत होतं. त्यालाही पाठींबा मीच दिला. आपल्यात काय ठरलं ते आम्ही आत्ता सांगत नाही. एक दिवस नक्तीच सांगेन. पण तुम्ही जे बोललात ते ऐकून एखाद्याला हार्ट अटॅक आला असता. पण तरीही मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत तुम्ही बसा हे सांगणारा मीच पहिला होतो. इथल्याच हॉटेलमध्ये ही गोष्ट ठरली होती.
 
बाळासाहेबांच्या विचारांची करुन दिली आठवण!

बाळासाहेबांनी म्हटलं होतं, एकवेळ मी माझं दुकान बंद करेल. पण त्या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणार नाही. त्याच बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली तुम्हाला काहीच कसं नाही वाटलं. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांच्या जोरावर दसरा मेळाव्याला गर्दी जमावता. त्यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी मदत करता. तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही.
 
तुम्ही वर्क फ्रॉम होम करणारे आम्ही वर्क विदाऊट होम करणारे लोकं!
 
"सत्ता गेल्यानंतर तुम्हाला बाळासाहेबांची आठवण येते. सत्ता गेल्यानंतर आता तुम्हाला गटप्रमुख शाखाप्रमुखाची आठवण येते. तेव्हा आमदारही नकोसे वाटत होते. माझ्या गणपती दर्शनावरही तुम्ही टीका केली. त्यानंतर मीच त्यांना कामाला लावलं. त्यानंतर सगळे फिरायला लागलो. माझं कुटूंब माझी जबाबदारीवरुनही त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. हम दो हमारे दो, असं तुमचं सत्ताकारण. तुम्ही वर्क फ्रॉम होम करणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिलंयं. पण आम्ही ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करणारे लोकं आहोत. आम्ही वर्क विदाऊट होम करणारे लोकं आहोत," असा टोलाही त्यांनी लगावला.
 
 
"आज आमचा बाप काढला. पण पूर, दुष्काळात मदत पोहोचवण्यासासाठी कुठे कुठे गेलो नाही. महालक्ष्मी एक्सप्रेस पूराच्या पाण्यात कुणी जायला मागत नव्हतं. पण मी तिथे पोहोचलो. सांगली पूरावेळीही गुरंढोरं मेली होती. कुबट वास येत होता. त्यावेळीही तिथे बसलो कामं केली. तिथल्या बचाव पथकांनीही पाहिलं. गर्भवती स्त्रियांना डॉक्टरांची मदत घेतली. कोविडमध्ये तर आपलेही परके झाले होते. मात्र, हा एकनाथ शिंदे पीपीई किट घालून महाराष्ट्रात पोहोचला. कोविड काळातही डॉक्टर, नर्सेसला धीर दिला. रुग्ण दगावल्याने बंद पाडलेली रुग्णालये कोविड काळात पुन्हा सुरू केलं. आम्ही काय केलं नाही ते सांगा. ज्या ज्यावेळी संकटे आली तेव्हा तेव्हा सगळे शिवसैनिक म्हणून आम्ही पुढे गेलो.", अशी आठवण त्यांनी आपल्या भाषणातूनही केली.


"शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना शिवसैनिकांवर मोक्का लावता?"
 
इथे स्मिता वहिनी आहे, निहार आहे जयदेव आहेत, थापा जो सावली सारखा बाळासाहेबांच्या सावली सारखा उभा राहिला त्याची तुम्ही चेष्ठा केली. त्याला लादी पुसरणारा, बाथरुम साफ करणारा. बाळासाहेब ज्यांना सवंगडी समजायचे त्यांना तुम्ही नोकर समजता. आम्ही जेव्हा मला आठवतंयं जेव्हा "मी दिल्लीला गेलो होतो की तेव्हा फोन आला होता की नोकर के साथ जाते हो मालिक के साथ जाओ.", आम्ही काय नोकर आहोत. अरे कट्टपापण हा स्वाभिमानी नव्हता. तुमच्यासारखा दुटप्पी राजकारणी नव्हाता. आणखी म्हणतात, "शिवसैनिकांना त्रास देतात. आमच्याकडे असली बोगस कामं होत नाही." तुम्ही मुख्यमंत्री असताना शिवसैनिक तडीपार झाले. मोक्का लावले. आनंद पवार माझ्याकडे येऊन ढसाढसा रडले. तुमचा युवासेना कार्यकर्ता सचिन कोळेवर मोक्का लागतो. तेव्हा तुम्हाला हे आठवलं नाही. उद्धव ठाकरेंचं इमोशनल ब्लॅकमेलिंग करुन पक्ष चालणार नाही. कोथळा करण्याची भाषा करता त्या पोटाची खळगी करण्याबद्दल थोडं बोला ना? कधी एखाद्याला चापट तरी मारली का? एकनाथ शिंदेवर शंभरहून आंदोलनाच्या केसेस आहेत.
 
उद्धव ठाकरेंच्या टीकेने गाठली खालची पातळी!
 
"माझ्या खासदार मुलाला कार्ट म्हणतायं. नातू नगरसेवकांची आस लावून धरलीयं म्हणता. अहो तो रुद्रांश केवळ दीड वर्षाचा आहे. कुठल्या पातळीवर जाऊन टीका करतायं. कुणाच्या बद्दल बोलतायं. काय पातळी सोडून बोलतायं. तो जन्माला आला ना तेव्हा खरं तुमचं अधःपतन सुरू झालं. तुम्हाला लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला. नारायण राणेंनी सांगितलं होतं. बाळासाहेबांनी त्याला नव्हे राणेसाहेबांनाच मुख्यमंत्री केलं होतं. एकनाथ शिंदेला कधीही मुख्यमंत्री पद नको होतं. सगळंच सांगत नाही. एक दिवस नक्की बोलेन. कुणाशी तुलना करतायं. एकनाथ शिंदे अद्याप वर्षावर रहायला गेला नाहीयं.", असं म्हणत ठाकरेंच्या पायाखालची वाळू सरकारला लागल्याचंही सांगितलं.
 
वडिल काढणाऱ्या उद्धव ठाकरेंना खडेबोल
 
"स्वतःच्या वडिलांचे नाव घेण्याची धमक नाही, अशी टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मी एकनाथ संभाजी शिंदे, असं नाव घेतो. मी रात्री अपरात्री शिवसेनेचे काम करुन रात्री उशीरा घरी जायचो तेव्हा माझे वडिल रात्री जागत माझी वाट पहायचे. आठ आठ पंधरा दिवस आमची भेट होत नसे. वडिलांचा विचार पुढे नेणारे आम्ही आहोत. तुम्ही कुठल्या अधिकारात छत्रपतींचे नाव घेता. बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आम्ही आहोत. तुम्ही वंशज म्हणून प्रॉपर्टीचे वारसदार असाल. दिघे साहेबांच्या विचारांच्या वारसा घेऊन जाणारा मला तुम्ही विचारता की आनंद दिघेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे. कुणाच्या नावावर आहे, हे ऐकून मलाच धक्का बसला. जे जे लोकं पक्षात मोठी होतील त्यांचे पाय कापण्याचे प्रयत्न सुरू होते. तुम्ही असं करताना पक्षाचेच पाय कापत होता हे विसरला.", अशी आठवण करुन देत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या बाप पळवणारी टोळी या टीकेलाही उत्तर दिले.
हे सरकार गरीबांच्या हितासाठी काम करणारं!
 
"लोकांच्या हिंताचे निर्णय आपण घेतोयं. प्रत्येक नागरिकाची दिवाळी आपण गोड केली. शंभर रुपयांत चार वस्तू दिला. केंद्र सरकारने शेतकरी सन्मान योजना दिलीयं. त्यालाही प्रोत्साहन महाराष्ट्र सरकार करेल. शेतकरी आत्महत्याग्रस्त मुक्त महाराष्ट्र करण्याचे काम आपण करत आहे. अतिवृष्टीत एनडीएफच्या निषकापेक्षा दुप्पट पैसे दिले. समृद्धी महामार्ग पूर्ण केला. बीडीडी चाळ पूर्नविकास प्रकल्प. परवडणाऱ्या किंमतीत घरं. आरोग्य आणि शिक्षणातही मोठे निर्णय आपलं सरकार घेणार आहे. खासगी शाळांपेक्षा सरकारी शाळांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता वाढवणार आहे. जिल्हा रुग्णालये, लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रीयांसाठी आवश्यक यंत्रणा पुरवणार आहे," असे आश्वासनही त्यांनी दिले.
 

वेदांता फॉक्सकॉनबद्दल खुलासा


"महाविकास आघाडीच्या काळातच वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गेला. त्यांच्याकडे टक्केवारी कोण मागत होता. तळेगाव एमआयडीसीत उद्योजगांना कोण त्रास देत होते. तुम्ही किती एमओयू केलेत. त्याची उत्तरं द्या. खोटे आकडेवारी देऊन दिशाभूल करता.", असा जाबही त्यांनी विचारला.
 
मुंबई खड्डेमुक्तीसाठी निर्णय का घेतला नाही?
 
"आमचं सरकार आल्यानंतर आम्ही मुंबई खड्डे मुक्त करण्यासाठी पाच हजार कोटींचं कंत्राट आणलं. सर्व रस्ते सिमेंट काँक्रेटीकरणाचं काम सुरू केलं. पुढील दोन वर्षात विकासाचं महाराष्ट्र मॉडेल तुम्हाला दिसेल. विकासाची सप्तसुत्री सुख समृद्धी कल्याण महाराष्ट्र महान, या सुत्रीवर आपण चालणार आहोत. कामाच्या धडाक्यात आपण आडवे येऊ नका. शेतकऱ्यांच्या कर्ममाफीचा निर्णय आम्ही घेतलायं. हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. म्हणून हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारं आहे. म्हणून सर्वांना एकनाथ शिंदे हा तुमच्या हक्काचा माणूस आहे, असं तुम्हाला वाटतंयं. यापुढे शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लावण्याची हिम्मत कुणी करणार नाही, असं काम आपण करणार नाही. ", असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.