वांद्रे वरळी सी लिंकवर मोठा अपघात

05 Oct 2022 22:29:17
 
Bandra Worli Sea Link Accident
 
 
मुंबई : बुधवार, दि. ५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री मुंबईतील सुप्रसिद्ध वांद्रे वरळी सी लिंक वर मोठा अपघात एक मोठा अपघात झाला. सी लिंकवर उभ्या असलेल्या रुग्णवाहिका आणि चार चारचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. यात सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. सर्व जखमींना लीलावती आणि नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात नेण्यात आलेल्यापैकी पाच जणांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. दोन महिला आणि एक पुरूषांवर अद्याप उपचार सुरू आहेत. इतर दोघांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
 
 
अपघात कसा झाला ?
मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवर बुधवारी रात्री प्रथम एका वाहनाचा अपघात झाला. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलविण्यात आली. रुग्णवाहिका जखमींना घेऊन जाण्यापूर्वीच मागून येणाऱ्या इतर वाहनांनी रुग्णवाहिकेला धडक दिली. घटनेची माहिती मिळताच या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरु करण्यात आली आहे.
 
 
मदतकार्यासाठी आलेल्यांचा मृत्यू
 
वांद्रे वरळी सी लिंकवर मध्यरात्री दोनच्या सुमारास २ चारचाकी गाड्यांचा अपघात झाल्याची घटना घडली होती. या अपघातात जखमी झालेल्यांना मदत देण्यासाठी टोलनाक्यावरील कर्मचारी पोहोचले होते. मात्र, त्यानंतर अपघातग्रस्त गाड्यांवर इतर दोन गाड्या आदळून झालेल्या अपघातात मदतकार्य करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांचाच करुणास्पद अंत झाल्याची दुर्दैवी बाब समोर आली आहे. या विचित्र अपघातात परस्परांवर आढळलेल्या चार गाड्यांचा चक्काचूर झाला आहे.
 
 
पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
 
'मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवर झालेल्या अपघातामुळे मी व्यथित झालो आहे. अपघातात जीवितहानी झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांच्या प्रति माझ्या संवेदना आहेत. मला आशा आहे की जे जखमी झाले आहेत ते लवकर बरे होतील.'
 
- पंतप्रधान नरेंद्र मोदी
 
 
मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंक येथे झालेल्या भीषण अपघातात जीवितहानी झाल्याची बातमी समजल्यावर दुःख झाले. या अपघातात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या मनापासून संवेदना. जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.'
 
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
 
 
 
Powered By Sangraha 9.0